झोपाळ्यावर बसू म्हणू ओंव्या परी
गंमत खरोखरी होई किती १२१
झोपाळ्या रे दादा तुला सदैव लांबवूं
गोड गोड ओंव्यागाऊं तुझ्यावर १२२
झोंपाळ्या रे दादा मुलांना आवडसी
मागेंपुढें नाचतोसी आनंदाने १२३
झोंपाळ्या रे दादा आम्हांला तुझा लळा
चैन पडेना बाळाला तुझ्यावीण १२४
झोंपाळा बांधीला ओसरी माजघरी
खेळती त्याच्यावरी मुलेंबाळे १२५
झोंपाळ्यावर बसूं झोंपाळ्याचा नाडा
चिरेबंदी वाडा मामंजींचा १२६
झोंपाळा तुटला आम्ही बसूं कशावरती
दुसरा बांधा दारी बाप्पाराया १२७
झोंपाळा चंदनाचा त्याला पाचूचें दिलें पाणी
गंजीफा खेळे राणी गोपूबाळाची १२८
झोंपाळ्या रे दादा हेलपट्टे खाशी
आम्हांला आज्ञापीशी उठावया १२९