(ही कथा काल्पनिक आहे. वास्तवाशी साम्य  आढळल्यास तो योगायोग समजावा )

ऊन पडले होते तरीही तिथे थंडी वाजत होती.वारा जोरात वाहत होता .एलिफंटा हेड कड्यापासून तीस चाळीस फूट अंतरावर एका दुपट्यात गुंडाळलेले एक लहान मूल  केविलवाणे रडत होते .कड्याच्या टोकावर एक जोडपे उभे होते .त्यांच्यामध्ये काहीतरी वाद झाला असावा .त्यातील बाईने त्या पुरुषाला मिठी मारली .आणि त्या कडय़ावरून खाली उडी मारली .आजूबाजूचे लोक धावत आले .कुणीतरी त्या लहान मुलाला उचलून घेतले.एकाने पोलिसांना फोन लावला .थोड्याच वेळात पोलिस आले.काय झाले ते सांगण्यासाठी लोकांनी एकच गलका केला .कोणाचेच बोलले कोणालाही नीट ऐकू येईना.

इन्स्पेक्टरने शिटी मारली आणि सर्व शांत झाले .कुणीतरी येऊन काय झाले ते सांगावे असे तो इन्स्पेक्टर म्हणाला .त्या लोकांचे दोन गट पडले होते .एका गटाचे म्हणणे  पुरुषाने बाईला मिठी मारली व उडी घेतली असे होते.तर दुसरा गट नाही बाईने पुरुषाला मिठी मारली आणि उडी घेतली असे होते.एकाचे तर असेही म्हणणे होते की पुरुष बाईला ढकलीत होता त्याच वेळी तिने त्याला घट्ट धरले  आणि म्हणून दोघेही कड्यावरून खाली पडले .काहीही असो परंतु एक पुरुष व एक स्त्री कड्यावरून खाली पडली हे सर्वांनी पाहिले होते .मूल कडयावर तसेच ठेवून उडी मारणारे जोडपे निर्दयी असले पाहिजे यावर सर्वांचे एकमत होते .आता त्या मुलाचे काय करायचे हाही प्रश्न होता. 

पोलिसांनी मूल ताब्यात घेतले .कुठल्या तरी अनाथाश्रमात त्याला तूर्त ठेवा, असे इन्स्पेक्टरने एका पोलिसाला सांगितले.ट्रेकर्सना बोलावण्यात आले .कड्याखालून दोन्ही प्रेते वर आणण्यात आली . शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आली.तूर्त आत्महत्येचा गुन्हा दोघांवर लावण्यात आला .दोघेही मृत पावलेले असल्यामुळे पुढे काही कार्यवाही करण्याचा प्रश्नच नव्हता . आत्महत्येसंबंधी काहीही चिठी कुठेही लिहून ठेवलेली नव्हती .  मृताच्या खिशात घराच्या चाव्या सापडल्या.ते जोडपे होते हे सिद्ध झाले .ते मूल त्यांचे होते हेही कळले .घरांमध्ये त्यांनी आत्महत्या का केली यासंबंधी काहीही पुरावा मिळाला नाही .त्यांच्या आई वडिलांचे जाब जबाब घेण्यात आले परंतु त्यातूनही  त्यांनी आत्महत्या कां केली त्याचे कारण कळले नाही .ते जोडपे अत्यंत सुखात व आनंदात राहात होते असे सर्वांनी सांगितले .त्यांच्या शेजाऱ्यांकडे  चौकशी करता त्यांचेही आदर्श जोडपे असे मत पडले .

न सुटलेली केस अन्सॉल्व्हड केस म्हणून ती फाईल करण्यात अाली .

त्या मुलाला कोर्टाच्या संमतीने एका अनाथाश्रमात ठेवण्यात आले .

पोलिसांच्या हिशेबी केस संपली होती .वर्तमानपत्रात त्या निर्दयी दाम्पत्याबद्दल बरेच काही लिहून आले.एका लहान मुलाला तसेच सोडून आत्महत्या करण्यामागे काय कारण असावे यावरही बरीच उलट सुलट  चर्चा झाली.एकूण रोख दोघेही दोषी आहेत असा होता .तरीही बरेच जण सागरला दोषी धरत होते .त्याने सारंगीला  ढकलले आणि तिने मिठी मारल्यामुळे तोही कड्यावरून खाली पडला असा वर्तमानपत्रातील चर्चेचा रोख होता. 

परंतु प्रत्यक्षात केस संपली नव्हती .एका रात्री तो इन्स्पेक्टर झोपला असताना त्याच्या स्वप्नात एक पुरुष आला .त्या मृत जोडप्यातील सागर हा तो होता . फोटो बघितलेले असल्यामुळे इन्स्पेक्टरने त्याला लगेच ओळखला. त्याने इन्स्पेक्टरला मी दोषी नाही.मी तिला कड्यावरून ढकललेले नाही . माझ्यावर उगीच निर्दयी म्हणून आरोप करू नका.माझ्या घरी जावून टेबलांमध्ये चोरकप्यात माझी डायरी आहे ती वाचा म्हणजे तुम्हाला सर्व उलगडा होईल असे सांगितले .चोरकप्पा कसा उघडावा तेही त्याला सांगितले .मी अधांतरी फिरत आहे माझ्यावरील आरोप दूर झाल्याशिवाय मला मुक्ती मिळणार नाही असेही पुढे सांगितले .

इन्स्पेक्टर घाटगे जागा झाल्यावर त्याला ते स्वप्न स्वच्छ आठवत होते . त्याने आपल्या वरिष्ठांना स्वप्न सांगितले .मृताच्या घरात जाऊन ती डायरी शोधून त्यात काय लिहिले आहे ते पाहण्याची त्याने परवानगी मागितली .त्याच्या वरिष्ठानी त्याची थोडी थट्टा केली.थोडी जास्त झाल्यावर वाटेल ती स्वप्ने पडतात असेही त्याला सुनावले .घाटगे त्याच्या स्वप्नाबद्दल गंभीर होता. शेवटी त्याने  परवानगी मिळविली .

मृताच्या घरात जावून त्याने स्वप्नात  पाहिल्याप्रमाणे टेबलाचा चोरकप्पा शोधून काढला. त्यात खरेच एक डायरी होती.

तिथेच बसून त्याने ती डायरी एका दमात वाचून काढली.नंतर ऑफिसात येऊन त्याने ती डायरी आपल्या वरिष्ठांना दिली .डायरीमध्ये प्रत्येक तारखेला काही लिहिलेले होतेच असे नाही.सागरने मधूनमधून कित्येक तारखा मोकळ्या सोडलेल्या होत्या. जेव्हा जेव्हा त्याला काही लिहावे असे वाटे तेव्हा तेव्हा तो थोडे बहुत त्या तारखेला लिहीत असे. 

डायरीतील काही महत्त्वाच्या तारखांचे उतारे पुढीलप्रमाणे होते.

१/६/२०१७

मला बाबा लग्न कर म्हणून पुन्हा पुन्हा आग्रह करीत आहेत.त्यांच्या आग्रहावरून मी मुली पाहत आहे परंतु मला अजून कोणतीच मुलगी पसंत पडलेली नाही .मी आज ऑफिसमधून आल्यावर एक गृहस्थ  मला भेटायला आले होते.त्यांची मुलगी लग्नाची  आहे. त्यांनी मला फोटो दाखविला. फोटोवरून तरी मला मुलगी पसंत पडली.उद्या मी मुलगी पाहायला जाणार आहे .

२/६/२०१७

सारंगीला पाहिले आणि मला ती एकदम पसंत पडली .तिच्या डोळ्यातील कारुण्य माझ्या विशेष लक्षात आले .का कोण जाणे त्यावरच मी मोहित झालो. मी लगेच होकार कळविला .

५/६/२०१७

सारंगीचे बाबा लग्नासाठी एवढे घाईला का आले आहेत ते मला कळत नाही.मला माझे अाईबाबा म्हणाले तुला एका मुलीचा बाप झाल्याशिवाय ते कळणार नाही.अगोदर लग्न व्हावे म्हणून आणि नंतर ठरलेले लग्न लवकर व्हावे म्हणून त्यांची धडपड चाललेली असते.असे विचार माझ्या मनात येण्याचे कारण दुसऱ्याच  दिवशी सारंगीला घेऊन ते लगेच आई बाबांकडे गेले होते.त्यांनाही मुलगी पसंत पडली . आई बाबांकडे त्यांनी शक्य तितक्या  लवकर लग्नाची तारीख ठरविण्यासंबंधी आग्रह धरला.बाबा मला फोनवर लग्नाची तारीख कोणती ठेवू म्हणून विचारीत होते .बाबांच्या म्हणण्यानुसार सारंगीच्या बाबांचा ज्योतिषावर फार विश्वास आहे. जुलैपासून पुढे सहा महिने तिला लग्नासाठी लाभत नाहीत .तेव्हा जूनमध्ये लग्न करावे असे त्यांना वाटते .आता साखरपुडा करावा आणि लग्न पुढच्या वर्षी करावे अशी माझी सूचना कोणालाही पसंत नाही .मलाही लग्न लवकरच झाले तर नको आहे असे नाही .

२०/६/२०१७   

आज माझे व  सारंगीचे लग्न झाले.दोन्हीकडची सर्व नातेवाईक मंडळी जमली होती. दोन्हींकडचे मित्र मैत्रिणी मजा करीत होत्या. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते.शेवटी मनासारखी पत्नी मिळाल्यामुळे मीही आनंदात आहे .सिमला कुलू मनालीला हनीमूनला जाण्यासाठी मी बुकिंग केले आहे.दोन दिवसांनीच आम्ही तिकडे जाण्यासाठी निघणार आहोत.उद्या घरचा सत्यनारायण झाला की आम्ही परवा निघू .या सगळ्यामध्ये मला खटकले ते सारंगीचे कोमजलेले मुख.ती सगळ्यांमध्ये भाग घेत आहे.परंतु ती कशातही नाही असे मला का कोण जाणे सारखे वाटत आहे.तिच्या मनात काय खदखदत आहे ते कळत नाही .तिला हे लग्न पसंत नाही का ?तिचे दुसऱ्या कुणावर प्रेम आहे का?तिच्या घरची मंडळी तिच्यावर जबरदस्ती करीत आहेत का?का केवळ माहेर सोडायचे म्हणून ती अशी मलूल आहे. काही कळत नाही .ती लग्नाअगोदरच जर काही बोलली असती तर मी तिला तेव्हाच मोकळे केले असते.ती मला जेव्हा एकांतात भेटेल तेव्हा माझा तिला पहिला प्रश्न हाच असेल .

२४/६/२०१७

आता आम्ही सिमल्याला आहोत .आमची तंद्री भंग करण्यासाठी कुणीही येण्याचा संभव नाही .मी आजच तिला विचारले की तुला हे लग्न पसंत नव्हते का ?त्यावर कसनुसे हसून ती म्हणाली असे तुम्हाला का वाटते?मी पूर्ण सुखी आहे .मी तिला म्हटले तुझा चेहरा उतरलेला दिसतो .त्या वेळी ती म्हणाली मी दमल्यामुळे तुम्हाला असे वाटत आहे .तिच्या वर्तणुकीत मधूनमधून येणाऱ्या  उदासी शिवाय मला दुसरे काहीही गैर आढळले नाही .मला भास झाला असेल म्हणून मी हसून ते संभाषण तिथेच संपविले .तरीही आत कुठे तरी माझे मन मला कुरतडत होते .

१/८/२०१७    

सारंगीला आज बरे वाटत नव्हते तिला दोन उलट्याही झाल्या.मी तिला डॉक्टरकडे जाऊया म्हणून म्हटले .त्यावर ती म्हणाली तुम्हाला हे कळायचे नाही.त्या बोलण्यावरून तिला दिवस गेले आहेत हे मी ओळखले . डॉक्टरकडे जाऊन आम्ही खात्री करून घेतली .माझा आनंद गगनात मावत नाही .

सारंगी मात्र जेवढी आनंदी दिसायला पाहिजे तेवढी दिसत नाही कदाचित आता आपले कसे होईल या काळजीने असेल .

‍१५/११/२०१७

सारंगीचे पोट चांगलेच पुढे आले आहे .आम्ही डॉक्टरांना जुळे आहे का ?म्हणूनही विचारले.त्यावर त्यांनी नाही म्हणून सांगितले .त्यांनी सोनोग्राफी नंतर संभाव्य प्रसूती तारीख म्हणून जानेवारीचा शेवटचा आठवडा किंवा फेब्रुवारीचा पहिला आठवडा असे सांगितले .तोपर्यंत सातच महिने होतात असे मी म्हटल्यावर डॉक्टर तिला नऊ महिने पूर्ण होत आहेत असे ठामपणे म्हणाले. डॉक्टरांचे काहीतरी चुकत असले पाहिजे असे म्हटल्यावर ती पुढे काहीच बोलली नाही .तिच्या चेहऱ्यावर पुनः अभ्रे दाटून आलेली पाहिली .

असे ती का वागते ते मला कळेना. ती बाळंतपणाला घाबरत तर नाही ना ?काही कळत नाही .कदाचित तिला इतक्या लवकर मूल नको असेल .परंतु तसेही वाटेना .कारण जेव्हा मी तिला आपण साधने वापरू या असे म्हटले त्यावेळी ती नको म्हणाली होती .

(क्रमशः)

१२/७/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel