एकवेळ त्या माणसाने स्वत:ला सोडवण्याचा प्रयत्न केला असता किंवा किंचाळला असता तर डॉ.सोनाली पर्रीकर यांना आश्चर्य वाटले नसते कारण त्यांनी याआधी अशा सर्व प्रकरणांमध्ये असा अनुभव घेतला होता; पण या व्यक्तीच्या सहनशीलतेमुळे त्या काहीशा अस्वस्थ झाल्या. त्यांनी  डॉ. चंदावरकरांकडे पाहिले. त्या माणसानेही डॉ. सोनाली पर्रीकर यांच्या नजरेच्या दिशेने डोके वळवले. डॉ. चंदावरकरांची स्पष्ट झलक घेण्यासाठी तो थोडा पुढे वाकला चंदावरकर यांना पाहताच चे डोळे चमकले आणि तो अचानक ओरडला, “अण्णा ”

सगळे त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले.

"काय?" डॉ. मेहता यांनी चिंताग्रस्त स्वरात विचारले.

तो माणूस डॉ. चंदावरकरांकडे बघतच राहिला, जणू तो त्यांना खूप दिवसांनी पाहतोय!

डॉ. चंदावरकर संतापले. आपली चेष्टा केली जात आहे असे त्यांना वाटले.

या घटनेने ब्रिगेडियर रणधीर यांनाही आश्चर्य वाटले. असा विचित्र माणूस त्यांना कधीच भेटला नव्हता.

अचानक कोणीतरी अघोरीचं नाक कापसाच्या बोळ्याने झाकलं. त्या कापसाला विचित्र असं उग्र वास येत होता.

अनंत महाकाल हळूहळू बेशुद्ध झाला. कोणतेही विचार नाहीत, भावना नाहीत, तो पूर्णपणे शांत झाला.

तो हिप्नोटाइज होणार आहे हेही त्याला माहीत नव्हते.

पूर्ण नियंत्रणात आल्यावर डॉ.सोनाली पर्रीकर यांनी कैद्याला विचारले.

"तू कोण आहेस?"

"अनंत महाकाल." त्याने बेशुद्ध अवस्थेत उत्तर दिले.

“अनंत साहेब हे आम्हाला माहीत आहे. आम्हाला काय माहित नाही ते सांगा,"

डॉ सोनाली पर्रीकर म्हणाल्या.

"तुम्हाला काहीच माहित नाही!" अनंत बडबडला.

“हो, अनंत साहेब, आम्हाला काहीच माहित नाही. म्हणूनच तुम्ही इथे आहात. पण एक गोष्ट आम्हाला पक्की माहीत आहे की तुमचे खरे नाव ‘अनंत महाकाल’ नाही.”

"तुझे खरे नाव काय आहे? सांग...!" डॉ.सोनाली पर्रीकर यांनी पुन्हा विचारले.

"मला आठवत नाही." अनंत महाकाल हळू आवाजात म्हणाला.

‘ हा एका संमोहित व्यक्तीकडून अनपेक्षित प्रतिसाद....’ डॉ सोनाली पर्रीकर यांनी विचार केला.

हातात एक पौराणिक पुस्तक घेऊन खुर्चीवर बसून अभिषेक वाचता वाचता म्हणाला, “खोटं!”

"तो खोटं बोलू शकत नाही." विरोध करत डॉ. मेहता म्हणाले,

"त्याला नारको टेस्टसाठीची औषधे देण्यात आली आहेत." डॉ. मेहता हताश दिसत होते.

"नारको!?" अभिषेकने विचारले आणि उत्तराच्या आशेने डॉ.मेहता यांच्याकडे पाहिलं.

“असं समजा कि हे सत्य बोलण्याचे औषध आहे. हे घेतल्यावर कोणी खोटे बोलू शकत नाही.” स्पष्टीकरण देण्यात फारसा रस नव्हता तरीहि डॉ. मेहता यांनी उत्तर दिले.

डॉ. मेहता यांचे पूर्ण नाव डॉ. पार्श्वनाथ मेहता होते. ते एक प्रामाणिक आणि जबाबदार व्यक्ती होते. त्यांना फक्त लॉजिक आणि विज्ञान यावर विश्वास होता. ते काहीसे रागीट होते. डॉ. मेहता यांचे वागणे नक्की कसे असेल याचा पत्ता लागत नसे. ते केवळ विलक्षण परिस्थितीतच आशावादी दिसत असत.

"आणि तो संमोहित देखील आहे." डॉ.सोनाली यांनी डॉ.मेहता यांच्याशी सहमती दर्शवली.

दोघांनीही अभिषेककडे पाहिले. अभिषेक खांदे उडवत कुजबुजला,

“वैद्यकीय शास्त्राच्या पलीकडे अनेक गोष्टी असतात.” आणि त्याने त्याचे पुस्तक वाचायला सुरुवात केली.

साधारण ३५ वय असलेल्या अभिषेकने आपल्या आयुष्यातील ३० वर्षे हिंदू पौराणिक ग्रंथाचा अभ्यास केला होता. त्यामुळे त्याला या विषयी प्रचंड ज्ञान होते. नाशिक जिल्ह्यातील  राजपुरोहितांच्या ब्राह्मण कुटुंबातून आलेल्या अभिषेकला त्याच्या गावातील  श्रद्धाळू लोक देव मानत असत . सन्मान आणि प्रतिष्ठा सर्व प्रकारे अनुभवल्यामुळे त्याला त्याच्या ज्ञानाचा थोडासा गर्व देखील होता. इतरांच्या चुकांवर बिनधास्तपणे टीका करणे हा त्याचा मूळ स्वभाव होता.

अभिषेक गोरापान होता, साधारण ५ फूट ६ इंच उंच, त्याचे शरीर काहीसे थुलथुलीत होते आणि पोट किंचित बाहेर होते. काहीसा स्थूल  बांधा असलेला अभिषेक वेदपाठक टिपिकल देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण तरुण होता. त्याने कानात भिकबाळी घातली होती. गळ्यात एक रुद्राक्षाची माळ होती. उजव्या हाताच्या मनगटावर रक्षासूत्र बांधलेले होते सोबत एक चांदीची ब्रेसलेट होती. गळ्यात चांदीची साखळी होती. त्याबरोबर ब्लूटूथ हेडसेट देखील होता. डाव्या हाताच्या मनगटावर एक भगव्या रंगाचे स्मार्ट वॉच घातले होते.  कपाळावर चंदनाचा टिळा लावला होता. त्याने सैलसर असा पिवळा हाफ कुर्ता घातला होता ज्यावर ‘हर हर महादेव’ आणि ‘ओम’ या अक्षराचे डिझाईन होते. त्याच्या डाव्या बाजूच्या हाफ असणाऱ्या बाहीमधून त्याचं जानवं एक सारखं बाहेर येत होतं. अधेमध्ये ते जानवं तो पुन्हा कुर्त्याच्या गळ्यातून हात घालून कुर्त्यामध्ये खेचून व्यवस्थित करत होता. त्याने एक साधी निळ्या रंगाची डेनिम जीन्स घातली होती, पायात कोल्हापुरी चप्पल होती.

त्याच्या खांद्यावर एक ‘शबनम’ लटकलेली होती, त्या ‘शबनम’ मध्ये सनातन धर्मावर आधारित काही पुस्तके होती. पौराणिक कथा आणि सनातन धर्म याचा तो कट्टर पुरस्कर्ता होता आणि हे त्याच्या पोशाखातून स्पष्टपणे दिसून येत होते. त्याने देखील विविध रत्नांनी जडलेल्या अनेक अंगठ्या परिधान केल्या होत्या. त्याला विचारले तर त्याच्या अंगठ्या आणि ग्रहांबद्दल किंवा कोणत्याही ज्योतिष शास्त्रीय विषयावर भाष्य करण्यास तो समर्थ होता.

क्रमश:

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel