व्याधानें वृद्ध वानरीला जीवदान देण्याचें कबूल करून बोधिसत्त्वाचा तात्काळ प्राण घेतला आणि त्याला आपल्या पिशवींत भरलें, आतां घरीं जाणार इतक्यांत त्याला वाटलें कीं, या म्हातारीला जिवंत ठेऊन तरी काय उपयोग. त्या तरुण वानराच्या मांसाला चांगली किंमत येईल, आणि वानरीचें मांस घरीं उपयोगास आणतां येईल. असा विचार करून पुनः त्यानें तिच्यावर बाण रोखला तें पाहून चुल्लनंदिय ताबडतोब पुढें सरसावला आणि म्हणाला, ''बा व्याधा, तूं या म्हातारीला मारूं नकोस. हा मी तिचा लठ्ठ पुत्र आहें. मला मारून इला जीवदान दे.''

त्या अत्यंत कूर व लुब्ध पारध्यानें त्याचा तर खून केलाच. परंतु तेवढ्यानें तृप्‍त न होतां त्या वृद्ध वानरीलाहि ठार केलें, आणि मोठ्या प्रफुल्लित मनानें त्यानें आपल्या घरची वाट धरली. अघोर कृत्याचें फल ताबडतोब भोगावें लागतें असें म्हणतात तें खोटें नाहीं. वाराणसी नगराच्या द्वारावर पोंचतो न पोंचतो तोंच घरावर वीज पडून बायको व मुलें जळून मेलीं ही बातमी त्याला समजली. आजपर्यंत शतशः महापातकें करून ज्यांच्यासाठीं त्यानें धनदौलत मिळविली, घर बांधलें आणि अनेक व्यवसाय केले. त्यांचा असा एकाएकीं अंत झालेला पाहून त्याचें मन भ्रमिष्ट झालें ! तो तसाच ओरडत घरापाशीं गेला आणि पहातो तों जळकें आढें तेवढें शिल्लक राहिलेलें ! आंसवें गाळीत तों त्याच्या खालीं जाऊन उभा राहिला; इतक्यांत तें आढें कडाडा मोडून त्याच्या शिरावर पडलें आणि मोठी जखम झाली. तो मोठमोठ्या किंकाळ्या फोडूं लागला तेव्हां आसपासची मंडळी गोळा झाली. इतक्यांत त्याच्या पायाखालची जमीन दुभंग होऊन हळु हळु त्याला गिळूं लागली. तेव्हां तो म्हणाला, ''पाराशर्य आचार्यानें केलेला उपदेश जर मी ऐकला असता, तर माझी अशी गती झाली नसती ! गुरुगृह सोडते वेळीं आचार्य मला म्हणाला, ''बाबारे ज्याच्यायोगें पश्चात्ताप करण्याची पाळी येते, असे पाप तूं कायावाचामनें करूं नकोस. मनुष्य जीं जीं कर्मे करतो त्या त्या कर्मांचीं तो फळें भोगतो. कल्याणकारक कर्म करणारा चांगली दिवस पहातो आणि पापकारक कर्मे करणारा वाईट दिवस पहातो. थोडक्यांत सांगावयाचें म्हटलें म्हणजे, जसें जो बीं पेरतो तसें त्याला फळ मिळतें. परंतु हा आचार्याचा उपदेश मला मूर्खाला-'' इतक्यांत त्याचें समग्र शरीर पृथ्वीमातेनें गिळून टाकलें ! तो सरळ नरकांत जाऊन पडला !!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel