प्रकरण १९
“ अगदी थोडक्यात बचावलो ”  पाणिनी म्हणाला.
“ गौतम कडून पोलिसांना गेलेला फोन ? ” सौम्या
“ हं, मॉडेल एजन्सी कडून आलेल्या त्या पत्रात नेमक्या कुठल्या नावाची मॉडेल एजन्सी होती ते लक्षात आहे? ”
“ नाही आठवत. ऐश्वर्या मॉडेल एजन्सी असे नाव होत असं पुसटसं वाटतंय.”
“ आपण जरा समोरच्या हॉटेलात जाऊन डिरेक्टरी चाळू आणि ऐश्वर्या मॉडेल  एजन्सी सर्च करू. दरम्यान मी कनक ओजस ला फोन लावतो.”  पाणिनी म्हणाला.
ते दोघे हॉटेलात गेले.कनक फोन  वर आला 
“ तुझ्यासाठी एक वाईट बातमी आहे पाणिनी. डाका पडलेल्या गाडीतून पळवली गेलेली पर्स मरुशिका ची नाही असं तुला वाटत होतं ना? ते चुकीचं आहे. ती तिचीच आहे. मी कसं शोधलं हे ऐकण्यात तुला रस नसतो हे मला माहित्ये, पण पाणिनी, ती पर्स ही वेगळ्या चामड्याची आहे. हाताने कमावलेल्या चामड्याची. अशा पर्स दुकानात विकायला ठेवल्या जात नाहीत. ज्यांना अशा चामड्याच्या वस्तू वापरण्याचा षोक असतो ते थेट उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या कारखान्यातूनच खरेदी करतात.मी त्या उत्पादकाला गाठले  त्याला मरुशिका चा फोटो दाखवला. त्याने तिला लगेच ओळखलं कारण ती त्यांची नियमित खरेदी करणारी ग्राहक आहे.”
“ दुर्दैवच आहे हे माझं. मी अशा गृहितावर काम करत होतो की त्या गाडीत कामोद बरोबर असणारी स्त्री मरुशिका नव्हतीच म्हणून. पण आता ती पर्स तिची असेल तर गाडीत तीच होती हे सिध्द होईल आणि ते आपल्याला नाही परवडणार. तिने ती पर्स दुसऱ्या कोणाला वापरायला दिली असू शकते. ”  पाणिनी म्हणाला.
“ ती शक्यता फार कमी आहे.बायका आपली पर्स दुसऱ्या बाईला देत असतील उधार म्हणून असं मला नाही वाटत.” कनक म्हणाला.
“ तुला दिलेल्या दुसऱ्या कामाचं काय झालं? म्हणजे कामोद ला मैत्रिणी वगैरे आहेत का? काही लफडं आहे का?”  पाणिनी ने विचारलं.
“ त्याला कोणीही मैत्रिणी नाहीत.अत्यंत एकलकोंडा माणूस आहे तो. विधूर आहे श्रीमंत विधुर. मनात आलं तर तो कुठल्याही बाईला फिरवू शकतो, आणि त्या प्रसंगी त्याच्या बरोबर कोणी बाई असती तर त्याने ते नाकारण्याचे कारणही नाही.” कनक ओजस म्हणाला.
 
“ पण ती बाई जर विवाहित असेल आणि तिचा नवरा... ”  पाणिनी म्हणाला.
“ पाणिनी, तुझा हा विचार, एक शक्यता म्हणून ठीक आहे.म्हणजे त्याच्या बरोबर कोणीतरी विवाहित स्त्री असेल आणि तिने मरुशिका ची पर्स घेतली असेल .... अरे बापरे फारच कमी शक्यता आहे. तुझ्या भडिमारापुढे मरुशिका चा उडालेला गोंधळ, तपशील देताना तिची उडालेली तारांबळ , याच दुसरंच काहीतरी कारण असावं की ज्याचा तपशील देण्याचं धैर्य तिच्यात नव्हतं.” ओजस म्हणाला.
“ तुझं काम चालू ठेव कनक.” पाणिनी म्हणाला.
“ पाणिनी, तुला माझा सल्ला आहे, हे सगळ थांबावं तू. अनाठाई खर्च करत सुटला आहेस तू. त्याचे पैसे द्यायला तुझं अशील सक्षम नाहीये.”
“ कनक, किमान अजून एक दिवस तरी चालू ठेव. मला सोमवारी कोर्टात काहीही करून ......”
“ ठीक आहे पाणिनी.तू हट्टी आहेस. मला काय, मी तुला बिल लावणारच आहे.” कनक ओजस म्हणाला आणि त्याने फोन कट केला.
“ काय झालं सर?” सौम्या ने विचारलं.
पाणिनी ने तिला सगळी हकीगत सांगितली.
“ तुला  त्या मॉडेल एजन्सी बद्दल डिरेक्टरी मधे काही सापडलं?”  पाणिनी ने विचारलं.
सौम्या ने नकारार्थी मान हलवली.
आपण दोघांनी मिळून इथली सगळी वर्तमान पत्र वाचून काढू, त्यातल्या छोट्या जाहिराती खास करून.म्हणजे सौदर्य स्पर्धा, वाँटेड च्या जाहीतरी वगैरे. बघू नशीब असेल तर सापडेल.
पुढच्या अर्धा तास त्या दोघांनी  जवळ जवळ तिथे ठेवलेली सर्व च्या सर्व वर्तमान पत्र चालून काढली. शेवटी सौम्या चं नशीब फळफळलं.
“ सर हे बघा, ” तिने पाणिनी ला जाहिरात दाखवली.
पाहिजेत.....
21 ते 29 वयोगटातील आकर्षक युवती. प्रवासाची आणि
साहसाची आवड असलेल्या. मॉडेल म्हणून रोजगार मिळवण्याची इच्छा असणाऱ्या.
परदेशी मालकीच्या स्टीमशिप, विमान आणि अशा इतर ठिकाणी काम करू शकणाऱ्या.
फोटोग्राफीसाठी मॉडेल. अर्जदार साधारणपणे सरासरी असावेत
पण दिसायला आकर्षक. खूप लठ्ठ नाही, खूप बारिक नाही, खूप उंच नाही, खूप  बुटक्या नाही
सरासरी दिसायला चालणारी.
अर्ज करा:-
ऐश्वर्या मॉडेलिंग एजन्सी.पोस्ट बोक्ष नंबर ६७९१
 
“ याच जाहिरातीला सिया माथूर ने अर्ज पाठवला असावा आणि त्याला उद्देशून तिला उत्तर आलं असावं जे आपण तिच्या टेबल वर पाहिलं. मरुशिका ने तेच पत्र आणायला गौतम ला पुन्हा पाठवलं असावं.”
“ ते पत्र एवढ का महत्वाचं असावं?” सौम्या ने विचारलं.
“ तेच मला समाजावं अशी माझी इच्छा आहे.”  पाणिनी म्हणाला.
 
“गौतम पिसे ची माहिती मिळाली कनक?” दुसऱ्या दिवशी कनक ला पाणिनी ने विचारलं.
“ तो बोगस माणूस आहे.तू दिलेल्या लायसेन्स वरून मी  सातपाटी मधला पत्ता शोधला.तो अस्तित्वातच नाही. या वरून असं दिसतं की त्याच्या कडे दोन लायसेन्स असावीत.खऱ्या नाव पत्त्याची आणि एक खोट्या नावाची.”—कनक
“ मला तो माणूस हवाय काहीही झालं तरी.”  पाणिनी म्हणाला.
“ तो तुझ्या बरोबर होता तेव्हा तू मला फोन केलं असतास तर मी माझ्या विलासपूर च्या एजन्सी मार्फत त्याला ताब्यात घेतला असता.”
“ तेवढी तातडीची हालचाल दोघांनाही शक्य झाली नसती त्यावेळी. जाऊ दे,कनक. ऐश्वर्या मॉडेलिंग एजन्सी च्या त्या पोस्ट बॉक्स नंबर वर तू तपास केलास?”
“ केला, पण फारसं काही समजलं नाही. त्या बॉक्स मधे जे येऊन पडतं ते एका पाकिटात टाकल जातं आणि ते पाकीट न्यायला एक माणूस अधून मधून येतो.तोच त्या वर्तमान पत्राला जाहिरातीचे पैसे चुकते करतो आणि निघून जातो.”—कनक
“ मी सौम्या आणि मृद्गंधा ला त्या जाहिरातीला प्रतिसाद म्हणून अर्ज करायला लावणार आहे. तू तुझ्या काही स्त्री गुप्त हेरांना पण अर्ज करायला लाव. त्यातल्या एखाद्या अर्जाचा तरी स्वीकार होईल.”  पाणिनी म्हणाला.
“ आणखी तुला काय हवय माझ्या कडून? कोर्टात काय करणार आहेस तू नेमकं?” कनक ओजस ने विचारलं
“ मी अजून ठरवलं नाही पण प्रत्येक तांत्रिक मुद्याचा फायदा उठवणार. सरकारी वकील जसजशी आपली खेळी खेळत जातील तसतसे मला त्यांच्या हातातले पत्ते समजत जातील आणि मी मग बरोब्बर माझं जाळं टाकीन.”.
“ न्यायाधीशांना मासेमारी आवडत नाही पाणिनी. त्यांना प्रत्येक गोष्ट अगदी पुराव्याने सिध्द व्हायला हवी असते.”
“ त्यांना मासे पकडायचे जाळे आवडत नसेल तर मी गळ टाकून बसेन कनक.पण मला ज्या क्षणी जाणवेल की गळाला लावलेल्या अमिषाला  मासा लागलाय, त्या क्षणाला मी काठीला असा काही झटका देईन की मासा कित्येक मीटर उंच उडून माझ्या टोपलीत पडेल.”  पाणिनी म्हणाला.   
“ तुला गळ मिळाला तर ! ” कनक ओजस खडूस पणे म्हणाला.
“ सिया मथूर चं काय? ”  पाणिनी म्हणाला.
“ मी हॉस्पिटल मधे जाऊन तिला पाहून आलो. ती तीच आहे पाणिनी, जिला मी  साक्ष देणासाठी तुझ्या ऑफिसात बसवून ठेवलं होतं. ”
“ तिची तब्येत कशी आहे आता?”
“ शुद्धीवर आल्ये ती. सुधारते आहे तब्येत.तिचा नवरा त्याच्या डॉक्टर ना घेऊन आला. डॉक्टर डोळे.नवऱ्याने आणि आईने डॉक्टर शुचिष्मंत ना झापडलं.” –कनक म्हणाला
“ तिचा कोण आला म्हणालास तू?” पाणिनी ने ओरडून विचारलं.
“ ओरडायला काय झालं? तिचा नवरा आला, तिची आई आली. मोठा तमाशा केला त्या लोकांनी. डॉक्टर शुचिष्मंत ना काही बोलण्यासारखं राहिलंच नव्हतं, त्यांनी सांगितलं की मला वॉचमन चा फोन आला की एका फ्लॅट मधे एक स्त्री बेशुद्ध पडल्ये म्हणून मी आलो आणि तिला इथे आणलं. वॉचमन ने अर्थात ते नाकारलं. डॉक्टर म्हणाले कोण बोलतोय  याची खात्री करण्यापेक्षा कोणाचा तरी जीव वाचवणे महत्वाचं होत म्हणून मी आलो. पुढे फार विषय वाढू नये म्हणून त्यांच्या डॉक्टरांच्या आणि नातलगांच्या हातात तिला सोपवून त्यांनी काढता पाय घेतला तिथून.तिला आता त्यांनी विसावा नावाच्या एका नर्सिंग होम मधे ठेवलंय. मला नाही वाटत डोळे डॉक्टर तिला कुणाला भेटून देतील म्हणून किंवा कोर्टात येऊ देतील म्हणून. ”
“ तिला काही झालेलं मला नाही.....”  पाणिनी म्हणाला.
“ काळजी नको करू पाणिनी,डॉक्टर डोळे हे निष्ठेने आणि तत्वाने प्रॅक्टिस करणारे आहेत.शिवाय तिचा नवरा आणि आई तिच्या सोबत आहेत.” कनक ओजस म्हणाला.
“ सिया ला तू भेटून आलास तर तिच्या अपार्टमेंट मधून अँम्ब्यूलन्स मधल्या माणसांनी कोणाला नेलं कनक?”
“ त्याची मी माहिती घेतली. अँम्ब्यूलन्स मधली माणसं तिसऱ्या मजल्या पर्यंत पोचली पण नाहीत.ज्या स्त्री ला त्यांनी नेलं ती त्यांना लिफ्ट मधेच दिसली.” कनक म्हणाला.
“ पण मग त्या मुलीच काय झालं ?”  पाणिनी म्हणाला.
“ जरा धीर धर पाणिनी. कालच मी या सर्वाची माहिती काढायला घेतल्ये. माझा अंदाज आहे की ज्या मुलीला अँम्ब्यूलन्स मधली माणसं घेऊन गेली, त्यांना वाटेतच लक्षात आलं असावं की की मुलगी प्यालेली आहे आणि त्यांनी तिला वाटेतच सोडून दिलं असावं. पाणिनी तुला एक सांगतो, डॉक्टर डोळे यांच्या पेशंट वर पोलीस लक्ष ठेचून आहेत.शिवाय ते विसावा नर्सिंग होम हे प्रख्यात आहे. तिथली एक नर्स माझ्या एका स्त्री गुप्त हेराची मैत्रीण आहे.नर्स ने तिला सांगितलं की ती सुधारते आहे पण नर्व्हस आहे.साक्ष द्यायला यायची तिची इच्छा नाही, काही ना काही कारणाने.म्हणूनच ती तेव्हा सुध्दा नाहीशी झाली होती.पण पाणिनी, मी खात्री देतो की ती सिया माथूरच आहे.” कनक म्हणाला.
“ तरीही मला वाटतंय की दोन वेगळ्या मुली असाव्यात.”  पाणिनी म्हणाला.
“ पण ही मुलगी सिया माथूरच आहे पाणिनी, जिला मी साक्षी साठी आणलं होतं. आणि जिला मी भेटून आलोय. हॉस्पिटल मधे.पण ती कोर्टात नाही येणार हे नक्की.”
“ विसावा नर्सिंग होम बाहेर तुझी माणसं ठेव. आणि डॉ.डोळे यांची सर्व माहिती काढ. सिया कोणत्याही परिस्थितीत तिथून निघून जाता कामा नये.”  पाणिनी म्हणाला.
पाणिनी पटवर्धन चे म्हणणे कनक ला पटलेले नाही हे त्याच्या चेहेऱ्यावरून दिसतं होते.
“ शेवटी की तुझी केस आहे आणि पैसा ही तुझा आहे पाणिनी.” कनक म्हणाला.
( प्रकरण १९ समाप्त)

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel