या खटल्याची हकीगत पुढीलप्रमाणे-
मुंबईच्या एका हॉटेलात खुशालशेठ नावाचे व्यापारी आपल्या खोलीत मृतवत् आढळले. पंचनामा झाला. त्यांच्या शरीराची चिरफाड केल्यावर सरकारी डॉक्टरांना विषप्रयोग झाल्याचे कळून आले. कोणी केला विषप्रयोग? चौकशी सुरू झाली. त्या व्यापार्याने बँकेतून नुकतेच तीन हजार रूपये काढले होते. हॉटेलच्या मालकासही ती गोष्ट माहीत होती. परंतु मरणानंतर पंचनामा केलेल्या त्या व्यापार्याच्या बॅगेत फक्त तीनशे रूपये नि काही आणे आढळले. बाकीच्या पैशांचे काय झाले?
मरायच्या आदल्या दिवशी तो रूपाच्या संगतीत होता. दिवसा रात्री तिच्याच संगतीत तो रमला. रूपा दोनदा हॉटेलातील त्याच्या खोलीत आली होती. व्यापार्याने रूपाला हिर्याची अंगठी दिली होती. तिने ती वेश्यागाराच्या मालकिणीला विकली-दिली. रमीने तो व्यापारी मेल्यावर दुसर्याच दिवशी बँकेत दोन हजार रूपये ठेवले. रूपाने सांगितले की, व्यापार्याला झोप यावी म्हणून त्याला दारूतून झोपेची पूड दिली. ही पूड रामधनने तिला दिली. रमीही त्या वेळेस हजर होती. मी ‘पूड दिली’ असे रूपाने आपण होऊन कबूल केले.
फेरतपासणीत रूपा म्हणाली, व्यापारी वेश्यागारात आला होता. त्याने मला हॉटेलात जाऊन बॅगेतून पैसे आणायला सांगितले. त्याने किल्ली दिली. मी जाऊन कुलूप काढले. मी सांगितल्याप्रमाणे फक्त चाळीस रूपये घेतले. रामधन आणि रमी यांच्या देखतच मी बॅग उघडली. व्यापारी हॉटेलात परत गेला. परंतु रात्री त्याचा पुन्हा माझ्यासाठी निरोप आला. वेश्यागाराच्या मालकिणीने मला हॉटेलात जायला भाग पाडले. मी थकून गेले होते. मी हॉटेलात गेले. मी अनिच्छा दर्शविली. त्याने मला तडाखा दिला. परंतु मी ओरडेन, निघून जाईन असे वाटून तो पुन्हा गोड बोलू लागला. त्याने मला ती अंगठी दिली. मी क्षणभर बाहेर आले. रामधन आणि रमी तेथे होती. मी त्यांना म्हटले, ‘काय करावे? हा व्यापारी झोपला तर किती छान होईल! मी सुटेन.’
‘त्याला झोपेचीच पूड दे.’ ती दोघे म्हणाली.
‘नुसती झोपेची ना?’ मी विचारले.
‘हो. सकाळी तो पुन्हा उठेल. निरूपद्रवी पूड. आणि मी पूड दिली. केवळ तो झोपावा म्हणून.’ ती म्हणाली.
रमी म्हणाली, ‘मी दिवसभर कामात होते. मी त्या व्यापार्याच्या खोलीतही गेले नाही. दिवसभर हीच त्याच्या खोलीत होती. रात्रीही ही आली होती. पैसे हिनेच चोरले असले पाहिजेत.’
‘मग तू दोन हजार रूपये बँकेत ठेवलेस ते कुठले?’
‘ते माझ्या स्वत:च्या श्रमाचे. अठरा वर्षांची ती माझी कष्टाची कमाई आहे. मी रामधनशी लौकरच लग्न करणार आहे. आमच्या संसारासाठी ती पुंजी आहे.’