काळी कपिला गाय दुधाला अधिक
त्याचा तुला अभिषेक महादेवा ४१
गांव बिघडला झाले सारे व्यभिचारी
कोपेल ब्रह्मचारी मारुतिराय ४३
गांव बिघडला सत्याची नाहीं चाड
कोपेल गोविंद श्रीगीतेचा ४४
गांव बिघडला सत्याला नाहीं मान
कोपेल भगवान शेषशायी ४५
गांव बिघडला जसे कावळे भांडती
कोपेल लक्ष्मीपति नारायण ४६
गांव बिघडला गांवाची गेली शोभा
मोठमोठे लोक लोभा गुंतताती ४७
गांव बिघडला मानीना कोणी कोणा
जो तो म्हणे मी शहाणा सभेमाजी ४८
माझ्या घरीं ग पाहुणा पाहुणा नव्हे बाई
नणंदा वन्संबाई पति तुमचे ४९
पहाटेच्या प्रहररात्रीं कोण राणी ओव्या गाते
पुत्राला निजवीते उषाताई ५०
पहांटेच्या प्रहररात्रीं कोंबडा आरवला
गोसावी फेरी आला दत्तात्रेय ५१
पहांटेच्या प्रहररात्रीं कर्णा वाजतो काशाचा
महालक्ष्मी मातेचा रथ फिरे ५२
पहांटेच्या प्रहररात्रीं कर्णा वाजतो मंजुळ
दह्यादुधाची आंघोळ विठ्ठलाची ५३
पहांटेच्या प्रहररात्री कर्णा वाजतो झाईझाई
रामरायाच्या स्नानाला जागे व्हावे गंगाबाई ५४
पहांटेच्या प्रहररात्रीं कर्णा वाजतो कांचेचा
महालक्षुमी मातेचा रथ फिरे ५५
तिन्हीसांजा झाल्या उंबर्याला रक्षा
जोगिणीला भिक्षा घालूं नये ५६
तिन्हीसांजा झाल्या उंबऱ्याला माळ
जोगिणीला डाळ घालूं नये ५७
तिन्ही सांजा झाल्या उंबर्याला कणा
जोगिणीला दाणा घालू नये ५८
लांबून दिसली मला वाटे माझी आई
भेटायास आली चुलत काकूबाई ५९
आपण गुज बोलूं डाळिंबीखालती
मी लेक तू चुलती मायेपरी ६०