दरवाजा उघडला आणि एक बाई आत आल्या. टीमची ओळख करून देताना त्यांनी स्वत:चे नाव डॉ सोनाली पर्रीकर असे सांगितले. त्या एक प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ होत्या. संमोहन क्षेत्रातील एक प्रथितयश व्यक्ती म्हणून त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले होते सरकार तर्फे त्यांच्या संशोधनासाठी आर्थिक सहाय्य देखील देऊ करण्यात आले होते. आवश्यकतेनुसार, सरकार त्यांची सरकारी किंवा निमसरकारी अशा कोणत्याही कार्यासाठी कुठेही नियुक्ती करत असे.
त्यांना महाराष्ट्रातील पुणे, या शहरातून पाचारण करण्यात आले होते. त्यांचे वय सुमारे ४५ वर्षे इतके असावे. साधारण साडेपाच फूट उंचीच्या डॉ. सोनाली पर्रीकर या दिसायला सुंदर, गोऱ्यापान आणि एक सुसंस्कृत स्त्री होत्या. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आदर आणि अभिमान दिसून येत होता. त्यांचे केस डार्क ब्राऊन रंगाचे होते त्यांची त्यांनी एक सैलसर वेणी घातली होती जी त्यांच्या कमरेपर्यंत आली होती. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य होते. त्यांनी एक वारली प्रिंट असलेली पेस्टल कलरची सुंदर अशी कॉटनची साडी नेसली होती. डोळ्यावर सोनेरी काड्यांचा चष्मा होता. कपाळावर चंद्रकोरीच्या आकाराची एक लाल रंगाची टिकली लावली होती. अगदी लाईट मेकअप केला होता. फिकट रंगाची लिपस्टिक लावली होती. त्यांनी मन धुंद करून टाकणारा सोनचाफ्याचा परफ्युम लावला होता.
देव सौंदर्य आणि बुद्धिमत्ता एकत्र सामायिक करण्यासाठी ज्ञात नाही, पण डॉ सोनाली पर्रीकर यांच्याकडे दोन्ही होते. अध्यात्मिक शांती आणि यशासाठी सर्व प्रकारची रत्ने त्यांनी नखशिखांत परिधान केली होती. त्याच्या उजव्या हाताला एक रक्षासुत्र बांधलेले होते, दोन्ही हातात सोन्याच्या दोन दोन बांगड्या, गळ्यात सोन्याची पातळ चेन आणि बोटात रत्न जडवलेल्या काही अंगठ्या होत्या.
तो माणूस खुर्चीला बांधलेला होता आणि त्याच्या आजूबाजूला जे चेहरे होते ते त्याने अगोदर कधीही पाहिले नव्हते. समोरच्या दाट धुक्याशिवाय त्याला फक्त टेबलांभोवती बसलेल्या सर्वांच्या अंधुक सावल्या दिसत होत्या. तो अवचेतन स्वरुपात जागृत झाला होता. त्याचे अर्धचेतन अवस्थेत असणे हा त्याला जबरदस्तीने दिलेल्या औषधांचा परिणाम होता. ज्यामुळे त्याला सगळंच अंधुक दिसत होतं.
आपल्या सहकाऱ्यांना भेटल्यानंतर डॉ.सोनाली पर्रीकर त्या कैद्या समोर बसल्या. प्रकाशाची सवय व्हावी म्हणून तो ज्या प्रकारे डोळे किलकिले करत होता, त्यावरून तो कितीतरी वेळ अंधारात असल्याचे स्पष्ट होत होते. डॉ.सोनाली पर्रीकर यांचे घारे डोळे समुद्रासारखे प्रखर आणि खोल होते. त्यांच्या डोळ्यात संमोहन शक्ती होती. त्या माणसाकडे बघून असे वाटले की तोही काहीतरी रहस्य लपवत आहे. त्याच वेळी त्यांन हे देखील जाणवले की तो माणूस अजूनही पूर्णपणे शांत आणि आरामात आहे. त्याच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची भीती किंवा काळजी अशी दिसत नव्हती. त्याच्या बॉडी लैन्ग्वेज वरून तो धाडसी आणि आत्मविश्वासाने भरलेला दिसत होता.
या सर्व प्रकारानंतर चौकशी सुरू होणार होती.
डॉ. सोनाली काही बोलायच्या आधीच त्या माणसाने स्वतःची ओळख करून दिली.
“अनंत महाकाल.”
क्रमश: