हि त्या काळातील गोष्ट आहे जेव्हा या भरतखंडात धर्माचे पालन करणाऱ्या, गो-ब्राम्हण प्रतिपालक आणि प्रजेला आपल्या अपत्याप्रमाणे जपणाऱ्या क्षत्रियांचे राज्य होते. असे नाही कोणत्याही प्रकारचा अधर्म नव्हता परंतु अशा अधर्माचे निर्दालन करण्यासाठी सर्व राजे तत्पर होते. त्यांना वेद आणि शास्त्र यांचे ज्ञान होते. धर्माचे योग्य पद्धतीने पालन करणे आणि धर्माचे आचरण करणे यातच संपूर्ण राज्याचे हित आहे हि गोष्ट राजकुमारांना अगदी बालपणापासूनच शिकवली जात असे.
असाच एक धर्मपरायण राजा होता, सेतुपती! त्याच्या ‘नंदीमोक्ष’ राज्यात अधर्माला थारा नव्हता. सेतुपतीने आपल्या जीवनात अनेक यज्ञ आयोजित केले, धर्मकार्यासाठी तो सदैव तत्पर असे, त्याने आपल्या राज्याच्या सीमांचे कधीही उल्लंघन होऊ दिले नाही, त्याने आपल्या राजवाड्याचे दरवाजे लोकांसाठी नेहमीच खुले ठेवले होते. दानधर्म करण्यामध्ये त्याने कधी कंजुषपणा दाखवला नाही.
असे असूनही काही कारणास्तव त्याच्या राज्यावर एक मोठे संकट उभे राहिले होते. काही दिवस त्याची सुख-शांती साक्षात विघ्नहर्त्याने हिरावून घेतल्यासारखे भासत होते. आयुष्यभर धर्माच्या मार्गावर चालून देखील आपल्या वर असे संकट का कोसळले आहे याच चिंतेत तो नेहमी पडलेला असे.
महाराज सेतुपतीचा एकुलता एक मुलगा ‘नंदीतेज’, ज्याला काही दिवसांत युवराज घोषित केले जाणार होते, तो एके दिवशी अचानक बेपत्ता झाला. तो कोठे आहे किंवा त्याचे काय झाले आहे हे कोणालाच माहीत नव्हते. एवढ्या मोठ्या राज्याचा राजपुत्र असा अचानक बेपत्ता व्हावा आणि हे कोणाला कळणार नाही हे शक्यच नव्हते.
नंदीतेजाच्या अंगरक्षकांच्या म्हणण्यानुसार, ज्या दिवशी नंदीतेज बेपत्ता झाला, त्यादिवशी तो आपल्या नित्यकर्मासाठी सकाळी खोलीतून बाहेरही आला नाही आणि जेव्हा तो ठरलेल्या वेळी आला नाही तेव्हा त्याचा अंगरक्षक वज्रसेन त्याच्या खोलीत गेला तेव्हा नंदीतेज खोलीत नसल्याचे आढळून आले. या घटनेला पाच दिवस झाले होते आणि तीन दिवसांनंतर गुढी पाडव्याच्या दिवशी त्याला युवराज घोषित केले जाणार होते.
सेतुपतीने ही बाब गुप्त ठेवली होती. त्याच्या काही विश्वासू मंत्र्यांपैकी मोजक्याच मंत्र्यांना याची माहिती होती आणि ज्यांना या घटनेची माहिती होती ते सगळेच ही घटना कशी घडली याबाबत संभ्रमात पडले होते. अंगरक्षक वज्रसेनने अन्नपाणी त्याग केला होता. राजकुमार तो स्वत: तिकडे तिथे असतानाच नाहीसा झाला, ही गोष्ट त्याला सतत खात होती. नंदीतेजापेक्षा वयाने मोठा असल्याने वज्रसेन नंदीतेजाला आपला धाकटा भाऊ मानत असे. तसा म्हणायला तो अंगरक्षक होता पण तो कधी मोठा भाऊ, कधी मित्र तर कधी नंदीतेजाचा विश्वासू सल्लागार बनत असे.
नंदीतेज दिसेनासा झाल्यानंतर पाचव्या दिवशी रात्री वज्रसेन त्याच्या शयनकक्षात गेला. त्याला आशा होती कि थोडा पाठपुरावा केल्यास नंदीतेज लुप्त होण्याचे काही कारण मिळेल. परंतु त्याच्या कक्षामध्ये एका अनोळखी ब्राम्हणाला पाहून आश्चर्यचकीत झाला. त्याने तत्परतेने त्याची तलवार उपसली. तलवारींचा आवाज ऐकून ब्राम्हणाने वज्रसेनाकडे पहिले आणि त्याने स्मितहास्य केले जणू त्याच्या येण्याने त्याला काहीएक फरक पडला नाही. पुढे तो ब्राम्हण म्हणाला,
“देवा, तलवार म्यान करावी. एका ब्राम्हणाला खरोखर भीती घालायची असेल तर हि पोलादी तलवार कामाची नाही तर त्यासाठी एक अज्ञानाची तलवार आवश्यक आहे. तसेही मी या राजभवनात स्वत:च्या इच्छेने आलेलो नाही. दस्तुरखुद्द राजपुरोहितांनी मला काही महिन्यांपूर्वी राजकुमारांचा राज्याभिषेक करण्यासाठी पाचारण केले आहे.”
वज्रसेन कोणी साधारण व्यक्ती नव्हता. त्याची प्रतिभा, साहसी वृत्ती आणि राजकुळाशी असलेली त्यांची निष्ठा हे गुण हेरूनच राजाने त्यांना राजपुत्र नंदीतेज याचा अंगरक्षक म्हणून नेमलेले होते.वज्रसेन याचे पिळदार शरीर आणि त्याची सर्व शास्त्रांमधील कौशल्य याबद्दल राज्यातील प्रत्येक शेंबड्या पोरालाही माहिती होती. अनेक योद्धे त्याला द्वंद्व युद्धात हरवण्याचे स्वप्न उराशी बाळगून होते.
असे असून देखील त्या ब्राम्हणाने त्याला अशाप्रकारे पाहून न पाहिल्यासारखे करणे म्हणजे निव्वळ मूर्खपणाच होता. परंतु त्या ब्राम्हणाच्या चेहेऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. तो राजपुत्राच्या कक्षात इतक्या सराईतपणे वावरत होता जणू काही तो त्यांचा जवळचा नातेवाईक आहे.
वज्रसेनने तलवार म्यान केली नाही. तो अजूनही आश्चर्य हिच भावना चेहऱ्यावर घेऊन हातात तलवार घेऊन उभा होता. हे नक्की काय सुरु होते. सर्वात पहिले राजकुमार आपल्या कक्षातून लुप्त झाला आणि अचानक लगेच एका अनोळखी ब्राम्हणाने त्याच्या कक्षात प्रवेश केला. राजपुत्राच्या कक्षात एखादा गुप्त भुयारी मार्ग होता का? असे अनेक प्रश्नांचे मनात काहूर माजलेल्या अवस्थेत वज्रसेन याने ब्राम्हणाला विचारले..
“ क्षमा करा, ब्राम्हणदेव! परंतु मला राजाज्ञा आहे कि कोणी अनोळखी व्यक्ती राजपुत्राच्या कक्षाच्या आसपास जरी भटकताना दिसला तरी त्याला त्वरित बंदी बनवावे आणि आपण तर थेट राजपुत्रांच्या कक्षात प्रवेश केला. आपल्याला राजभवनात येण्याचे आमंत्रण निश्चितच मिळाले असेल परंतु युवराजांच्या कक्षात येण्याचे आमंत्रण आपणास कोणी दिले? या कक्षात प्रवेश करण्यापूर्वी आपण महाराज सेतूपती किंवा राजकुमार नंदीतेज यांची अनुमती घेतली होती का?”
वज्रसेन याचे हे शब्द ऐकून इतका वेळ राजपुत्राच्या कक्षाचे निरीक्षण करणारा ब्राम्हण क्षणभर हसला आणि त्याने वज्रसेनाकडे लक्षपूर्वक कटाक्ष टाकला आणि तो म्हणाला,
“अनुमती! अरे हो अनुमती. तुमचे म्हणणे योग्य आहे. मला अनुमती घ्यायलाच हवी होती. परंतु नंदीमोक्ष राज्याचा भावी युवराज कोण असेल या उत्सुकतेने मला राहवले नाही. त्यामुळे मी कोणाचीही अनुमती न घेता थेट येथे आलो. माझ्या अश्या वागण्यासाठी मला जे काही शासन केले जाईल ते मला स्वीकार आहे. परंतु त्याआधी या ब्राम्हणाची एक इच्छा पूर्ण करा. मला राजकुमार नंदीतेज यांना भेटवा. मला त्यांच्याच तोंडून माझे जे काही शासन असेल ते ऐकायला आवडेल. त्यानिमित्त युवराजांच्या राज्यकौशल्याची मला अनुभूती येईल.”
त्या ब्राम्हणाचे म्हणणे ऐकून वज्रसेन क्षणभर गोंधळला. त्याला शंका आली कि त्या ब्राम्हणाला राजकुमार लुप्त होण्याची वार्ता आधीच मिळाली आहे. पण ते कसे शक्य होते? महाराजांनी हि बातमी प्रजेच्या समोर अद्याप उघड केली नव्हती. वज्रसेन म्हणाला,
“ ब्राम्हणदेव, युवराज अद्याप गादीवर विराजमान झालेले नाहीत. आपले शासन काय असेल ते महाराज सेतूपती ठरवतील. आपण माझ्या सोबत चलावे.”
“छे छे, जोपर्यंत राजकुमार मला भेटन नाहीत मी या कक्षातून हलणार देखील नाही.” इतके बोलून ब्राम्हणाने आपल्या सोबत आणलेली चटई जमिनीवर अंथरली आणि त्यावर तो फतकल मारून बसला.
वज्रसेनला आता ब्राम्हणाची चीड येत होती. तसा त्याने कोणत्याही ब्राम्हणाचा आजवर अपमान केला नव्ह्त्ता परंतु आजचा विषय जरा निराळा होता. अगोदरच राज्य अडचणीत होते त्यात ब्राम्हणाचा हट्टीपणा यामुळे त्याचा धीर संपला. रागारागाने तो त्या ब्राम्हणाकडे चाल करून गेला. आता त्याने ब्राम्हणाला फरफटत महाराजांकडे न्यायचे हे मनाशी पक्के केले होते. ते ब्राम्हणाला स्पर्श करणार इतक्यात मागून आलेल्या एका तीव्र स्वराने त्यांच्या या निर्णयावर लगाम घातला.
“अंगरक्षक वज्रसेन! हा काय अनर्थ करीत आहेस? “ राजपुरोहित षण्मुखानंद कक्षाच्या द्वारापाशी उभे होते.
राजपुरोहितांचा आवाज ऐकताच वज्रसेन थांबला आणि आपल्या रागावर नियंत्रण आणत विनम्रतापूर्वक हात जोडून तो म्हणाला,
“क्षमा करा, राजपुरोहित! परंतु हे ब्राम्हणदेव कोणाच्याही अनुमतीविना राजकुमारांच्या कक्षात घुसले आहेत आणि मला आदेश आहे कि.....”
“तुला काय आदेश दिले आहेत आणि नाही याचे मला पूर्णपणे भान आहे, वज्रसेन! आणि मला जितके ठाऊक आहे त्यानुसार तुला तुझ्या बुद्धीचा वापर करायचाच नाही असा आदेश मुळीच नाही. मग मला सांग कि यांचा अपमान करण्याआधी हे ब्राम्हणदेव नक्की कोण आहेत हे जाणून घेण्याची इच्छा तुला झाली नाही का?”
राजपुरोहीतांच्या शब्दांमुळे वज्रसेन थोडा निवळला परंतु त्याने अजूनही आपली तलवार म्यान केली नव्हती. राजपुरोहित जाणून होते कि वज्रसेन राजकुमार बेपत्ता झाल्यापासून येणाजाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संशयपूर्ण नजरेने पाहत होते त्यामुळे पुढे ते थोड्या समजावणीच्या स्वरात म्हणाले,
“ वज्रसेन, हे ब्राम्हणदेव म्हणजे दुसरे तिसरे कोणीही नसून महाविद्वान श्री श्री कपिलनारायण मोरयाशास्त्री आहेत. ज्यांचा निवास गणपती पुळे येथे असतो. त्यांचे कीर्तन, प्रवचन ऐकण्यासाठी मोठमोठाले विद्वान आतुर असतात. हे तर आपलं नशीब आहे कि स्वत: आपल्या राज्यात प्रकट झाले आहेत. आपले राज्य आधीच मोठ्या संकटात आहे आणि आज तुझ्याकडून यांचा उपमर्द झाला असता तर आपल्या राज्याचा सर्वनाश निश्चित झाला असता.असे म्हणून राजपुरोहित षण्मुखानंद मोरयाशास्त्री यांच्याकडे वळले आणि हात जोडून म्हणाले.
“ क्षमा असावी, गुरुशिरोमणी! अंगरक्षक वज्रसेन याने आपल्याला आधी कधी पहिले नव्हते त्यामुळे त्याच्या हातून हा प्रमाद घडला” असे म्हणून राजपुरोहीतांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला.
इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत वज्रसेनाने राजपुरोहितांना कोणाच्याही समोर साष्टांग नमस्कार घालताना पहिले नव्हते. राजपुरोहित षण्मुखानंद वयाने ज्येष्ठ होते आणि राज्यातील सर्वजण त्यांना साष्टांग नमस्कार करत असत. हे दृश्य पाहून वज्रसेनच्या हातातील तलवार गळून पडली आणि ते आता मोरयाशास्त्रींकडे क्षमायाचना करू लागले.
“ उठा राजपुरोहित, क्षमा करा मी अनुमती न घेता राजपुत्राच्या कक्षापर्यंत आलो. परंतु मला असा आभास झाला कि एखादी शक्ती आहे जिने मला इथवर खेचून आणले आहे. अंगरक्षक वज्रसेन तुम्ही देखील उठा. मला कल्पना आहे कि तुम्हाला राजकुमार नाहीसे झाल्यामुळे चिंता सतावते आहे.
“ आपल्याला राजकुमाराबाबत कल्पना आहे?” राजपुरोहित
“ काहीतरी अघटीत घडले आहे असं मला बोध होत आहे. अंगरक्षक वज्रसेन येण्याआधी जेव्हा काही क्षण मी येथे एकांतात होतो तेव्हा असे प्रतीत झाले कि काही दिवसांपूर्वी येथे शक्तीचा एक मोठा विस्फोट या कक्षात झाला असावा. इतका भयंकर जणू साक्षात महाकाल येथे तांडव करून गेले असावेत”
हे ऐकून राजपुरोहीतांच्या मुखमंडलावर भीती स्पष्ट दिसत होती. वज्रसेन आता भीतीने डोळे मोठे करून मोरयाशास्त्रींकडे पाहू लागला.
“ म्हणजे राजकुमार?....” राजपुरोहित..
“ ...जीवित आहेत....हे अनुमान तर तुमचे होरे सुद्धा सांगतील. परंतु प्रश्न हं आहे कि ते नक्की आहेत कोठे? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मला या कक्षात काही वेळ एकांतात व्यतीत करावा लागेल मला आशा आहे कि यामुळे आपणास काही आपत्ती नसावी” मोरयाशास्त्री वज्रसेनाकडे पाहून म्हणाले.
“अवश्य, राजकुमार नंदीतेज यांना परत आणण्यासाठी जे काही करावे लागेल ते सर्व काही करण्याची आमची तयारी आहे. आपण केवळ आज्ञा करावी.” राजपुरोहित
“ तर मग ठीक आहे. मला एकांत हवा आहे. अंगरक्षक वज्रसेन आपण या कक्षाच्या द्वारापाशी पहारा द्यावा आणि या गोष्टीची काळजी घ्या कि जोवर मी अनुमती देत नाही तोवर दस्तूरखुद्द महाराज सेतूपती देखील या कक्षात प्रवेश करता कामा नये.”
वज्रसेनाने आश्चर्याने तोंडाचा आ वासला होता. महाराज सेतूपती यांना थांबवण्याचे सामर्थ्य त्याच्याकडे नव्हते. त्याने राजपुरोहीतांकडे पहिले आणि त्यांनी इशारा केला असता ते म्हणाले
“जशी आपली इच्छा ब्राम्हणदेव!”
क्रमश:
लेखक : अक्षय मिलिंद दांडेकर