मोठया मिश्या होत्या. परंतु त्याच्या चेहर्यात असा फरक होता म्हणून तिने त्याला ओळखले नाही असे नव्हे. तिने त्याची स्मृतीच पुसून टाकली होती. विशेषत: त्या रात्रीच्या प्रसंगी. कोणती रात्र? तो ज्या गावी रूपा होती, त्या गावच्या स्टेशनवर उतरला होता. तो घरी गेलाही नाही. ती गरोदर होती. तिने त्याला चिठ्ठी पाठविली. त्याचे उत्तर आले की ‘मी येऊ शकणार नाही.’ शेवटी ती स्वत: रात्री दोन वाजता स्टेशनवर गेली. गाडीच्या वेळेवर तरी भेटेल, म्हणून ती गेली. रात्री पाऊस होता. सोसाटयाचा वारा होता. ती अंधारातून त्याला भेटण्यासाठी स्टेशनवर गेली, तो स्टेशनवर गाडी आली होती. तो डब्यात बसला होता. कोठल्या डब्यात ती त्याला शोधणार? त्या स्टेशनात गाडी फक्त तीन मिनिटे थांबे. ती धावत होती. तिला पहिल्या वर्गाच्या डब्याच्या खिडकीजवळ तो दिसला. त्या डब्यात झगमगीत प्रकाश होता. तो हसत होता. त्याच्या अंगावर गरम कपडे होते. बाहेरचा वारा-पाऊस आत येऊ नये म्हणून खिडकी लावलेली होती. रूपा गारठून गेली होती. तिने खिडकीवर जोराने मूठ मारली. परंतु शेवटची घंटा होऊन जरा मागे येऊन गाडी निघाली. पत्ते खेळणार्यांपैकी एकजण खिडकीजवळ येऊन बाहेर पाहू लागला. पुन्हा तिने खिडकीजवळ तोंड नेले. गाडीला वेग आला. ती पळत होती. तो खिडकी खाली करू पाहात होता. ती घट्ट बसली होती. गाडी अधिकच वेगात आली. ती धावत आली. शेवटी फलाट संपण्याची वेळ आली. ती खाली पडली असती. परंतु सावरली. ती रेल्वेच्या रस्त्याने पळत होती. पहिल्या वर्गाचे डबे गेले. तरी ती पळत होती. आता शेवटचा डबाही गेला! ती पुढे जात होती. गाडी निघून गेली. पाण्याची उंच टाकी आता आली. वारा भयंकर होता. रूपाच्या अंगावरची शाल उडून गेली. तिला भान नव्हते. अजून गाडी पकडू, त्याच्याजवळ बोलू असे जणू तिला वाटत होते. शेवटी तिचे पाय थकले. ‘गेला, गेला’ ती अत्यंत दु:खाने म्हणाली. ‘तो तिथे आत मऊ गाद्यांवर प्रकाशांत खेळत खिदळत आहे, आणि मी येथे अंधारात, उघडी, निराधार रडत आहे. देवा, काय करू! गेला, तो गेला.’ असे म्हणून ती तेथे बसली. ती ओक्साबोक्शी रडू लागली. अश्रू आवरत ना. काय करील बिचारी! येऊ दे एखादी गाडी नि माझा चेंदामेंदा करू दे, असे ती मनात म्हणाली. परंतु पोटात बाळ होते. मरून प्रतापवर सूड उगवण्याचा तिचा विचार विरून गेला. त्या अज्ञात बाळाने तिला त्या विचारापासून परावृत्त केले. प्रतापविषयी तिच्या मनातील तीव्र कटुता नाहीशी झाली. ती उठली. तिने आपली शाल घेतली. तिने ती नीट अंगाभोवती गुंडाळली. पोटातील बाळाला ती जपत होती. अंधारातून ती घरी गेली.
त्या रात्रीपासून देवाधर्मावरचा, मानवावरचा, सत्यावरचा, न्यायावरचा, प्रेमावरचा, सर्व मांगल्यावरचा तिचा विश्वास उडाला. पूर्वी ती श्रध्दावान होती. देवांची पुजा करी, प्रार्थना करी. हितमंगलावर ती विश्वास ठेवी. आणि तिला वाटत असे की, दुसरेही असेच विश्वास ठेवणारे असतील. परंतु त्या रात्रीचा तो कठोर अनुभव, वेदनादायी अनुभव आला नि तिची श्रध्दा कायमची भंगली. देवधर्म म्हणजे केवळ शब्द आहेत. जगात सारा दंभाचा पसारा आहे. सत्यावर खरे पाहिले तर कोणाचाच विश्वास नसतो, असे तिला आता वाटू लागले.