ज्यूरीच्या लिहिण्यात महत्वाचे शब्द सर्वांच्या घाईमुळे घालवायचे राहिले. ‘चोरीचा हेतु नव्हता, त्याचप्रमाणेच प्राण घेण्याचाही, असे म्हणायला हवे होते. परंतु प्राण घेण्याचाही नव्हता’ हे शब्द घालावयाचे राहिले. सारा मूर्खपणाचा कारभार. जो तो घाईत. ज्युरी, न्यायाधीश कोर्टांत आले. न्यायाधिशांनी निकाल वाचला:

१) रामधन : आठ वर्षे

२) रमी : चार वर्षे

३) रूपा : तीन वर्षे

प्रताप उठून म्हणाला, ‘रूपा निर्दोष आहे. तिने चोरी केली नाही. तिने पूड दिली ती झोपेची समजून.’ न्यायाधीश म्हणाला, ‘परंतु प्राण घेण्याचा तिचा हेतु नव्हता असे तुम्ही म्हटले नाही, येथे लिहिले नाही.

‘ते चुकीने राहिले. घाई झाली. तुमचा निर्णय हास्यास्पद ठरेल. चोरी जर केली नाही; तर ती विष कशाला देईल? पूड दिली; परंतु प्राण घेण्याचा तिचा हेतु नव्हता. हा अर्थ यांतून निघतो.’ प्रताप म्हणाला.

‘ते स्पष्ट केले पाहिजे होते. मला उगीच अर्थ काढता येणार नाही. ज्यूरी सर्वांना सोडून देते नि न्यायाधीशही सोडू लागले असा गवगवा व्हायचा. तुम्ही लिहिले आहे, तदनुरूप सारे झाले पाहिजे. तुम्ही गुन्हे ठरवलेत त्याप्रमाणे शिक्षा. तुम्ही दया करा म्हटलेत म्हणून मी तिला कमी शिक्षा देत आहे. चला न्या त्यांना.’

‘काही करता नाही का येणार? ती खरेच निरपराधी आहे. निरपराध्याला शिक्षा नको.’

‘परस्परविरूध्द तुम्हा सर्वांचे लिखाण झाले आहे. परंतु आता ते वज्रलेप. तुम्ही अपील करा. प्राण घेण्याचा हेतू नव्हता. हे शब्द तुम्ही त्यावेळेस का जोडले नाहीत?’ न्यायाधीश म्हणाला. हत्यारी पोलीस कैद्यांना नेऊ लागले. रूपा रडू लागली.

‘मी निरपराधी आहे.’ ती म्हणाली.

‘या सटवीमुळे आम्हाला शिक्षा.’ ती दुसरी दोघे म्हणाली. रूपाने प्रतापकडे केविलवाण्या दृष्टीने पाहिले. तिची बाजू घेऊन तोच शेवटी जरा बोलला. तिने का त्याला ओळखले होते? नाही.

हत्यारी पोलीस आरोपींना घेऊन चालले. सायंकाळची वेळ होती. ती भुकेने व्याकूळ झाली होती. रस्त्यांत कोणी खात होते. तिला वाटले मागावा मूठभर चिवडा. आणि शिक्षा झाली! कोठे पाठवणार? परप्रांतात की अंदमानात? निराशेने ती रडत होती. ज्यांनी तिला अपराधी ठरविले तेच लोक त्या वेश्यागारात खेटे घालणारे! काय विचित्र प्रकार! हळूहळू तिचे दु:ख गोठले. ती जणू दगडाची झाली. इतक्यात तिला पाच रूपये कोणीतरी आणून दिले. वेश्यागाराच्या मालकिणीने तिला ते पाठविले होते!

‘मला ब्रेड घेऊन द्या.’ ती पोलिसांना म्हणाली. त्यांनी तिला तो घेऊन दिला आणि तुरूंगाच्या दाराशी सारी आली. तेथे दुसर्‍या तुरूंगात नवीन कैद्यांची एक टोळी आली होती. ते तेथे बसलेले होते. त्यांत कोणी तरूण होते, कोणी म्हातारे. कोणाच्या दाढया वाढलेल्या, तर कोणाच्या डोक्याचे गोटे केलेले. अंगावर ते विद्रूप कपडे. तोंडावर दु:ख, निराशा, धूळ. कैद्यांना अशा रीतीने वागवण्यात येते की आपण स्वाभिमानी माणसे आहोत, असे त्यांना वाटू नये. त्यांना टोपी देतील तिला कसलाही आकार नसतो! सारा माणूसघाणा प्रकार.

परंतु त्या आलेल्या कैद्यांत कोणी अट्टल काळा टोपी कैदी होते. रूपाला बघताच एकजण म्हणाला,

‘अरे ती बघा फाकडी. आहे की नाही नंबरी जाणे?’

‘अग, इकडे ये. मीच तुझा खरा यार. मला ओळखलेस की नाही?’

एकाने तिला खडा मारला. इतक्यांत त्या टोळीवरचे पोलिस आले.
‘हरामखोर, पाजीपणा करतोस?’ असे म्हणून एका पोलिसाने त्याला ठोसा मारला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to नवजीवन


जगातील अद्भूत रहस्ये
इसापनीती कथा २०१ ते २५०
शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha
भूत बंगला
विश्राम
महात्मा गौतम बुद्ध
रामाचा शेला
संध्या
धडपडणारी मुले
इस्लामी संस्कृति
आजही अश्वत्थामा जिवंत आहे का ??
नलदमयंती
मराठी फॉर्वर्डस 2
खुनी कोण ?- भाग तिसरा
भारतातील १२ धोकादायक ठिकाणे -वाचून हादरून जाल !