सहजच एक संवाद  काल कानावर पडला त्यातला एक शब्द *समिधा* खूप दिवसांनी ऐकला अन त्या शब्दाचा विचार एक वेगळा विचार देवून गेला... संवाद असा होता...

एका वळणावर दोन गुरुजी 
स्कूटरवरून माझ्या शेजारून गेले. 
आता ही गुरुजी मंडळी सुद्धा 
खूप _'हायटेक'_ झाली आहेत. 
गाड्या वापरतात, मोबाईल वापरतात, 
सोशल मीडियाचा व्यवसायासाठी 
उत्तम उपयोग करून घेतात. 
पण व्यावसायिक गप्पा 
त्याच विषयाभोवती फिरतात.

तर... 
त्यातले एक गुरुजी दुसऱ्या गुरुजींना म्हणत होते, 

_"अरे समिधांची काय एव्हढी काळजी करतोस?_ 
_त्यांचं काम फक्त अग्नीला अर्पण केलेल्या वस्तू_ 
_अग्नीपर्यंत पोचवायचं...!"_

*बस्स एव्हढंच?* 

*ह्या पलीकडे त्या 'समिधां'च्या जळून जाण्याला* 
*काहीच महत्व नाही???* 

खरं तर ह्या अशा अनेक *'समिधा'* आहेत 
ज्यांनी मूकपणे जळून जाऊन 
अनेक यज्ञ यशस्वी केलेत!
मग माझे मन 
विचारांच्या वावटळीवर स्वार होऊन 
मन प्रवासाला निघालं...

पहिलीच आठवली ती *उर्मिला.* 
लक्ष्मण तर गेला निघून 
भावामागून चौदा वर्षं वनवासाला... 
रामसीतेच्या बरोबरीनं लक्ष्मणाचं कौतुक झालं, 
भरताचंही झालं. 

पण अयोध्येत राहूनसुद्धा चौदा वर्षं वनवास, 
तोही एकटीनं भोगणाऱ्या, 
उर्मिलेच्या आयुष्याच्या आहुतीची दखल 
वाल्मीकींनीही घेतली नाही. 

मला नेहमी वाटतं की त्या उर्मिलेला 
कुणीतरी बोलतं करायला हवं. 
रामराज्याच्या आदर्शवादी यज्ञात 
ह्या एका *'समिधेची* आहुती 
अशीच पडून गेली.

*बहुतेक सर्व 'समिधा' ह्या स्त्रियाच!*
 
कारण हे निमूटपणे जळून जाणं 
त्यांच्या अंगवळणीच पडलेलं असतं जणू! 

*गोपाळराव जोशी सारखे *  अपवाद 
की आपल्या पत्नीला- आनंदीबाईला
डॉक्टर करण्यासाठी स्वतः *'समिधा'* झाले !

काही थोड्याफार 'समिधा, 
*कस्तुरबा* म्हणा, 
*सावित्रीबाई फुले* म्हणा, 
स्वकर्तृत्वाने उजळूनही गेल्या! 

पण बाकीच्या...???

टिळकांनी, सावरकरांनी मांडलेल्या 
स्वराज्याच्या यज्ञात पहिली आहुती 
*सौ. टिळकांची* व *सौ. सावरकरांची* पडली. 

या आणि अशा अनेक...!!!

विचारांच्या चक्रात घरी पोचले
असे वाटले प्रत्येक घरात अशी समिधा असतेच रोज आपल्या आकांशा ची आहुती देत नित्यकर्मा ला न्याय देणारी अगदी घराचे दार उघडून आत घेत 
मुलाचा अभ्यास आणि नवऱ्याचं करीअर 
यासाठी स्वतःचं आयुष्य पुर्णपणे झोकुन वाहणाऱ्या त्या *'समिधा

घरोघरी अशा *'समिधा'* रोज आहुती देत असतात. 
घर उभं करत असतात, सावरत असतात. 

मात्र यापुढे या *'समिधां'ची* आहुती 
दुर्लक्षित जाऊ न देणं गरजेचं आहे!

या नव्या कठीण काळात, सर्व आव्हानांना भिडण्याची तयारी करतांना, जी आनंदाने स्वतःची आहुती देऊन 
आपल्याला ऊर्जा देणार आहे, 
त्या आपल्या प्रत्येकाच्या घरच्या *'समिधे'ला...*

दुर्लक्षित करून चालणार नाही उलट तिचे स्थान आपल्या आयुष्यात किती महत्वाचे हे अगदी लहानपणीच आपल्या मुलांना पटवून देण्याची जबाबदारी आई कडे..जी या समिधाचे  नेतृत्व करते असे ही म्हणता येईल....म्हणजे अशा समिधाची आहुती ही समर्पणा बरोबरच सन्माननीय ठरेल.त्याग समर्पण आहुती असे आशय समिधेला नवी ओळख देतील समिधा म्हणजे सन्मान.. अशा समिधा आपल्या अवतीभवती असतातच त्यांचं रोजचं जगणं सन्माननीय करू यात... कानावर पडलेल्या त्या समिधा या एका शब्दामुळे सहजच सुचलेले मांडले..समिधा समिधा केवळ आहुती साठी नाही तर *समिधा समिधा एक धुरा जिच्याशिवाय अग्नी चं अस्तित्वाच ते काय न*... समिधे शिवाय अग्नी ही अपूर्णच !!

व्यक्तीसापेक्षता आहेच आदरच.

© मधुरा धायगुडे 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel