‘तुमची संमती आहे तर?’
‘मी तीच्याजवळ बोलेन. तिलाच जरा इकडे पाठवा.’ प्रसन्न गेला. रूपा अरूणाजवळ काही तरी बोलत होती.
‘काय रे प्रसन्न, काय ठरले? अरूणाने विचारले.
‘ते रूपाला बोलावीत आहेत.’ प्रसन्न म्हणाला.
‘जा रूपा.’ अरूणा म्हणाली.
‘मी जाऊन काय बोलू? त्यांच्यासमोर माझी मान खाली होते. माझ्यासाठी का ते इतके करतात? मी एक सामान्य स्त्री, पतित, हीनदीन स्त्री.’ रूपा दु:खाने म्हणाली.
‘रूपा, असे कधी स्वत:ला म्हणत जाऊ नकोस. सर्वांमध्ये दिव्यता आहे. सारे चढणारे व पडणारे. कधी न पडला असा जगात कोण आहे? अहंकार कोणासच नको.’ प्रसन्न म्हणाला.
रूपा प्रतापकडे आली. दोघे मुकी बसली होती. रूपाने केस मागे सारले. वारा येऊन पुन्हा बट पुढे येई.
‘रूपा,’ प्रतापने आरंभ केला.
‘काय?’
‘मग तू काय ठरवलेस?’
‘प्रसन्न बोलले ना?’
‘तुझी नि त्यांची दोन दिवसांची ओळख.’
‘हृदये क्षणात अनंत बोलू शकतात. डोळे क्षणात अपार बघू शकतात.’
‘खरे आहे. तुझे का त्यांच्यावर प्रेम आहे?’
‘ते मला आवडतात. दोघांनाही काळया पाण्याची शिक्षा. त्यांचे विचार आवडतात. मी शिकेन, चांगली होईन, तुमची संमती द्या.’
‘रूपा, माझा निश्चय अभंग होता. असे काही होईल अशी मला कल्पना नव्हती. मी नको तर तुला?’
‘तुम्ही माझ्यासाठी का हा त्याग करता? तुम्ही का मानसिक आणि शारिरीक कष्ट सहन करता?’
‘मला त्रास नाही होत. माझ्या उध्दारासाठीच हे सारे आहे. तुझ्या उपयोगी पडावे हीच माझी इच्छा.’
‘परंतु आम्हांला कशाची जरूरी नाही.’ आम्हांला असे म्हणताना ती चमकली. ती बावरली. तिने वर पाहिले. पुन्हा ती म्हणाली, ‘माझ्यासाठी तुम्ही पुष्कळ केलेत. तुम्ही नसतेत तर...’ तिचा कंठ दाटून आला. तिला पुढे बोलवेना.