१३५. पश्चात्ताप करण्याची पाळी कां येते ?

(जनसंधजातक नं. ४६८)


बोधिसत्त्व एकदां जनसंध नांवाचा वाराणसीचा राजा झाला होता. तरूणपणीं तक्षशिलेला जाऊन त्यानें सर्व शास्त्रांचें अध्ययन केलें होतें, आणि राज्यकारभारांत नानाविध मनुष्यस्वभावाचा त्याला चांगला अनुभव आला होता.

एका उपोसथाच्या दिवशीं सर्व लोकांना राजांगणांत गोळा करून मनुष्याला पश्चात्ताप करण्याचा प्रसंग कां येतो या संबंधानें त्यानें उपदेश केला तो असा ः-

''(१) तरुणपणीं प्रयत्‍नानें आणि सन्मार्गानें द्रव्यसंग्रह न केल्यास वृद्धपणीं पश्चात्ताप करण्याची पाळी येते. (२) आपणाला सर्व साधनें अनुकूल असतां आपण जर शिक्षण संपादन केलें नाहीं तर सतत पश्चात्ताप करण्याची पाळी आल्यावांचून रहाणार नाहीं. (३) पूर्वी मी खोट्या उठाठेवी करणारा, चहाडखोर व शिवीगाळ करणारा होतों याबद्दल वृद्धपणीं पश्चात्ताप करण्याची पाळी येते. (४) तरूणपणीं पुष्कळ प्राण्यांचा घात केला, प्राणिमात्राला निर्दयतेनें वागविलें याबद्दल वृद्धपणीं वाईट वाटल्यावांचून रहात नाहीं. (५) आपल्या स्त्रीला सोडून परस्त्रीवर नजर ठेविली याबद्दल भयंकर पश्चात्ताप करण्याचा प्रसंग आल्यावांचून रहात नाही. (६) घरांत अन्नवस्त्रादिकांचा पुष्कळ संचय असून देखील त्यांपैकीं अल्पहि दानधर्माकडे लावले नाहीं याबद्दल वृद्धपणीं मनाला तळमळ लागून रहाते. (७) माझ्या अंगीं सामर्थ्य असून तारुण्यांत वृद्ध आईबापांची मी हेळसांड केली ही गोष्ट वृद्धपणीं मनाला फार झोंबते. (८) ज्यानें सर्व प्रकारें माझ्या बरवेपणाची काळजी घेतली त्या माझ्या पित्याचा सदुपदेश मी ऐकला नाहीं आणि त्याचा अवमान केला याबद्दल फार पश्चात्ताप करण्याचा प्रसंग येतो. (९) तारुण्यांत साधुसंतांचा आदरसत्कार करून त्यांचा धर्मोपदेश मी योग्यकाळीं श्रवण केला नाहीं याबद्दल मागाहून पश्चात्ताप करावा लागतो. (१०) तारुण्यांत तपश्चर्या करण्याचें अंगांत सामर्थ्य असून माझ्या हातून तपाचरण घडलें नाहीं याबद्दल वृद्धपणीं पश्चाताप करण्याची पाळी येते.

म्हणून सूज्ञ तरुणानें या दहा गोष्टींबद्दल पुढें पश्चाताप करण्याची पाळी येणार नाहीं अशा तर्‍हेची सावधगिरी ठेवावी व उत्साहानें सर्व सत्कर्मे आचरून आपणावर पश्चाताप करण्याची पाळी येऊं देऊं नये.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel