२३. शहाणा शत्रू बरा, पण मूर्ख मित्र नको !

(भकस जातक नं. ४४)

प्राचीनकाळीं काशीराष्ट्रांत एका खेडेगांवीं पुष्कळ सुतार रहात असत. त्यांतील एकजण आपल्या कामांत गढून गेला असतां त्याच्या डोक्यावर एक माशी येऊन बसली, व ती त्याला फार त्रास देऊं लागली. त्याचे दोन्ही हात गुंतल्यामुळें तो जवळ असलेल्या आपल्या तरूण मुलाला म्हणाला ''मुला ही माशी मला मघांपासून फार त्रास देत आहे. तिला जरा घालवून दे पाहूं.'' मुलगा म्हणाला, ''बाबा, जरा थांबा; मी त्या माशीचा एकदम निकालच लावून टाकतों.'' असें म्हणून त्यानें जवळ असलेली तीक्ष्ण धारेची कुर्‍हाड उचलली व बापाच्या मागल्या बाजूला जाऊन माशीला मारण्यासाठी त्याच्या डोक्यावर मारिली. माशी उडून गेलीच; पण सुताराच्या डोक्याचीं मात्र दोन शकलें झालीं ! तो तत्काळ प्राणास मुकला.

आमचा बोधिसत्त्व त्या काळीं व्यापारी कुलांत जन्मला होता, व आपल्या उद्योगधंद्यासाठीं तो या ठिकाणीं आला होता. या मूर्ख पोराचें हें कृत्य पाहून तो तेथें जमलेल्या सुताराला म्हणाला, ''बाबानों शहाणा शत्रू पुरवला, परंतु मूर्ख मित्र नको आहे ! या मूर्ख पोरानें आपल्या पित्याची कामगिरी बजावीत असतां त्याचाच नाश करून टाकाला !''

२४. मूर्खावर आपलें काम सोपवूं नये.


(आरामदूसक जातक नं. ४३)

एका काळीं वाराणसी नगरींत उत्सवाची उद्धोषणा करण्यांत आली होती. त्या दिवसापासून सर्व लोकांनी उत्सवास सुरवात केली. पण राजाच्या बगीच्यांतील माळ्यास आपलें काम टाकून या उत्सवास जातां येईना. पुढें त्याला अशी एक युक्ति सुचली कीं, आपल्या उद्यानांत रहाणार्‍या वानरांच्या टोळीवर बगीच्याला पाणी देण्याचें काम सोपवून आपण एक दिवस तरी उत्सवाला जावें. तो त्या टोळींतील मुख्य वानराला म्हणाला, ''मित्रा या उद्यानापासून मला जसा फायदा आहे तसा तो तुम्हाला देखील आहे. येथील फलपर्णादिक खाऊन तुम्ही आपला निर्वाह करितां. तेव्हां एक दिवस माझे थोडें काम करणें तुमचें कर्तव्य आहे.

तो वानर म्हणाला ''आपलें काय काम आहे ते आम्हांस समजावून द्या म्हणजे आम्हाला शक्य असेल तें आम्ही करूं.''

माळी म्हणाला ''तुम्ही या झाडाच्या रोप्यांना आजचा दिवस तेवढें पाणी द्या म्हणजे तेवढ्या अवधींत मी उत्सवाची थोडी मौज पाहून माघारी येतों. तो वानर म्हणाला ''ठीक आहे, आम्ही मोठ्या संतोषानें हें काम करितों.

माळी पखाली आणि लांकडाची भांडी वानरांच्या स्वाधीन करून शहरांत गेला. इकडे मुख्य वानर आपल्या टोळींतील वानरांत म्हणाला, ''आमच्यावर सोपविलेलें काम आम्हीं मोठ्या शिताफीनें केलें पाहिजे. येथल्या पाण्याचा अपव्यय न करितां तें मोठ्या शिताफीनें केलें पाहिजे. येथल्या पाण्याचा अपव्यय न करितां तें मोठ्या काटकसरीनें वापरलें पाहिजे, नाहींतर आम्हास आणि बागवानाला पाण्यासाठीं त्रास सोसावा लागेल. तेव्हां तुम्ही झाडाच्या रोपांला पाणी देत असतांना त्यांच्या मुळाच्या प्रमाणानें पाणी देत जा. ज्यांचीं मुळें खोल गेलीं असतील त्यांना जास्ती पाणी द्या व ज्यांचीं उथळ असतील त्यांना कमी द्या.''

वानरांनीं आपल्या पुढार्‍याच्या आज्ञेप्रमाणें सर्व रोपें उपटून पाहून त्यांच्या मुळांच्या प्रमाणावर त्यांस पाणी दिलें !

या वानरांच्या कृत्यामुळें बिचार्‍या बागवानाचें किती नुकसान झालें असेल याची कल्पनाच केली पाहिजे ! मूर्खावर जो आपल्या कामाचा भार टाकतो त्याची शेवटीं अशीच हानि होते !!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel