आवडतो मज अफाट सागर

अथांग पाणी निळे

निळ्याजांभळ्या जळात केशर

सायंकाळी मिळे ॥

फेसफुलांचे सफेत शिंपित

वाटेवरती सडे

हजार लाटा नाचत येती

गात किनार्‍याकडे ॥

मऊ मऊ रेतीत कधी मी

खेळ खेळतो किती

दंगल दर्यावर करणार्‍या

वार्‍याच्या संगती ॥

संथ सावळी दिसती केव्हा

क्षितिजावर गलबते

देश दूरचे बघावयाला

जावेसे वाटते ॥

तुफान केव्हा भांडत येते

सागरही गर्जतो

त्या वेळी मी चतुरपणाने

दूर जरा राहतो ॥

खडकावरुनी कधी पाहतो

मावळणारा रवी

ढगाढगाला फुटते तेव्हा

सोनेरी पालवी ॥

प्रकाशदाता जातो जेव्हा

जळाखालच्या घरी

नकळत माझे हात जुळोनी

येती छातीवरी ॥

दर्यावरची रंगित मखमल

उचलुन घेते कुणी

कृष्ण सावल्या भुरभुर पडती

गगनाच्या अंगणी ॥

दूर टेकडीवरी पेटती

निळे तांबडे दिवे

सांगतात ते मजला आता

घरी जायला हवे ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel