‘तुरूंग ही सुधारण्याची जागा? तेथे जाऊन अधिकच बिघडतात व्यक्ती.’
‘मग करायचे तरी काय?’
‘फौजदारी कायदा म्हणजे सारे थोतांड आहे.’
‘मी तर रोज त्याचेच समर्थन करीत असतो.’
‘ते तुमचे तुम्ही पाहा. परंतु मला ते सारे अमानुष वाटते, अर्थहीन वाटते.’
‘तुम्हांला अर्थहीन वाटते ते दुसर्यांना वाटत नसेल. मला असे वाटले असते तर मी नोकरी करताना दिसलो नसतो?’
मेव्हणे उठले. त्यांना का प्रतापचे म्हणणे लागले? त्यांचा अहंकार, स्वाभिमान का दुखावला गेला? त्यांच्या डोळयांत का अश्रू चमकले. ते आरामखुर्चीत जाऊन पडले, सिगारेट पेटवून धूर सोडू लागले.
बहिणीचा निरोप घेऊन तो गेला. वादविवादाच्या भरात आपण उगीच मन दुखेल असे बोललो. आपण बाजू मांडली. ती खरी असली तरी सौम्य रीतीने मांडता आली असती असे मनात येऊन दु:खी झाला.
आज तुरूंगातून जवळ जवळ सहाशे कैदी काळया पाण्यावर पाठवण्यांत येणार होते. त्यांत पन्नास स्त्रिया होत्या. प्रताप त्यांच्याबरोबर जाणार होता. कैद्यांची खास गाडी आधी जाणार होती. प्रतापला त्या गाडीने जाता येत नव्हते. नंतर दोन तासांनी निघणार्या गाडीने तो जाणार होता. त्याने सारी तयारी केली. खोल्यांचे भाडे दिले, जरूर तेवढे कपडे नि पैसे घेऊन तो निघाला.
तो तुरुंगाच्या दाराजवळ आला. दुपारची वेळ, उन्हाळयाचे ते दिवस. आणि कैदी बाहेर काढण्यात येत होते. सर्वांची नोंद होत होती. खाणाखुणा तपासण्यांत येत होत्या. सर्वांना तो एकरंगी कैदी पोषाख, त्या विचित्र टोप्या डोक्यांत. मानवतेला न शोभणारे सारे असायचे. त्या कैद्यांत म्हातारे होते, तरूण होते, अशक्त होते, सशक्त होते. स्त्रिया होत्या. काहींची मुले बरोबर होती. तिकडे काळया पाण्यावर त्यांना एकत्र राहता आले असते. त्या सर्वांचे सामान लॉर्यांत घालण्यांत आले. अत्यंत अशक्त नि आजारी कैद्यांना त्यांत बसविण्यांत आले. बाकीचे कैदी रांगेत उभे होते. दोघादोघांना हातकडयांनी एकत्र बांधण्यांत आले होते. ते पाहा हत्यारी पोलीस. त्यांच्या स्वाधीन सारे कैदी करण्यांत आले.
ती बघा रूपा. प्रतापने तिला ओळखले. तो धावत तेथे गेला. तिच्याजवळ एक गरोदर स्त्री उभी होती. उन्हाने ती कोमेजून गेली होती. तिच्या पोटांत कळा येत होत्या. परंतु तेथे माणुसकीला जागा नव्हती. आणि ती एक शेतकरीण तेथे होती. प्रतापने तिची हकीगत मागे ऐकली होती.नवर्याचा एकदा तिला राग आला होता. भाकरीत विष घातले तिने. ती तुरुंगात गेली. परंतु घरी शेतीच्या कामाचे दिवस. नवरा मेला नव्हता. तिलाही तुरुंगात वाईट वाटले. खटला भरण्याच्या आधीच त्याने तिला सोडवून आणले. आणि ती म्हणाली, ‘मी वेडयासारखे काहीतरी केले. क्षमा करा.’ ‘अग, क्षमा कधीच केली.’ तो म्हणाला. ती सासुसासर्यांच्या पाया पडली. आणि शेतात कामाला जाऊ लागली. कापणीचे दिवस. खसाखसा विळा चालवी. रात्री दोर वळून ठेवी सकाळी कापलेल्या धान्याच्या जुडया बांधायला. सासूसासर्यांना सून फारच आवडू लागली. चार दिवस तुरुंगात जाऊन आली परंतु तिच्यात केवढे परिवर्तन! आणि एक दिवस पुन्हा पोलीस आले. म्हणाले, हिच्यावर खटला भरायचा आहे. नवरा म्हणाला, ‘आमचे काही म्हणणे नाही. तिला आम्ही क्षमा केली आहे.’ सासूसासरे रडू लागले. परंतु तिला खुनी म्हणून नेण्यांत आले. आणि तिला काळया पाण्याची शिक्षा झाली. तिचा नवरा मागूनच्या गाडीने जाणार होता. तोही तिच्याबरोबर स्वेच्छेने काळे पाणी भोगायला जाणार होता. रूपाजवळ ती तरूण पत्नी उभी होती.