इकडे शेवंताच्या ध्यानात सारे आले होते.. तिच्यासमोर पडलेला पेच वेगळाच होता. सदा खरतर तिला पण आवडला होता. आणि सदाला जरी कळले नसले तरी शेवंताला पण त्याच्या वागण्यातून कळाले होते आणि गुलाबच्या मनातले तिला सांगायला कुण्या भटाची गरज नव्हती.. तिने गुलाबला बोलवून घेतले होते.
"गुलाब आजदरन तीन दिसांनी पाटलाच्यात बैठकीची लावणी हाय. आन् ती तुला करायचीये.. एकटीला.." शेवंताने सांगितले..
"हा अक्का चालतय की.. करते.. पन अग तू सुंदरा नसनार का??" गुलाब ने विचारले..
"मी येनार. आपल्या संगट ढोलकीवाले आणि बाजावाले येनार पन लावणी तुला एकलीला करायची हाय.. अन् त्यानंतर..", शेवंता थबकली..
"नंतर काय अक्का???" गुलाबने विचारले..
"तुला पाटलाच्या वाड्यावर थांबायचय.." शेवंता धीर करुन म्हणाली..
"ते आनि कशाला गं???" गुलाबने भाबडेपणाने विचारले...
तिच्या ह्या निरागसपणावर काय उत्तर द्यावे हेच अक्काला कळेना.. अगदी लहानपणी सापडलेली तिला ही गुलाब...
"वसू पाटलासंग तुला रात काढायची हाय.." बराच वेळाने ती बोलली..
©सुप्रिया घोडगेरीकर