१४०. एका राजाची कृतज्ञता.

(सरभमिगजातक नं. ४८३)


एकाकाळीं वाराणसीचा तरुण राजा शिकारींत फार प्रवीण होता. आपल्या परिवाराला बरोबर घेऊन एके दिवशीं तो एका महारण्यांत शिकारीस गेला. तेथें आमचा बोधिसत्त्व शरभ मृगाच्या पोटीं जन्माला येऊन स्वेच्छ संचार करीत असे. राजा आपल्या समुदायाला म्हणाला, ''आपण येथें एका जंगलाच्या भागाला वेढा देऊं व ज्याच्या जवळून मृग पळून जाईल त्याची सर्व मिळून फजीति करूं.''

परंतु राजाच्या शिकारी लोकांनीं या प्रसंगीं धन्याचीच फजीति करण्याचा घाट घातला. त्यांनीं असा बेत केला कीं, सगळ्यांनीं मिळून एखाद्या मोठ्या झुडुपाला वेढी द्याव्या व मृग सांपडला असता त्याला राजा असेल त्याच बाजूनें पळवून लावावें.

कर्मधर्मसंयोगानें त्यानें वेढिलेल्या झुडपात आमचा बोधिसत्त्व सांपडला व जेथून अवकाश सांपडला तेथून तो वातवेगानें पळत सुटला. त्याचा वेग इतका होता कीं, राजानें मारलेल्या अनेक बाणांपैकीं एकानेंहि त्याच्या अंगाला स्पर्श केला नाहीं. अशा रीतीनें मृग आपल्या हातून निसटला हें पाहून राजा लज्जित झाला व आपल्या लोकांकडून होणारी फजीति टाळण्यासाठीं पायीच त्याच्या मागोमाग पळत सुटला.

बोधिसत्त्वाला अरण्यांतील सर्व बिकट स्थानें आणि मार्ग अवगत होते. तो नागामोडी गतीनें पळत सुटला व एका तृणाच्छादित भयंकर चिखलाच्या डबक्याजवळ येऊन त्याला वळसा घालून तसाच पुढें चालला. राजाला डबक्याची माहिती नसल्यामुळें तो त्यावर उगवलेल्या हिरव्या गवतावरून अतिवेगानें धावत असतां त्यांत रुतला. गळ्यापर्यंत देह चिखलांत बुडाल्यामुळें राजाला डबक्यांतून बाहेर येणें अशक्य होतें. आपले शिकारी लोकहि फार दूर राहिल्यामुळें मदतीला येतील ही आशा त्याला राहिली नाहीं. तेव्हां मरणाशिवाय दुसरी गति नाहीं असें वाटून तो अत्यंत हताश झाला.

बोधिसत्त्वानें राजाकडे मागें वळून पाहिलें तेव्हां त्याला राजाची विपन्नावस्था कळून आली व तो आपल्या मनाशींच म्हणाला, ''हा राजा जरी मला मारण्याच्या बेतांत होता, जरी यानें माझें अकारण वैर केलें तरी अशा संकटसमयीं त्याला मदत करणें माझें कर्तव्य होय. हा जर जगला तर आपल्या प्रजेचें योग्य मार्गानें पालन करून पुष्कळ लोकांचें कल्याण करील.''

असा विचार करून बोधिसत्त्व त्य डबक्याच्या काठीं आला आणि राजाला म्हणाला, ''महाराज, तुम्ही माझ्यासारख्या निरपराधी प्राण्याला विनाकारण मारूं पहात होता व जणूं काय तुमच्या कर्माचें फळ म्हणूनच तुम्ही या डबक्यांत सांपडला. परंतु तुमची ही विपन्नावस्था पाहून माझ्यानें पुढें जाववेना. तुम्ही माझें वैर केलेंत तें मी मैत्रीनें फेडीत आहे, त्याचा स्वीकार कराव मी माझें पुच्छ तुमच्या हातीं येईल असें करितों. त्याला धरून या कर्दमांतून बाहेर निघा.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel