त्या कालीं कोसल देशाचा राजा मल्लिक नांवानें फार प्रसिद्ध होता. राजकारणांत तो अत्यंत दक्ष असे. आपल्या आसपासचे लोक आपलीं स्तुती करतात तेव्हां अज्ञात वेषानें आपल्या राष्ट्रांतील लोकांचीं मनें जाणण्याच्या उद्देशानें तोदखील कोसल राष्ट्रांत फिरत होता. आपल्या राष्ट्राच्या सरहद्दीपर्यंत त्यालाहि कोणी दोषदर्शक सांपडला नाहीं. एका अरण्यमय प्रदेशांत ओढ्याच्या कांठीं मल्लिक राजाच्या रथाची आणि बोधिसत्त्वाच्या रथाची समोरासमोर गांठ पडली. ओढयांतून पलीकडे जाण्याचा रस्ता इतका अरुंद होता कीं, एकदम दोन रथांला जाणें शक्य नव्हतें. तेव्हां मल्लिक राजाचा सारथी म्हणाला, ''भो सारथी तुझा रथ बाजूला घे, म्हणजे मीं माझा रथ पुढें हांकतों.''

ब्रह्मदत्ताचा सारथी म्हणाला, ''परंतु पहिल्यानें तूं तुझा रथ बाजूला घे आणि आम्हांला वाट दे.''

त्यावर मल्लिकाचा सारथी संतापून म्हणाला, ''तूं मूर्ख दिसतोस, या रथामध्यें कोसलाधिपति मल्लिक राजाची स्वारी बसली आहे. तेव्हां पहिल्यानें पुढें जाण्याचा माझ्या रथाचा हक्क आहे.''

ब्रह्मदत्ताचा सारथी म्हणाला, ''पण माझ्या रथांत त्रिभुवनविश्रुतकीर्ती श्रीब्रह्मदत्तमहाराजांची स्वारी आहे. तेव्हां त्याच्या रथानें पुढें व्हावें हें योग्य नव्हे काय ?''

दोघां सारथ्यांचा बराच वेळ संवाद झाला, आपल्या धन्याची जाति, कुल, गोत्र, संपत्ति, वय वगैरे सर्व गोष्टींची त्यांनी तुलना करून पाहिली. त्या सर्व बाबतींत दोघेंहि राजे समानच होते. तेव्हां ब्रह्मदत्त राजाचा सारथी म्हणाला, ''आतां आपण आपल्या मालकाच्या शीलाची तुलना करूं. ज्याचें शील श्रेष्ठ दर्जाचें असेल, त्यानें प्रथमतः जावें व इतरानीं त्याला वाट द्यावी. तेव्हां तूं आतां आपल्या मालकाचें शील काय तें सांग.''

कोसल राजाचा सारथी म्हणाला, ''आमच्या राजेसाहेबांचे गुण ऐकून तुला मानच खालीं घालावी लागणार आहे; तथापि, तें ऐकण्याची जर तुझी इच्छाच असली तर ऐकून घे. सांगतों. * आमचा राजा जबरदस्ताचा जबरदस्तीनें नरम करतो; मृदूला मृदु उपायांनींच वश करतो; साधूला साधुत्वानेंच वळवतो, व खळाला खोट्या मार्गानेंच जिंकीत असतो. असा हा आमचा धनी आहे. तेव्हां रस्त्यांतून दूर होऊन आमच्या रथाला वाट दे.''
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* मूळ गाथा --
दळहं दळहस्स खिपति मल्लिको मुदुना मुदुं ।
साधुपि साधुना जेति असाधुंपि असाधुना ।
एतादिसो अयं राजा मग्गा उय्याहि सारथी ॥
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel