वेदना या शब्दाचा भावनेचा अर्थ मला उलगडलेला मी बोललेच वेदना या लेखात..
*वेदनेत जन्मे हरी संकटात रांगे हा अभंग यांचे वास्तव रूप दर्शवत होता*
कृष्ण आणि वेदना ह्याच जवळच नात असावं कृष्ण म्हणजे त्याग हे समीकरण आहेच. थोड वेदने पलीकडे काय होत असेल मनाच्या पातळीवर असा विचार आला. वेदनेतूनच जन्माला आलेली संवेदना जखम
जखम वेदनेचीच जुळी बहीण तर नसेल असे ही मनात आले दोघीही परस्परपूरक.
वेदना त्या क्षणापुरती निर्माण होते कुणी आपल्या मनाविरुद्ध वागले तर आपण दुखावतो अपेक्षांचं ओझं असत ना मनावर. मग होतात जखमा ही संवेदना जखमेच्या रूपात मनात कुठेतरी शिल्लक राहते.जखमा काही लगेच भरणाऱ्या तर काही आयुष्भर मिरवाव्या लागलेल्या अंतिम टप्प्यापर्यंत सोसाव्या लागलेल्या कधी कधी एखाद्याच विव्हळण ही बेवारशी करणाऱ्या जखमा.
जखमा मनाच्याच असतात असे नाही शारीरिक व्याधितून निर्माण झालेल्या ज्या उपचाराने बऱ्या होतात ही तरी आपल्या खुणा सोडतातच. त्यातून होणाऱ्या वेदना कालबाह्य होतात. वेदना ह्या तात्पुरत्या कधी कधी आपल्याच मनाच्या तर कधी इतरांनी दिलेल्या असतात जखमा त्या वेदनांची दाहकता ती किती घ्यायची हे विचारप्रक्रिया ठरवते व्यक्तिजन्य जखमा त्या जखमा वरवरच्या की खोलवर हे आपल्या*स* किवा*न*विचारावरच....!!!
*जखमा*शब्दशः मीच लावलेला अर्थ जखमा म्हणजे जड - खऱ्या - मानी त्या जखमा. कुणाला तरी पटलेली म्हणून खऱ्या मानी एक गोष्ट आपल्यासाठी चुकीची असली तरी दुसऱ्याला ती बरोबर वाटतेच मनस्वी मानी असतेच ना. असा माझा मीच लावलेला अर्थ पटेल असे नाहीच
म्हणून त्यातील वेदना संपल्या तरी त्याच्या खुणा आपली ओळख कधीच पुसत नाहीत.
आपल्या चेहऱ्यावर वयानुसार किती ही सुरकुत्या पडल्या तरी मूळ चेहऱ्याचे स्वरूप त्या काळ पुरुषाला ही बदलता आले नाही. तशाच जखमा.. माफीच्या जाणीवेतून क्षमेच्या रूपात विरून जात नाहीत तर त्यातील वेदनेची दाहकता कमी होते इतकेच. म्हणून तर*शब्द जपावा बोलण्याआधी* गेलेले शब्द परत येत नाहीत ते जिव्हारी लागत त्याच्या जखमा होतात आणि त्या आपले अस्तित्व दाखवतात च.
आयुष्यात असे अनेक संघर्षाचे प्रसंग येतात कधी व्यक्तीमुळे, नातेसंबधामुळे यातून होणाऱ्या कधी व्यक्त तर कधी अव्यक्त वेदना जखमा देऊन जातात. शेवटी माणूस म्हणजे देव नाही न त्याला ही मन आहेच की त्यात भाव भावना आहेत कटू गोड विचारांची झालर त्या मनाला आहेच. विकारांची छिद्र त्या मनाला एकसंघ राहून देत नाहीतच हीच तर परीक्षा त्यात तरून राहता येण्यासाठी प्रयत्न हवेत.*परम ईशाचे अधिष्ठान सावरते मना देते समाधान*.
लहानपणी आईने एखाद्या वाईट कृती विषयी दिलेली शिक्षा एखादा मिळालेला धम्मकलाडू वेदना देते जखम देते पण ती तात्पुरती असते कारण त्या वयात मन म्हणजे काय ही गोष्टच ज्ञात नसते जगरहाटी माहीत नसते.
पुढे किशोरवयात जगात पडलेले पाहिलं पाऊल, फाजील आत्मविश्वास जागवते आणि नवलाईने भारलेले मन कधी मनाविरुद्ध वागायला लावते आणि परिस्थितीजन्य वेदनांना सामोरे जाताना मिळणाऱ्या जखमा भळभाळणाऱ्या असतातच त्याची वेदना समाजविरोधी असली तरी आत्मसुखाचाच विचार करते पण मन ते मानायला तयार होत नाहीत मग नकोश्या गोष्टींतून निर्माण होतात*जखमा* ज्याच्या त्याच्या मनाच्या
भाव विश्वावर अवलंबून असतात कौटुंबिक पार्श्वभूमी चे योगदान इथे महत्वाचं त्यातून मिळणाऱ्या जखमा शेवटपर्यंत मनाच्या कोपऱ्यात मनाच्या कोपऱ्यात घर करून राहतात आता त्या त्या वयाची ती गरज अनुभव त्यानुसार स्वतःला पडताळून पाहाल तर कळेल.
मध्यवयात या सगळ्यांचे उपयोजना त्मक वेदना संवेदना जाणीवा जखमा यांना पार करत अनुभवांचा डोंगर उभा असल्याने त्या इतरांना मार्गदर्शक म्हणून उपयोगी ठरू शकतात अशावेळी जखमा फलदायी असतात त्याचा प्रभाव इतरांवर पडू शकतो.
आयुष्याच्या संध्याकाळी अवलोकन करताना कळते वेदना किती बोथट झाल्यावर जखमा वर मी आता आरूढ झालेय . अनुभवाने समृध्द होत जड खऱ्या मानी जखमा.. हलक्या खऱ्या स्वाभिमानी व्हायला लागतात त्या परिस्थितीत वेदनेला ही दीर्घ करत आपलं अस्तित्व दाखवायला विसरतात. स्वाभिमानाकडे झुकवणाऱ्या जखमा कधीतरी मिळतीलच हव्यात, त्या मिरवता यायला हव्यात. मानी मानी म्हणताना अभिमानाने नव्हे स्वाभिमानाने वेदनांना धुसर करत खंबीर करणाऱ्या जखमा आयुष्याच्या सोहळ्यात अनुभवायला हव्यात. अनेक उदाहरणे देऊन समजावता येईलच पण कुणाला न दुखावता नकळत स्वतः च स्वतःला पडताळून पहिले तर... हाच उद्देश या विषयाला मान देण्याचा. वेदना संवेदना त्यातून मिळणाऱ्या जखमा मान अभिमान दूर सारत स्वाभिमानाला दृढ करतात मनाला खंबीर बनवतात.. तुमच्या ही आयुष्यात अशा घटना घडल्या असतील काही व्यक्तीमुळे झालेल्या जखमा मनात घर करून राहिल्या असतील ही पण दुसरी बाजू असतेच असा विचार करत जखमेचे दागिने सन्मानाने स्वाभिमानाने मिरवूयात तेच सकारात्मकतेने परत फिरवणार. अशा स ने समृध्द जखमा मनामानाला जोडत आपलं असणं अधोरेखित करत जातात.... असा ही एक विचार न कडून स कडे नेणारा जखमांना जोखड न मानता जाणीवा त परावर्तित करणाऱ्या सजग संवेदनाच......!! बघा पटतय न...
तुमच्या मनातील जखमांना वर्तमानात सकारात्मक स्थान दया...
© मधुरा धायगुडे