प्रतापने साधेपणाने राहायचे ठरविले. एवढे मोठे घर कशाला? नोकरचाकर कशाला? घर विकूनच टाकले तर? परंतु जर रूपाशी लग्न केले तर राहायला नको का? सध्या भाडयाने दिले तर नाही का चालणार? किती तरी भाडे येईल! आपण लहानशी खोली घेऊन रहावे. असे विचार त्याच्या मनांत येत होते. त्याने घरातील मोलकरणीस बोलावले.

‘हे घर मी भाडयाने देऊ इच्छितो. तुम्ही वाटले तर माझ्या बहिणीकडे जा. आता मी एकटा कोठे तरी राहीन.’

‘मी कोठे जाऊ? मी या घरात चाळीस वर्षे काम करीत आहे. तुझी आई मेली. तिच्या आत्म्याला काय वाटेल? या घरात भाडेकरी? तुला का भीग लागली आहे? भिकार्‍यासारखा का एखाद्या खोलीत राहणार? मी या घरातून जाणार नाही. मी हे तुला भाडयानेही देऊ देणार नाही. तू याच घरात राहा. घरी जेवत जा. तुला झाले आहे काय? लग्न का नाही करीत? नीट संसार कर. म्हणे घर विकावे. भाडयाने घ्यावे! ते काही नाही. मी तुझी काळजी घेईन. तुझ्या आईने मला सांगितले आहे.’ ती म्हातारी मोलकरीण म्हणाली.

ती मोलकरीण मोठमोठयाने बोलत होती. तो मंद स्मित करीत होता. शेवटी म्हणाला,

‘बर तर. काही दिवस राहू दे घर. जशी तुझी इच्छा.’

‘असा शहाणा हो. डोक्यात राख घालून का बोवाजी व्हायचे आहे? कशाला कमी नाही. बापाची जमीन वेडयासारखी देऊन टाकलीस. आता आईची, मावश्यांची आहे. ती तरी सांभाळ. नीट नावलौकिक मिळव.’

उपदेश करून ती कामाला निघून गेली.

प्रतापराव रूपाला भेटू इच्छित होता. परवानगी काढण्यासाठी एका सरकारी अधिकार्‍याला भेटणे जरूर होते. म्हणून तो बाहेर पडला. तो अधिकारी घरातच होता.

‘काय आहे काम?’ त्याने विचारले.

‘मला कैद्याला भेटायचे आहे.’

‘शिक्षा लागली आहे का?’

‘हो. मी अपिल करणार आहे.’

‘अपिलाचे होईल तेव्हा होईल. तो कैदी तुरूंगात असेल. ठराविक दिवशीच कैद्यांची भेट घ्यायला येते.’

‘ते मला माहीत आहे. परंतु मला आजच भेट हवी आहे. तुम्ही चिठ्ठी दिलीत तर काम होईल. ती एक निरपराधी आहे.’

‘अहो, तुम्हांला सारी दुनिया चांगली दिसते. परंतु तशी वस्तुस्थिती नसते. गुन्हे फार वाढले आहेत. कालच एक खटला चालला होता. एका तरूणाने चटयांचीच चोरी केली. त्याला एक जिनगर दोस्त होता. त्या जिनगरच्या मदतीने त्याने कुलूप फोडले आणि चटया लांबविल्या. काय करायचे सांगा. तो जिनगर कच्च्या कैदेतच मेला. या पोराला तीन वर्षांची शिक्षा झाली. घरे फोडायची, दुकाने फोडायची! भयंकर प्रकार!

‘तो तरूण का बेकार होता?’

‘संपात त्याची नोकरी गेली. झाला बेकार. यांना येता जाता संप हवेत. बेकार होतात. मग चोर बनतात.’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel