मोरयाशास्त्री आणि राजकुमार राजवाड्याबाहेर पडले आणि चालत चालत स्मशानभूमीवर पोहचले. तिकडे गेल्यावर राजकुमाराने स्वत:च्या हाताने आपली स्वत:ची चिता रचली. नंतर मोरयाशास्त्री डोळे बंद करून त्या चितेच्या समोर उभे राहिले. त्यांच्या बाजूला राजकुमार नंदीतेज देखील हात जोडून उभा राहिला. तो घाबरला नव्हता परंतु त्याचे मन वडील आणि इतर परीजानांच्या चिंतेने व्याकूळ झाले होते. राजपुत्राने मनातल्या मनात गणपती बाप्पाचा धावा केला. त्याच्या डोळ्यासमोर तीच मूर्ती उभी राहिली जी त्याने साक्षात्कारात पहिली होती.

“ राजकुमार नंदीतेज! हि तुझी चिता नाहीये. हा एक अग्निकुंड आहे. या अग्नीत तू तुझ्या जीवनाची पूर्णाहुती देणार आहेस. मी तुला एक गुरुमंत्र देईन. त्या मंत्राचा तू एक सहस्र वेळा मनापासून जप कर. त्यानंतर गणपती बाप्पाचे स्मरण करून या अग्निकुंडात प्रवेश कर.”

असे म्हणून मोरयाशास्त्री यांनी नंदितेजाला कानात गणपतीचा एकाक्षर मंत्र सांगितला. राजकुमाराने त्या मंत्राचा जप करायला सुरुवात केली आणि काही वेळातच त्याचा जप संपन्न झाला. मग राजकुमार चितेत प्रवेश करण्यासाठी पुढे सरसावला.

“नंदीतेज, राजकुमार नंदीतेज. थांब. असं करू नकोस....”

दुरून सम्राट सेतूपती याचे शब्द राजकुमारच्या कानावर पडले, पण तो थांबला नाही. समोर ज्वलंत असलेली चिता राजपुत्राला साक्षात गणरायाचे स्वरूप वाटत होती जणू काही उच्छिष्ट गणेश स्वत: राजकुमाराला सोबत नेण्यासाठी आले असावे. इतके दिवस नंदीतेजाने केलेल्या दुष्कर्माची अपराधी भावना आता त्याच्या मनात शिल्लक राहिली नव्हती. चितेच्या अगदी जवळ जाताच त्यांनी अग्नीला प्रणाम केला आणि त्यात लीलया प्रवेश केला. आता त्याचे संपूर्ण शरीर अग्नी ज्वालांनी घेरले होते तरी तो घाबरला नव्हता कि त्याच्या तोंडातून कोणताही दु:खी स्वर उमटला नव्हता.

सम्राट सेतूपती आपल्या पोटच्या गोळ्याला असा अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडताना पाहून मटकन खाली बसला. त्याच्या शरीरातून जणू प्राण निघून गेले होते. त्या चीतेमध्ये राजकुमार नंदीतेज याचा मृत्यू झाला आणि अशाप्रकारे ६ व्या दिवशी रात्री त्याच्या शिक्षेचा कालावधी देखील समाप्त झाला.

राजपुरोहित, वज्रसेन आणि अन्य सैनिक सेतूपतीला उठवायचा प्रयत्न करत होते. इतक्यात अचानक त्या चितेत एक भयंकर स्फोट झाला. सर्वांचे लक्ष एकाएकी तिकडे गेले.

सर्वांनी पहिले अग्नीमध्ये एक मानवाकृती उमटत होती. ती आकृती हळूहळू चालत चालत चितेतून बाहेर आली. राजकुमार नंदीतेज पुनर्जन्म घेऊन पुन्हा समोर आला होता. आता तो स्त्री रुपात नाही तर एका अग्नीप्रमाणे तेजस्वी पुरुषाप्रमाणे दिसत होता. साक्षात धर्मराजाचे तो प्रतिक भासत होता. त्या अग्निकुंडात त्याची सर्व दुष्कर्मे जळून राख झाली होती.

तो बाहेर आलं आणि त्याने सर्वप्रथम मोरयाशास्त्री यांना साष्टांग दंडवत घातला.

“उठ नंदीतेज, गणरायाने तुझ्या अगोदरच्या कष्टप्रद जीवनाचे भस्म करून तुला नवीन जीवनदान दिले आहे. हे आयुष्य आता त्यांचीच कृपा आहे हे लक्षात ठेव. यापुढे त्यांच्या साक्षीने धर्माचरण करूनच राज्यकारभार सांभाळ. गणराय तुला उदंड आयुष्य देवोत हा आशीर्वाद तुला मी देतो.” मोरयाशास्त्री म्हणाले

“मी तुमचा आजन्म ऋणी आहे. मी आजपासून आपणास या गणपती बाप्पाच्या साक्षीने गुरु मानले आहे. आपला आशीर्वाद कायम माझ्यावर असुद्या” नंदीतेज मोरयाशास्त्री यांना नम्रपणे म्हणाला.

“ शुभं भवतु!” मोरयाशास्त्री

त्यानंतर राजकुमार नंदीतेज आणि सेतूपती यांची गळाभेट झाली. हे दृश्य पाहून कठोर भासणारा वज्रसेन देखील आपले अश्रू आवरू शकला नाही.

पुढे ठरलेल्या दिवशी राजकुमार नंदीतेज याचा राज्याभिषेक झाला आणि तो सम्राट नंदीतेज झाला. त्या दिवशी त्याने भरपूर दानधर्म केला. गणपती बाप्पाची षोडशोपचारे पूजा केली. गोरगरिबांना आणि इतर प्रजेला अन्नदान केले. गुणवंत व्यक्तींचा गौरव केला. त्यांना वस्त्र, आभूषणे दिली. शेतकऱ्यांना गाय आणि बैल दान केले.

अशा प्रकारे नंदीतेज याने नंदीमोक्ष राज्याचा राज्यकारभार हाती घेतला. नंदीमोक्ष सम्राट नंदीतेज याला त्याची प्रजा साक्षात गणपती बाप्पाचा अवतार मानत असे. त्याने गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने राज्याच्या वैभवाची कीर्ती सर्वदूर पसरवली. सम्राट नंदीतेज याचे  नाव नंदीमोक्ष राज्याच्या इतिहासात स्वर्णअक्षरात लिहिले गेले.

ॐ गं गणपतये नमः

समाप्त

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel