**सुकरात यांचे घर**
हंसरेखेचे वडील तिची वाट पाहत त्यांच्या खोलीत येरझाऱ्या घालत होते. इतक्यात हंसरेखा आली तेव्हा तिचे वडील लगबगीने पुढे गेले.
“ हंसरेखा, हंसरेखा तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.”
“ आनंदाची बातमी?”
“ नगरनायकांनी त्यांच्या वाढदिवसाच्या मेजवानीमध्ये तुला पाहिले आणि पाहता क्षणीच तू त्यांचा मनात भरलीस. त्यांनी तुझ्याशी विवाह करून तुला त्यांची राणी बनवण्याचा निर्णय घेतला आहे. आता लवकरच तू या नेहपान ग्रहाची सम्राज्ञी होणार आहेस.”
“ काय? पण त्यांच्या अगोदरच ४०० राण्या आहेत.” हंसरेखा वैतागून म्हणाली.
“त्याने काय फरक पडतो? नेहपान घराण्यातील पुरुषांना राण्या किती असाव्यात याचे काहीच बंधन नाही. याशिवाय ते आपले नगरनायक आहेत. आपण नशीबवान आहोत कि नगरनायक नेहपान यांनी स्वत: तुला पसंत केले आहे. आत आपल्या कुटुंबाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. जगातील प्रत्येक ऐशोआराम आता आपल्याला उपभोगता येतील. तुझ्या एका इशाऱ्यावर जगातील गोष्टी नियंत्रित होऊ शकतील.”
“पण बाबा, मला वैवाहिक आयुष्यातून अपेक्षित आहे ते नगरनायक मला नाही देऊ शकत.”
हंसरेखेचे हे शब्द ऐकून तिचे वडील अचंबित झाले. “म्हणजे? तुझ्या नक्की काय अपेक्षा आहेत?”
“बाबा माझं एका मुलावर प्रेम आहे आणि मी त्याच्याशीच लग्न करू इच्छिते.”
“काय मुर्खासारखं बोलत्येस. तो जो कोणी मुलगा असेल तो नगरनायकाच्या तोडीचा असूच शकत नाही. तुही इतर सामान्य मुलींसारखी वेड्यासारखी वागत्येस जे कोणत्याही फालतू मुलांच्या गप्पा ऐकून त्यांच्या नादी लागतात.”
“बाबा अहो माझ्या मित्राचं नाव अजातरिपू आहे आणि तो या ग्रहावरील सर्वात बुद्धिमान तरुण आहे.”
“मला तसं वाटत नाही. तो एक फालतू आणि फटीचर मुलगा आहे. जो फक्त स्वत:मध्ये गुंतलेला असतो. कुठे नगरनायक आणि कुठे अजातरिपू. हंसरेखा तू मुर्खपणा करत्येस. तू नगरनायकाशी लग्न केलेस कि तू या ग्रहाची सर्वात लहान वयाची राणी बनशील तेव्हा अजातरिपू सारखे छप्पन नोकरचाकर तुझ्या मागेपुढे दिमतीला असतील.”
“तुम्ही हे चुकीचं बोलताय बाबा. अजातरिपू सारखी मुलं नोकरचाकर नसतात. ते आयुष्यात खूप यशस्वी होण्यासाठी जन्म घेतात. तुम्हाला नाही समजणार. असं वाटतय कि मला स्वत:लाच नगरनायाकांशी बोलावं लागेल.”
एवढे बोलून हंसरेखा आपल्या खोलीत निघून गेली आणि तिचे वडील डोक्याला हात लावून बसले.
क्रमश: