त्यांनी आहारचिकित्सा केली. मिरच्या, मसाले यांची जरूर नाही. बायकांचा किती तरी वेळ या भाकड गोष्टीत जातो. कच्चा आहारही चांगला. त्यांनी उतारवयात तेही प्रयोग केले. आधी अनुभवायचे मग सांगायचे. त्यांना प्रयोग झेपले नाहीत. भाज्या नुसत्या उकडाव्या नि खाव्या, तळणे तर विषमय. तांदूळ न सडलेले, ते सत्वयुक्त असतात. आधी आंधळे-पांढरे फटफटीत तांदूळ खाऊन मढी बनलो. परंतु अजून पांढरे करूनच आणीत आहोत. कणकेतील कोंडाही असावा. परंतु बायका चाळून फेकून देतील. सारा मूर्खपणा !  खेडयापाडयात जनतेला तेथेच जीवनसत्वयुक्त आहार कसा मिळेल म्हणून या महापुरुषाला विवंचना. चिंच, निंबाचा पाला, घोळीची भाजी, इत्यादी वस्तू ते' केमिकल ऍनलायझरकडे' रासायनिक पृथक्करण करणा-या खात्याकडे पाठवीत. लिंबू नसेल रोज मिळत, तर चिंचेचे सार करा. ते चिंचेला 'गरीबांचे लिंबू' म्हणत. आहारात साधेपणा, शास्त्रीय दृष्टी त्यांनी आणली. काय खावे, काय प्यावे, येथपासून राष्ट्राला हा राष्ट्रपिता शिकवीत होता. हे आठवे अवतारकार्य.

आहार तरी कशासाठी? आरोग्यासाठी. डॉक्टरांचे मुख्य काम रोग होणारच नाहीत हे असावे. महात्माजी निसर्गोपचाराचे उपासक, पंचभौतिक देहाला पंचभौतिक उपायच बरे. पृथ्वी, आप, वायू, तेज, आकाश या पंच साधनांनी रोग बरे करावेत. काही रोग मातीने हटतील. काही रोग पाण्याचे प्रयोग करून. काही प्रकाशकिरणांनी, काही हवेमुळे आणि काही आकाशाप्रमाणे मन अलिप्त नि शांत ठेवून. महात्माजींनी अनेकांवर हे प्रयोग केले. स्वत:वर केले, कुटुंबीयांवर केले. मुलाचे प्राण धोक्यात असताही प्रयोग सोडला नाही. कारण प्रयोगाची सिध्दी त्यावर अवलंबून. झोप न येणारांना डोक्यावर काळी माती ओली करून फडक्यात ठेवून झोप लागते असे सिध्द झाले आहे. ओटीपोटावरही काळयामातीचा थर ठेवून काही रोग बरे होतात. शेवटी शेवटी तर महात्माजी मानसोपचारी झाल्यासारखं दिसतात. एक रामनाम पुरे ते म्हणत. त्याने मन शांत राहिले तर शरीरही शांत, रोगरहीत, आधी-व्याधीरहीत होईल असे ते म्हणत. परंतु तितकी श्रध्दा नि विश्वास यांची आवश्यकता असते. आजकाल जरा काही होताच आपण बाटली घेऊन जातो. केवळ पंगू नि दुबळे होऊन गेलो आहोत. पोषाखी बनत आहोत. शरीराला हवा, प्रकाश लागूच देत नाही. महात्माजी फार कपडे वापरीत नसत. देवाची हवा, प्रकाश अंगावर खेळवत. ते नियमितपणे फिरण्याचा व्यायाम घेत. अशाप्रकारे स्वत:चे आरोग्य त्यांनी सुंदर ठेवले. ते मालीशही नियमित करून घेत. त्यामुळे रक्ताभिसरण व्हायला मदत होते. महात्माजींनी निसर्गोपचाराची दिलेली ही थोर देणगी आहे. हे त्यांचे नववे अवतारकार्य.


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel