‘बायकांना कोठे भेटायचे?’ त्याने विचारले.
‘इकडे. कोणाला भेटायचे आहे? राजकीय बाई की गुन्हेगार कैदी बाई?
‘कैदी, शिक्षा झालेली गुन्हेगार स्त्री.’
रूपाला बोलावले गेले.
‘कोण आले मला भेटायला?’ ती आश्चर्याने म्हणाली.
वेश्यागारातून कदाचित कोणी आले असेल, असे तिला वाटले. तिकडे प्रताप उत्सुकतेने वाट बघत होता. ती आल्यावर काय बोलायचे याचा विचार करीत होता. आणि रूपा आली. गजांजवळ ती उभी राहिली. आणि तो या बाजूने उभा होता. आजूबाजूला इतर भेटी चालल्या होत्या. त्यांच्यादेखत काय बोलणार?
‘कोण आले आहे मला भेटायला? तुम्ही का?’ तिने विचारले.
‘हो.मी.. मी आलो आहे... रूपा मी.’
ज्या गोष्टींची कधीही ती आठवण होऊ देत नसे, त्या सार्या घों करून हृदयात वर आल्या. तिच्या तोंडावरचे स्मित लोपले. दु:खाची दारूण छटा, करूण छटा तिच्या तोंडावर पसरली.
‘तुम्ही काय म्हणता ते मला नीट ऐकूही येत नाही.’ भुवया आकुंचित करीत, कपाळाला आठया पाडीत ती म्हणाली.
‘रूपा, मी आलो आहे.’
असे म्हणतांना त्याच्या डोळयांतून अश्रू आले. त्याचा कंठ दाटला. त्याने मोठया प्रयासाने भावना आवरून अश्रू पुसले. तिने त्याला ओळखले.
‘तुम्ही त्याच्यासारखे दिसता... परंतु मला काही आठवत नाही.’ ती त्याच्याकडे न बघता म्हणाली.
तिचा चेहरा अधिकच खिन्न झाला.
‘रूपा, तुझी क्षमा मागायला मी आलो आहे.’ एखादा पाठ केलेला धडा म्हणावा त्याप्रमाणे त्याने वाक्य म्हटले.
त्याला लाज वाटत होती. त्याचा चेहरा अती करूण दिसत होता. तो पुन्हा म्हणाला,
‘मी तुझा मोठा अपराध केला आहे. मी गुन्हेगार आहे. क्षमा कर.’
त्याला अधिक बोलवेना. त्याने तोंड वळवून अश्रू पुसले. तेथे एक अधिकारी होता. तो म्हणाला, ‘तुम्ही रडता काय? तुम्ही दोघे बोला. वेळ संपेल.’
‘या गजींतून बोलायचे कसे?’ प्रतापने विचारले.
‘तिला इकडे बाहेर आणू नका. येथे बसून तुम्ही बोला.’ तो अधिकारी म्हणाला.
आणि रूपा बाहेर आली. जवळच प्रताप बसला. हिय्या करून तो म्हणाला,