सूर्योदयाची मंद लाली निळ्याशार आकाशात पसरली होती. आकाशाचा तांबूस रंग शांतपणे वाहणाऱ्या नदीत जणू आपलं प्रतिबिंबच पाहत होता, इतकं विलोभनीय दृश्य गंगा तीरावर दिसत होतं. याच गंगा तीरावर वसलेलं भारतातलं पवित्र शहर म्हणजे काशी. शिखंडीच्या जन्माचे रहस्य आणि आयुष्याचे ध्येय हे याच शहरात उगमाला आलं. शिखंडीच्या आयुष्याचे ध्येय हे गंगेच्या पात्रा इतकं विशाल आणि खोल आहे यासाठी आपल्याला शिखंडीच्या आयुष्याचा पूर्वार्ध जाणून घेणे गरजेचे आहे.  समृद्धी नांदत असलेल्या या काशीच्या शहराची हि कथा. जिथे एका राजाला तीन मुली होत्या. अंबा, अंबिका आणि अंबालिका. या राजकन्या उपवर होताच त्याने तिघींचे स्वयंवर आयोजिले. देशो-देशीचे राजे-महाराजे स्वयंवराला उपस्थित राहणार होते.

राजाच्या थोरल्या राजकन्येचे अंबाचे मात्र या स्वयंवराचे मनात नव्ह्ते. अंबाचे शाल्व राजावर प्रेम होते आणि ती त्यालाच वरमाला घालणार होती. या सगळ्यात तिच्या मनाची घालमेल होऊ लागली. स्वयंवराचा दिवस जसजसा जवळ येईल तसतसे तिला शाल्व राजची जास्त आठवण येऊ लागली होती. तिला काहीच उपाय सुचत नव्हता जेणे करून ती शाल्व बरोबर विवाह करेल.

 पण मधेच माशी शिंकली आणि भीष्मांनी तिला तिच्या दोन्ही बहिणींसकट स्वयंवरातून हस्तिनापूरला पळवून नेले ते त्यांच्या भावाशी, विचित्रवीर्याशी, लग्न लावून देण्यासाठी. हस्तिनापूरात पोहचल्यावर अंबेने सत्यपरिस्थिती कथन करून तिला शाल्वकडे परत जाऊ देण्याची विनंती केली. विचित्रवीर्याने ती मान्य केली. पण शाल्वाने मात्र

“तू पर-पुरुषाच्या स्पर्शाने अपवित्र झाली आहेस” असे सांगून तिचा स्वीकार करण्यास नकार दिला.

अंबा बिचारी हस्तिनापुरास परतली आणि तिने विचित्रवीर्याला तिच्याशी लग्न करण्याची विनंती केली. विचित्रवीर्य तिला म्हणाला,

“मी तुला शाल्वराजाला भेट म्हणून दिली होती आणि दिलेली भेट मी परत घेणार नाही हा आमच्या कुळाचा अपमान आहे...!!”

असे सांगून विचीत्राविर्याने लग्नास नकार दिला. ती व्याकुळतेने आपली कथा सांगायला आणि आपल्याला न्याय मिळावा या उद्देशाने भीष्मांकडे गेली. अंबेची मनस्थिती कुणीही समजून घेऊ शकत नव्हते. तिला आपल्या प्रियकराकडून अचानक नकार आला होता. आता ती आपल्या पित्याच्या घरी हि जाऊ शकत नव्हती. अंबेने मग प्रत्यक्ष भीष्मानांच ह्या सगळ्या गोंधळासाठी दोषी धरले.

“हे भीष्मा, आपण मला माझ्या स्वयंवरातून पळवून आणले....! त्यामुळे माझ्या आयुष्यात झालेला गोंधळ आता तुम्हीच सावरू शकता...!!!”

भीष्मांनी जरा गोंधळून आपल्या हातातली ताम्रपत्र खाली ठेवली आणि प्रश्नांकित नजरेने तिच्याकडे पहिलं...!! अंबेच्या चेहऱ्याने त्यांच्या सिंहासनावर बसलेल्या मूर्तीकडे आशेने पाहायला सुरुवात केली होती. भीष्मांनी बराच वेळ यावर काहीच जवाब दिला नाही. अंबेने आता भीष्मांनीच तिच्याशी लग्न करण्याची मागणी तिने केली. पण भीष्म म्हणजे आजन्म ब्रह्माचारी, त्यांनीही तसे करण्यास असमर्थता दर्शवली आणि तिला दोन पर्याय सुचवले.

पर्याय पहिला असा कि, तिने आपल्या पित्याकडे काशीला परत जावे.

पर्याय दुसरा असा कि, मग हस्तिनापुरात राहण्याची इच्छा असेल तर दासी म्हणून रहावे.

अंबा म्हणजे काशी नरेशाची मुलगी ती या प्रस्तावांना होकार देणाऱ्यातली नव्हती. असे बोलू भीष्मांनी अंबेचा स्वभिमान हस्तिनापुरच्या सिंहासनाच्या पायदळी तुडवला होता. आता मात्र अंबा भीष्मांवर चिडली आणि तिने भीष्मांना उद्देशून प्रतिज्ञा केली,

“मी काशिनरेश पुत्री अंबा, पंचमहाभूताना साक्षी मानून हि प्रतिज्ञा करते कि, हे भीष्मा, तू माझ्या ह्या अवहेलनेस कारणीभूत आहेस. त्याचा प्रतिशोध म्हणून मी तुझ्या मृत्यूस कारणीभूत ठरेन....!!!”

आपल्या प्रतिज्ञापूर्तीसाठी तिने कार्तिकेय देवाची आराधना सुरु केली. कार्तिकेयांनी प्रसन्न होऊन तिला सदाबहार कमलपुष्पांची माळ दिली.

कार्तिकेय ने सांगितले, “हे अंबा, मी तुझ्या आराधनेवर प्रसन्न आहे. हि घे सदाबहार कमलपुष्पांची माळ. जो कोणी ह्या माळेचा स्वीकार करेल तो भीष्मांना पराभूत करू शकेल, त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरेल.”

पण भीष्मांची ख्याती आणि अंबेचं दुर्दैव अपार होतं. कोणीच राजा त्या सदाबहार कमलपुष्पांच्या माळेचा स्वीकार करेना. अंबा अनेक महिने भारतवर्ष आणि इतर देशांच्या राजांकडे गेली, पण तिच्या हाती यश आले नाही. शेवटी जेंव्हा सुविख्यात पांचाळनरेश द्रुपदाने ही नकार दिला, तेंव्हा रागाच्या भरात अंबेने ती माळ तिथेच फेकली, जी की द्रुपद राजाच्या राजवाड्याच्या एका खांबाला अडकून राहिली. अनेक वर्षे अनेक युगे....!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel