( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)

सुमित्रा सर्व पाहात होती.आशुतोष सरांचे दु:ख तिला पाहावत नव्हते.

एवढ्यात तिच्या मनात एक विलक्षण कल्पना आली.

त्यामुळे आशुतोष सरांचे दु:ख तर दूर होणार होतेच.परंतु तिचेही इप्सित साध्य होणार होते.

एका दगडात दोन कामे होणार होती.

सुमित्राने हळूच नंदिनीच्या शरीरात प्रवेश केला.

त्या शरीरात जम बसवण्यास तिला अर्थातच वेळ लागणार होता.

आळोखेपिळोखे देत नंदिनी हळूच उठून बसली.

त्या खोलीत एक नर्स होती.नंदिनी उठून बसल्याचे पाहून तिचा आनंद गगनात मावेना.ती आश्चर्यचकीत झाली होती.धावत जाऊन तिने डॉक्टरांना नंदिनी जिवंत आहे अशी बातमी दिली.डॉक्टरांनी तिला पूर्णपणे तपासली होती.तिचे हृदय बंद पडले होते.मृत्यू झाल्याची खात्री करून घेण्यासाठी डॉक्टर डोळ्यांमध्ये बॅटरीचा फोकस पाडतात.जरी हृदय बंद पडले असे वाटत असले तरी,जर शरीरात धुकधुकी असेल तर डोळे प्रकाशाला प्रतिसाद देतात.डॉक्टर  हृदय चालू करण्याचा प्रयत्न करतात.कदाचित डॉक्टरांना यश येऊ शकते.डॉक्टरांनी तिच्या डोळ्यात प्रकाश टाकला होता.तिच्या डोळ्यांनी प्रतिसाद दिला नव्हता.डॉक्टरांनी त्यांच्या दृष्टीने,त्यांच्या शास्त्राप्रमाणे,त्यांच्या अनुभवानुसार,ती मृत्यू पावल्याची पूर्ण खात्री करून घेतली होती.आणि नंतरच सर्वांना ती कटू बातमी दिली होती.बातमी कळल्याबरोबर सर्वच डॉक्टर त्या खोलीत धावत आले.   

त्यांना नंदिनी उठून बसलेली दिसली.तिचे काळे निळे पडलेले शरीर पूर्ववत झाले होते. निद्रेतून जागे झाल्यासारखी ती सर्वांकडे पाहत होती.सर्वांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आशुतोष सरांना ही नवीन बातमी देण्यात आली. 

उद्ध्वस्त झालेल्या आशुतोष सराना प्रथम डॉक्टर काय सांगत आहेत तेच लक्षात येत नव्हते

डॉक्टरही कधी कधी चुकतात. डॉक्टरानाही कधी कधी मृत्यू चकवा देतो. या वेळी मृत्यूने दिलेल्या चकव्यामुळे डॉक्टर  आनंदित झाले होते.

बसलेली नंदिनी पुन्हा धाडकन आडवी झाली.

सुमित्रेला त्या शरीरात स्वत:ला सामावून घेणे जमवून घेणे यामध्ये अर्थातच वेळ जाणार होता.

सर्व डॉक्टराना नंदिनी जिवंत आहे हे पाहून अत्यानंद झाला.तिची तपासणी करून तिला मृत्यू आला असे घोषित करण्यात आले होते.तरीही ती जिवंत आहे असे पाहून आश्चर्य तर वाटलेच.आपल्या प्रयत्नांना यश आले म्हणून आनंदही झाला.डॉक्टर  बोलता बोलता आशुतोषना म्हणाले याला केवळ चमत्कार याशिवाय दुसरे कांहीही नाव देता येणार नाही.एक वैद्यकीय चमत्कार असे त्याला म्हटले पाहिजे.म्हणूनच आम्ही डॉक्टर नेहमी म्हणत असतो,आम्ही उपचार करतो. "तो" (परमेश्वर) बरा करतो.आपल्या हातात कांहीही नाही ही गोष्ट बऱ्याचवेळा आमच्या लक्षात येते.

नंदिनीला स्वतंत्र खोलीत स्पेशल रूममध्ये हलवण्यात आले होते.तिच्या पुन्हा सर्व  चाचण्या घेण्यात आल्या.तिचा प्रतिसाद आश्चर्यकारक होता.तिचे  रिपोर्ट्स आश्चर्यकारक होते.सर्व कांही सुव्यवस्थित व सुरळीत होते.जणू कांही तिला विषप्रयोग झालाच नव्हता.प्रत्यक्षात काय झाले ते सर्वांना कळते तर? 

तिच्या दिमतीला एक प्रशिक्षित नर्स कायमची देण्यात आली होती.आशुतोष दिवसातून निदान चारदा तरी नंदिनीला भेटण्यासाठी येत असत.तिचा हात हातात घेऊन तू लवकर बरी हो घरी ये असे म्हणत असत.ते तिच्याजवळ बसले, तिचा हात त्यांनी हातात घेतला, कि सुमित्राला आनंद होत असे.सुमित्राच्या अंगावर काटा उभा राहत असे.योग्य वेळी आपण योग्य   निर्णय घेतला.अन्यथा नंदिनीचे और्ध्वदेहिक पार पडले असते.  नंदिनीचा मृतदेह पंचमहाभूतात विलीन झाला असता.आपण फक्त इतस्ततः भटकत राहिलो असतो. 

नंदिनी पुढील गतीला निघून गेली होती.तिचा फक्त देह भूतलावर होता.आता होती ती सुमित्रा होती.

नंदिनीला भेटण्यासाठी तिचे आई वडील,तिचे भाऊ बहीण, तिच्या मैत्रिणी येत असत.सुमित्रा   त्यातील कांही जणांना ओळखत होती.कित्येक तिला अनोळखी होते.त्याचप्रमाणे प्रत्येकाशी असलेले संबंध तिला अर्थातच ज्ञात नव्हते.हळूहळू ती नंदिनीबद्दलच्या   सर्व गोष्टी माहीत करून घेत होती.अति जालिम विष तिच्या शरीरात सर्वत्र भिनल्यामुळे तिच्या मज्जासंस्थेवर त्याचप्रमाणे मेंदूवर परिणाम झाला आहे.त्यामुळे ती व्यवस्थित शारीरिक व्यवहार करू शकणार नाही.तिचे बोलणे, तिची चाल,तिची हालचाल, तिची स्मृती,  या सर्वांवर अनिष्ट परिणाम कांही दिवस,कदाचित कांही महिने दिसून येईल.कांही बाबतीत तर ती पूर्णपणे बरी होणार नाही.याची कल्पना डॉक्टरानी आशुतोष व त्याच्या सर्व घरच्या मंडळींना दिली होती.जी काही अव्यवस्था दिसत होती,ती विष प्रयोगाचा परिणाम म्हणून समजली जात होती.  

सुमित्रेला नंदिनीच्या शरीरात जम बसवण्यास जो त्रास होत होता तो सर्वांना विष प्रयोगाचा परिणाम असे वाटत होते.ती कित्येक जणांना ओळखत नव्हती.कित्येक व्यक्तींबरोबरचे नंदिनीचे पूर्वीचे संदर्भ सुमित्रेला अर्थातच आठवत नव्हते.हे सर्व विषप्रयोग परिणाम या लेबलखाली धकून जात होते.सुमित्रेने नंदिनीच्या शरीराचा ताबा घेतल्यावर जवळजवळ दोन आठवडे ती हॉस्पिटलमध्ये होती.एवढ्या काळात तिने नंदिनीबद्दलच्या बऱ्याच गोष्टी आत्मसात केल्या.नंदिनीबद्दलची बरीच माहिती अद्ययावत केली.तिच्या शरीरावर पूर्णपणे ताबा मिळविला.

नंदिनी घरी आली.आशुतोषच्या सहवासात ती सतत राहत होती.सुमित्राच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.ती आशुतोषला पाहिल्यापासून जे वांछित होती ते आता तिला प्राप्त झाले होते.आशुतोषशी गप्पा, त्याची भेट, त्यांचा सहवास, त्यांच्या घरात अधिवास,सर्व कांही तिला मिळाले होते.आशुतोषच्या शयनगृहात एका वेगळ्या कॉटवर तिला ठेवले होते.आशुतोष तिचा हात हातात घेत असत.अजुन तिला आशुतोषला आलिंगन देता आले नव्हते.ती आजारी आहे. ती पूर्णपणे बरी झाल्याशिवाय आशुतोषशी तिची खऱ्या अर्थाने भेट होणार नव्हती.तिला आशुतोषशी एकरूप व्हायचे होते.त्यादृष्टीने आशुतोषची कांहीच हालचाल दिसत नव्हती.

नंदिनीला मृत घोषित केले.नंदिनी चमत्कार म्हणून पुन्हा या जगात आली.त्यानंतर आशुतोषला नंदिनीमध्ये कांहीतरी निराळे,कांहीतरी विचित्र भासत होते.ही आपली नंदिनी नाही असे त्याचा अंतरात्मा त्याला सांगत होता.नंदिनी प्रत्यक्ष समोर दिसत होती.तिला सर्व जणानी नंदिनी  म्हणून स्वीकारले होते.आशुतोषच्या आईवडिलानी आणि भाऊबहिणीनी तिला स्वीकारले होते.आशुतोष मात्र तिला पूर्णपणे स्वीकारायला तयार नव्हता.तो तिच्याशी बोलत होता. तिचा हात हातात घेत होता.गोड आठवणी काढत होता.परंतु याच्या पुढील पायरी तो टाकत नव्हता.

अजूनही तिचे अंथरुण स्वतंत्र होते.सुमित्रा आशुतोषच्या बाहुपाशात जायला उत्सुक होती. तिला आशुतोषशी संपूर्ण मीलन हवे होते.सरांची मात्र त्यादृष्टीने कांहीही हालचाल नव्हती.तिला विषप्रयोग होऊन आता तीन महिने झाले होते.ती पूर्णपणे पूर्ववत झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले होते.तिला पूर्वीप्रमाणे कामावर जायला हरकत नाही म्हणून त्यानी सांगितले होते.

आशुतोष तिला तू प्रयोगशाळेत जायला केव्हां  सुरूवात करणार असे विचारत होते. तिने आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन टाकला.पुन्हा मी तशा प्रकारचे काम करू शकणार नाही माझे हात कापतील असे ती म्हणाली.हे कारण सर्वाना पटणारे होते.प्रत्यक्षात अर्थातच वेगळे कारण होते.ते काम करण्याचे प्रशिक्षण तिला नव्हते.हात कांपतील ही फक्त पळवाट होती.     

*तिचे हस्ताक्षर निराळे होते.*

*तिचा आवाज निराळा होता.*

*तिची बोलण्याची पद्धती भिन्न होती.* 

ती पूर्वीची नंदिनी राहिली नव्हती.हा विषप्रयोगाचा परिणाम असे सर्वच समजत होते.

आशुतोष सरांना मात्र कांहीतरी संशय होता.त्यांना ती नंदिनी वाटत नव्हती परंतु तिच्यात काहीतरी ओळखीचे आहे असे भासत होते.हिच्याशी आपण पूर्वी बोललो आहोत,भेटलो आहोत, असे वाटत होते.

एके दिवशी आशुतोष सराना एकाएकी उलगडा झाला.ही तर सुमित्रा, ही तर डेस्डिमोना,ते स्वतःशीच म्हणाले.ती सुमित्रा आहे यादृष्टीने त्यांनी तिच्याकडे पाहायला सुरुवात केली.आणि त्यांना सर्व उलगडा झाला.तिचे बोलणे, तिचे चालणे, तिचे हसणे, तिचे विभ्रम, तिची हालचाल,सर्वत्र ती सुमित्राच होती.शरीर नंदिनीचे मात्र आंत वस्ती सुमित्राची होती.

सुमित्रा त्यांची विद्यार्थिनी होती.नाटकाच्या निमित्ताने सुमित्रा त्यांच्याजवळ आली होती.तिच्या सर्व सवयी त्यांना ज्ञात होत्या.विचार करता करता त्यांना सर्व उलगडा झाला.सुमित्राचे त्यांच्यावरील प्रेम,ते अविवाहित असल्याबद्दलची तिची समज, ते विवाहीत आहेत. त्यांचा प्रेमविवाह होता. त्यांची पत्नी उच्च शिक्षणासाठी परदेशात गेली आहे. हे सर्व कळल्यावर सुमित्राला बसलेला धक्का,त्यानंतर सुमित्रेचे सैरभैर  होणे,पुढे सुमित्राचा अपघाती मृत्यू,ही शृंखला त्यांना आठवली.तिच्या मृत्यूनंतरही ती आपल्या आसपास वावरत आहे असे होणारे भास त्यांना आठवले.

आपल्याला हे असे काय होत आहे ते त्यांना समजेना.त्यांचे मन त्याना एक सांगत होते.तर वस्तुस्थिती, तर्कशुद्धता, वेगळेच कांही दर्शवीत होती.आपण ही नंदिनी नाही, सुमित्रा आहे, असे कुणालाही सांगू शकत नाही.लोक आपल्याला वेड्यात काढतील.नंदिनीवर आपले उत्कट प्रेम होते परंतु आता ती या जगात नाही.सुमित्रेचे आपल्यावर उत्कट प्रेम आहे.ती नंदिनी म्हणून आता या जगात आहे.तिचा सर्वार्थाने स्वीकार करायला काय हरकत आहे?असे विचार त्यांच्या मनात येत होते.अति विचाराने आपल्याला वेड लागेल कि काय असे त्यांना वाटू लागले होते.

शेवटी आपल्या मनातील विचार तसेच ठेवावेत असा निर्णय त्यांनी घेतला.आपल्याला वाटते, भासते, ते कदाचित खरे असू शकेल किंवा नसेलही.ही नंदिनी असेल आणि विषप्रयोगाचा परिणाम म्हणून तिच्यात आमूलाग्र बदल झाला असेल,असे कशावरून नसेल?मनुष्याचे मन मोठे विचित्र आहे.आपण नकळत सुमित्रावर प्रेम करत नसू कशावरून?नंदिनीशी प्रतारणा होईल म्हणून आपण सुमित्राला अव्हेरले नसेल कशावरून?ही नंदिनीच असेल परंतु आपण सुमित्रा समजत असू असे कशावरून नसेल?त्यांच्या डोक्यात विचारांचा नुसता गुंता होऊन गेला होता.ही सुमित्रा कि ही नंदिनी?कोणी का असेना आपण तिचा सर्वार्थाने स्वीकार करायला काय हरकत आहे अशा निर्णयावर शेवटी आशुतोष सर आले. 

सुमित्राचे इप्सित शेवटी तिला मिळाले.त्या रात्री सर्वार्थाने ती आशुतोष सरांशी एकरूप झाली.आशुतोष सरानी तिचा पूर्णपणे स्वीकार केला.ते तिच्याबरोबर(नंदिनीबरोबर) पूर्वीप्रमाणे फिरू लागले.नाटक, सिनेमा, मॉल, करमणुकीचे कार्यक्रम, नातेवाईक, मित्रमंडळी,सर्वत्र ते नंदिनीसह(सुमित्रेसह)  जाऊ लागले.हरवलेले जवळजवळ संपलेले आशुतोष पुन्हा या जगात आले हे पाहून त्यांच्या आईवडिलांना,मित्रांना, भाऊबहिणीला, नातेवाईकांना, विद्यार्थ्यांना, सर्वांना आनंद झाला.सर्वात जास्त आनंद सुमित्रेला झाला होता.तिचा त्यांनी सर्वार्थाने पूर्ण स्वीकार केला होता.  

नंदिनीत ते सुमित्रा पाहात होते असे म्हणूया किंवा सुमित्रेत ते नंदिनी पाहत होते असे म्हणूया.शेवटी अर्थ एकच.

*****

*सुमित्राची इच्छा अतृप्त राहिली म्हणून,आणि तिच्या दैवात तसेच होते म्हणून,ती पुढील गतीला गेली नाही.*

*या जगात घुटमळत राहिली.योगायोगाने म्हणूया किंवा तसेच तिचे व नंदिनीचे भागधेय होते म्हणून म्हणूया,नंदिनीला विषप्रयोग, तिचा मृत्यू, सुमित्राचा तिच्या शरिरात अधिवास,इत्यादी घटना घडल्या.*

*सुमित्राच्या अतृप्त इच्छा संपूर्णपणे पूर्ण झाल्या.ती अशीच आशुतोष सरांबरोबर राहणे शक्य नव्हते.*

*एके रात्री ती झोपली ती पुन्हा उठलीच नाही.सुमित्रा नंदिनीचे शरीर सोडून गेली होती.तिच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्यामुळे ती आता पुढील गतीला गेली होती  *

*नंदिनीच्या मृत्यूने सर्व हळहळले.विष प्रयोगाचा परिणाम म्हणून तिला हार्ट अटॅक आला आणि तिचा झोपेतच मृत्यू झाला असे डॉक्टर म्हणाले.*

*सर्वजण तसेच समजत आहेत.वस्तुस्थिती फक्त   आशुतोष सराना माहीत आहे.*  

(समाप्त)

९/३/२०२२©प्रभाकर  पटवर्धन 

pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel