४२. लोभी ब्राह्मण.

(सिगाल जातक नं. ११३)

वाराणसींतील लोक उत्सवांत यक्षांना मत्स्यमांसादिकांचा बळी देत असत; व यक्षांना प्रसन्न करण्यासाठीं मातीच्या भांड्यांतून ठिकठिकाणीं दारू ठेवीत असत. अशा एका उत्सवाच्या प्रसंगीं वाराणसीबाहेरील स्मशानांत राहणारा एक कोल्हा मध्यरात्र झाल्यावर गटाराच्या मार्गानें आंत शिरला व बलिकर्मासाठीं ठिकठिकाणीं ठेविलेल्या मत्स्यमांसादिकांवर यथेच्छ ताव मारून त्यानें मातीच्या भांड्यांतील सुरेचें आकंठ पान केलें. त्यामुळें पुनः गटारद्वारें बाहेर पडण्याचें सामर्थ्य त्याच्या अंगीं राहिलें नाहीं. तो एका पुन्नाग वृक्षाच्या झाडींत जाऊन पडला, व सकाळ होईपर्यंत जागा झाला नाहीं. सकाळीं उठून शहरांतून निर्भयपणें बाहेर पडणें शक्य नव्हतें; म्हणून दडत दडत सडकेजवळ येऊन तो लपून बसला. इतक्यांत एक ब्राह्मण त्या मार्गानें नदीवर प्रातःस्नानासाठीं चालला होता. त्याला पाहून कोल्हा म्हणाला, ''अहो, भटजीबुवा, तुमच्यापाशीं माझें कांहीं काम आहे. जरा एका बाजूला याल तर तें तुम्हाला सांगेन. तुमच्याच फायद्याचें आहे, तेव्हां वेळ फुकट गेल्याबद्दल तुम्हाला वाईट वाटणार नाहीं.'' ब्राह्मण त्या जवळ गेल्यावर तो त्याला म्हणाला, ''भटजीबुवा, तुमचीं वस्त्रें प्रावरणें पाहून तुम्ही दरिद्रीवस्थेनें गांजले आहांत असें वाटतें. तुमची ही स्थिति पाहून मला फार दया आली, व मजपाशीं असलेले दोनशें कार्षापण तुम्हाला दान करावे असा माझा निश्चय झाला आहे. पण दिवसा ढवळ्या मला तुमच्या बरोबर शहरांतील रस्त्यांतून जातां येणें शक्य नाहीं. तुम्ही जर आपल्या उपरण्यांत गुंडाळून मी सांगितलेल्या ठिकाणीं घेऊन जाल, तर आजच्या आज ते कार्षापण तुमच्या हवालीं करतों.''

त्या लोभी ब्राह्मणाला मद्यपी शृगालाचें म्हणणें खरें वाटलें. व आपल्या उपरण्यांतून त्यानें त्याला गांवाबाहेर स्मशानांत नेलें. तेथें खाली ठेविल्याबरोबर उपरण्यांत देहधर्म करून शृगालानें जंगलांत पळ काढिला.

त्यावेळीं आमचा बोधिसत्त्व त्या ठिकाणीं देवता होऊन रहात असे. हें शृगालाचें कृत्य पाहून तो त्या ब्राह्मणाला म्हणाला, ''हे ब्राह्मणा, मद्यपी शृगालावर विश्वास ठेवून तूं आपली फजिती करून घेतलीस. याजपाशीं शंभर कवड्याहि मिळावयाच्या नाहींत मग दोनशें ताम्र कार्षापण कोठून असणार ? * आतां तुझें उपरणें धुवून मुकाट्यानें चालता हो, व द्रव्यलोभामुळें पुनः असा फसूं नकोस.''
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* मूळ गाथा--
सद्धहसि सिगालस्स सुरापीतस्स ब्राह्मण ।
सिप्पिकानं सतं नत्थि कुतो कंससता दुवे ॥
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel