त्या तुरुंगात अनेक राजकीय कैदी होते. एकेका खोलीत एकेक जण. आम्ही भिंतीवर नाना प्रकारचे आवाज करून एकमेकांस संदेश पाठवीत असू. कधी पहारेकरी अनुकूल असला म्हणजे क्रांतीची गाणी गात असू. आमच्या त्या रांगेतच दोन सुकुमार मुले पकडून आणून ठेवण्यात आली होती. खेळकर मुले; त्यांचा काही अपराध नव्हता. बाँब तयार करण्याच्या कृतीची पुस्तके म्हणे त्यांच्या खोलीत सापडली. ती मुले उत्साहानी उतू जात होती. कधी त्यांना बाहेर काढीत तेव्हा ती दिसत. माझ्या खोलीजवळ येत. रात्री गाणे गा म्हणून मला सांगून जात. तो एक मुलगा तर पंधरा-सोळा वर्षांचा होता. तोंडावर कोमल लावण्य. डोळे तेजस्वी, खेळकर नि चंचल. नाक कसे होते? सुंदर, सरळ. ओठ कोवळे लाल. लांब हात. गोरा गोरा पान होता अंगाचा रंग. डोक्यावर काळेभोर केस. तो सुंदर भांग पाडी. जणू सृष्टीचे तो संगीत होता. दुसरा तरूण थोडा मोठा होता. वृत्तीने जरा गंभीर होता. परंतु त्याचेही वय फार नव्हते.

एके दिवशी त्यांना खटल्यावर नेण्यात आले. त्यांना म्हणे फाशीची शिक्षा देण्यात आली. हे न्यायाधीश की मांग? पाशवी सत्तेचे लाचार अंमलदार! त्या दोघांना वाटले की, ही थट्टा आहे. त्यांना वाटले की फाशीची शिक्षा रद्द होईल.

परंतु एके दिवशी सुतार आले. त्यांनी फाशीची चौकट तयार केली. पहारेकरी सायंकाळी येऊन आम्हांला म्हणाला, ‘उद्या त्या दोघांना फाशी देणार’ आम्हा सर्वांना कळली ती बातमी. सर्वत्र नि:स्तब्धता होती. रात्री ना भिंतीवर टकटक, ना गाणे. त्या दोन तरूणांना ते वातावरण असह्य झाले. ते आपापल्या कोठडयांतून ओरडून म्हणाले, ‘अरे, कोणी गाणे. असे का सारे मेल्यासारखे.’ परंतु त्याचे ते शब्द ऐकून माझे मन द्रवले, अती दु:खी झाले. रात्रभर आम्हांला झोप नाही.

पहाटेची वेळ झाली. पाखरे किलबिल करू लागली होती. तुरुंगातील झाडांवरही पक्षी असत. पहाटेचा जीवनदायी वारा येत होता. लौकरच प्रभात होणार होती. सृष्टीत नवचैतन्य येणार होते. सूर्य उगवणार होता. अशा वेळेस बुटांचे अनेक आवाज ऐकू आले.
‘चला उठा. तुमचा स्वच्छ सदरा घाला.’ असे त्या तरूणांस सांगण्यात आले.

‘कोठे नेणार आम्हांला?’

‘मग सांगू.’

‘आणि सुंदर सुकुमार किशोराने स्वच्छ कपडे घातले. तेल लावून त्याने भांग पाडला. सारे स्वच्छ सुंदर होते. आणि त्या दोघांना बाहेर काढण्यात आले. तो जरा प्रौढ असलेला तरूण माझ्या दाराशी आला. मी उभा होतो. माझे डोळे सजल होऊ पाहात होते.

‘सिगरेट द्या.’ तो म्हणाला.

परंतु त्याच्याबरोबरच्या अधिकार्‍यानेच त्याला दिली नि काडी ओढून ती त्याने शिलगावली. त्या अधिकार्‍याच्या मुद्रेवर करूणा होती. वेदना होती. त्या तरूणाने ‘अच्छा, नमस्ते’ म्हणले. आणि किशोर माझ्या कोठडीजवळ आला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel