त्याची सद्सदविवेकबुध्दी आज चांगलीच जागी झाली. ध्येयार्थी जीवन आणि चाललेले जीवन यांत त्याला अपार अंतर दिसले. किती तरी विरोध दिसला. विसंवाद दिसला हे अंतर मला काटता येईल का? पूर्वीही एके काळी परिपूर्णतेकडे माझे डोळे होते. परंतु मी पडलो, अध:पतित झालो. आता पुन्हा परिपूर्णता दिसत आहे. मी पुन्हा चढू पाहात आहे. आणि पुन्हा घसरलो तर? पुन्हा प्रयत्न कर. अरे, असा पुन:पुन्हा धडपडणारा तू का एकटाच आहेस? सारी मानवजात अशीच धडपडत आहे. नदी धडपडत वेडीवाकडी जात पूर्णतेच्या सागराकडे जात आहे. तू जागा झालास याची धन्यता मान. तू स्वत:ला तिरस्कृत नको समजू. जागृती येणे हेही भाग्याचे, सुदैवाचे चिन्ह समज.
प्रताप पुन्हा चढण चढायला, कामक्रोधाचे दुर्लंघ्य पर्वत ओलांडून पलीकडील अनंताचे दर्शन घ्यायला हिमतीने उभा राहिला. तो मनात म्हणाला, ‘सर्वांना मी सत्यकथा सांगेन. अत:पर दंभ नको. मला प्रेमात ओढू पाहणार्या त्या तरूणीला मी सांगेन की, मी व्याभिचारी आहे आणि ती रूपा, तिच्याशी मी लग्न लावीन. ती वेश्या नाही. मी सारी जमीनही वाटून देईन. मी रूपाला सांगेन की मी तुला फसविले. मी तिची क्षमा मागेन. तिला मी सुखी करीन. जरुर तर तिच्याजवळ मी लग्नही करीन.’ असे विचार मनात करीत होता. त्याने ईश्वराला हात जोडले. तो म्हणाला, ‘प्रभो, मला हात दे. मी तुझे लेकरू. मला पुन्हा पडू देऊ नकोस. मला नीट मार्गाला लाव. मला शिकव. प्रकाश दे. ये, देवा, माझ्या हृदयात ये आणि पुन्हा तेथून जाऊ नकोस. मला शुध्द कर, निर्मळ कर.’ त्याने अशी मन:पूर्वक प्रार्थना केली. त्याच्या हृदयातील देव जागा झाला होता. त्याला आता जरा हलके वाटले. आपण पुन्हा मुक्त, स्वतंत्र झालो, मोहाच्या, विकारांच्या, इंद्रियांच्या मगरमिठीतून सुटलो, असे वाटून त्याच्या तोंडावर सात्त्वि प्रभा पसरली. त्याचे डोळे सौम्य, स्निग्ध नि शान्त दिसू लागले. त्याचे हृदय आनंदाने भरभरून आले. जीवनांत पुनरपी सत्य आले; श्रध्दा आली; सच्चिदानंद आला. जे जे परमोच्च आहे, उत्कृष्ट आहे ते ते करण्याचा प्रयत्न करीन असा त्याला आत्मविश्वास वाटला. जे जे शक्य ते ते मी सारे करीन असे तो मनात म्हणाला. त्याचे डोळे घळूघळू लागले. ते अश्रू आनंदाचे होते नि दु:खाचेही होते. आत्मजागृती आली म्हणून आनंदाचे अश्रू येत होते; इतके दिवस आपण असे केवळ तमोगुणी बनलो, अज्ञानाच्या, मोहाच्या झोपेत गुंगून राहिलो, असे मनांत येऊन, स्वत:चा अध:पात डोळयांसमोर येऊन दु:खाचे अश्रूही येत होते. गंगाजमुनांचे पावित्र्य त्या उभयविध अश्रूंत होते.
त्याला आता उकडत होते. त्याने खिडकी उघडली थंडगार वारा आला. बाहेर शान्त, स्वच्छ चांदणे पडले होते. बागेतील झाडांच्या छाया दिसत होत्या. एकमेकांत गुंतलेल्या छाया. पलीकडे बागेची काळी भिंत दिसत होती. तो बघत राहिला. ही सृष्टी किती सुंदर, निर्मळ असे तो मनांत म्हणत होता. ‘प्रभो, आज किती दिवसांनी हा आनंद मी भोगीत आहे. किती मोकळे, प्रसन्न मला वाटत आहे.’ असे कृतज्ञतापूर्वक हात जोडून म्हणाला. त्याची जणू समाधी लागली.