“ म्हणजे? काय?” व्यंकटअप्पय्या यांच्या काळजाचा ठोका चुकला.
" कमिशनर साहेबाने गोळी मारली वाघाला पण लागली छोट्या सरकारांना...”
दौलतचे वाक्य पूर्ण होते न होते तोच सरकारांना हृद्य विकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. दौलतने त्यांना हाताने धरले ज्यामुळे त्यांचे शीर जमिनीवर आपटण्यापासून वाचले. आणखी काही सेवक त्या दालनात आले आणि त्यांना उचलून त्यांच्या शयनकक्षात नेले गेले. राजवैद्यांना पाचारण करण्यात आले. त्यांच्यावर निरनिराळे उपचार केले असता तब्बल दोन तासानंतर त्यांनी डोळे उघडले. त्यांचा चेहरा पाहून थोरल्या राणी सरकारांचे अवसान गळून गेले होते. सरकार पलंगावर उठून बसले.
“ देविदास, देविदास...” असा आवाज देताच एक चाळीशीचा सेवक समोर येऊन उभा राहिला.
“घेऊन ये...” देविदासला त्यांच्या या म्हणण्याचा अर्थ चांगलाच माहित होता. तो धावतच त्यांच्या शिसवी कपाटाजवळ गेला ज्याची दारे काचेची होती. त्यातील महागडी युरोपातून मागवलेली दारूची एक सुंदर बाटली बाहेर काढून तो ग्लासात ओतू लागला.
“ थांब....” त्यांच्या दमदार आवाजाने संपूर्ण वाडा थरथरून गेल्यागत झाला.
“ग्लास नको बाटली घेऊन ये आणि माझ्या नरड्यात ओत. आज मी शांत बसणार नाही...” वाक्य पूर्ण व्हायच्या आत देविदास लगबगीने बाटली घेऊन त्यांच्या पुढ्यात आला. त्यांनी त्याच्या हातून बाटली खेचून घेतली आणि पाणी, सोडा काही न मिसळता व्हिस्कीची बाटली त्यांनी तोंडाला लावली. देविदासाने त्यांच्या ठरलेल्या पंचाने त्यांचे तोंड वगैरे पुसून घेतले आणि पुढच्या आज्ञेची वाट पाहत समोर उभा राहिला.
“सुभान! सुभान! खजिनदार कुठे आहे? त्यांना सांग शस्त्रागारातून माझ्या रायफली बाहेर काढा. आज मी त्या गोऱ्याला जिवंत सोडणार नाही. त्याने आज दगा दिलाय.” मग ते जरा थांबले. त्यांनी बाटलीत उरलीसुरली व्हिस्की सुद्धा घशात ओतली.
“दौलत”
“जी सरकार”
“हत्ती तयार कर...”
“सर्व हत्ती शिकारीसाठी नेले आहेत”
“ मग घोडा? कि घोडेही नाहीयेत?”
दौलत तबेल्याकडे धावत गेला आणि एका उंच पांढऱ्याशुभ्र अरबी घोड्याची खोगीर घट्ट करून घेऊन आला. वाड्यासमोरच्या प्रांगणात टापांचा टप टप आवाज करत घोडा मागे पुढे हलत अस्थिरपणे उभा राहिला.
इतक्यात त्वेषाने पावलं टाकत मोठे सरकार बाहेर आले. त्यांनी अंगावर शाल घेतली होती. त्यांची मोठी डबल नळीची बंदूक पाठीला अडकवून ते अश्वारूढ झाले आणि जंगलाच्या दिशेने निघाले. त्यांचे डोळे निखाऱ्याप्रमाणे लाललाल दिसत होते. दौलत त्याच्या घोड्यावरून त्यांच्यामागे निघाला. वाड्याच्या प्रांगणासमोर असलेल्या पोफळीच्या बागेतून रस्त्याने ते केवळ बाहेर निघाले इतक्यात त्यांना दूरवरून हत्ती दिसला. शिकारीसाठी गेलेला लवाजमा परत येत होता. हत्तीवर छोट्या सरकारांचे शव एका चादरीत गुंडाळून ठेवले होते. सोबत काही गोरे अधिकारी देखील आले होते. त्यांना पाहून दात ओठ खात मोठे सरकार म्हणाले,
“दौलत, मला यांची तोंडं देखील पहायची इच्छा नाही. यांना इथून निघून जायला सांग नाहीतर एकेकाचा मुडदा पाडेन मी..”
त्यांनी घोडा उलट पावली वळवला आणि ते वाड्याकडे निघून गेले.
क्रमश: