सोनाली, एक धाडसी पत्रकार, मुंबईतील अंधेरी येथील एका प्रमुख न्यूज चैनलसाठी काम करत होती ज्याचे नाव होते "बातम्या तुमच्यासाठी रात्रंदिवस". तो बोरिवली येथे इतर दोन मैत्रिणी सोबत रूमवर राहायची.  तिचं ध्येय नेहमीच सत्याचा शोध घेणं आणि समाजातल्या गैरव्यवहारांना उजेडात आणणं होतं. तिने अनेक धाडसी बातम्या कव्हर केल्या होत्या, ज्यामुळे ती चर्चेत होती. तिची धावपळ आणि व्यस्त दिनचर्या असली तरी ती साहित्य, कला आणि संस्कृतीमध्ये रस घेणारी होती. आधी ती "तिसरा डोळा" या न्यूज चॅनल मध्ये काम करायची पण तिने त्याच न्यूज चॅनेलचा मुख्य संपादक "संपतकुमार" यांच्या विरोधात स्टिंग ऑपरेशन केले. फक्त सत्ताधारी राजकीय पक्षाच्या बाजूने वर्षभर बातम्या देण्याचे त्यांनी कबूल केले व त्या बदल्यात त्या पक्षाकडून त्यांनी भलीमोठी रोख रक्कम घेतली होती. त्यानुसार सर्व कर्मचाऱ्यांना ते बातम्या देतांना त्यात सोयीनुसार बदल करण्याची सूचना देणार होते. पुढील वर्षी आणखी दहा टक्के वाढीव रोख रक्कम! हा व्यवहार कुणाला संशय येणार नाही अशा रीतीने मुंबईच्या मरीन ड्राइव्हवर घडला. 

पण सोनालीला आधीच यांची कुणकुण लागली होती जेव्हा तिने संपतकुमार यांना चॅनलच्या कार्यालयात उशिरा रात्री फोनवर हळू आवाजात याबद्दल वॉशरुमजवळ बोलतांना ऐकले. ती आणखी एका सहकाऱ्याला सोबत घेऊन वेश बदलून मरीन ड्राइव्हवर आधीच हजर होती आणि तिने मोबाइल कॅमेरतून या सर्व प्रकारची शूटिंग केली आणि त्याच चॅनेलवर संपतकुमार विरोधात एका न्यूज एंकरला हाताशी धरून अर्ध्या तासाचा शो चालवला. संपतकुमार यांना अटक झाली, पण सत्ताधारी पक्षातील लाच देणारी व्यक्ती मात्र राजकीय दबाव टाकून सहीसलामत सुटला. पण सोनालीला कामावरून काढण्यात आले. मग "तिसरा डोळा" चे प्रतिस्पर्धी चॅनेल "बातम्या तुमच्यासाठी रात्रंदिवस" कडून तिला ऑफर आली. "तिसरा डोळा" च्या मालकांनी "सुंदरकुमार" यांना त्या मराठी चॅनलचे मुख्य संपादक बनवले. 

आदिनाथ, एक हुशार आर्टीस्ट होता. तो व्यंगचित्रे, शिल्पकला, कॅलिग्राफी (हस्ताक्षरकला) आणि पेंटिंगमध्ये अत्यंत कुशल होता. त्याच्या कला प्रदर्शनांनी आणि शिल्पांनी अनेकांची मनं जिंकली होती. मुंबईतील अनेक नवीन मंदिरांत त्याने बनवलेल्या मूर्ती स्थापित केल्या गेल्या होत्या. तो माटुंगा येथील आपल्या आपल्या आर्ट स्टुडियोमध्ये तासंतास काम करत असे आणि त्याच्या कलाकृतींच्या माध्यमातून तो आपल्या भावना व्यक्त करत असे. त्याचा छोटासा स्टुडिओ आणि छोटीशी रूम हे एकच ठिकाणी होते. अनेकदा आपल्या कलेतून मांडलेल्या ज्वलंत सामाजिक विषयांमुळे त्याला सत्ताधारी आणि विरोधी राजकीय पक्षांकडून धमक्यांचा सामना करावा लागला. पण व्यंगचित्रे, शिल्पकला, हस्ताक्षरकला आणि पेंटिंग ही माध्यमे समाजात बदल घडवून आणण्यासाठी प्रभावी माध्यमे आहेत असे त्याला वाटायचे आणि त्यांचा पुरेपूर उपयोग करून घ्यायचा असे त्याचे ठाम मत होते. पैसे कमावणे हा उद्देश दुय्यम होता. आदिनाथचे कुटुंबीय गावी आपली शेती असल्याने तिथेच राहणार होते. त्यांनी आदित्यला आपले करिअर निवडण्याची पूर्ण स्वतंत्रता दिली होती. 

पण आपला हेतु कितीही उदात्त असला तरीही समाजातील मुलींचे पालक त्याला लग्नासाठी आपल्या मुली द्यायला तयार होत नव्हते. कारण असा कलाकार म्हणजे त्याचे महिन्याचे इन्कम फिक्स नसणार! कलाकार मग तो कोणताही असो, त्याच्या जीवनात आर्थिक चढ उतार खूप असणार!

सोनालीच्या घरी सुद्धा लग्नाच्या गोष्टी सुरू होत्या. परंतु सोनाली नेहमी बाहेर फिरस्तीवर असेल याबद्दल मुलाकडच्या मंडळींचा आक्षेप होता. कधी कधी चार-पाच दिवस दुसऱ्या गावात किंवा शहरात जाऊन तीला मुक्काम करावा लागायचा, हे त्यांना मुळीच पसंत नव्हते. बहुतेक मुलांच्या घरी त्यांचे आई-वडील असल्यामुळे त्यांना सांभाळणे ही मुख्य अपेक्षा मुलाकडच्या मंडळींची होती. 

एकदा, मुंबईत एका प्रसिद्ध आर्ट गॅलरीत एका प्रदर्शनाचं आयोजन केलं गेलं होतं. या प्रदर्शनात विविध कलाकारांनी त्यांच्या कलाकृती मांडल्या होत्या, आणि पत्रकारांनाही त्याच्या कव्हरेजसाठी आमंत्रित केलं होतं. सोनालीला तिच्या न्यूज चैनलसाठी या प्रदर्शनाचं कव्हरेज करायचं होतं. साहित्य, कला आणि संस्कृतीमध्ये रस असल्याने ती आनंदाने हे कव्हरेज करायला तयार झाली.  

प्रदर्शनाच्या दिवशी, सोनाली आर्ट गॅलरीत पोहोचली. तिने आपल्या कॅमेरामॅनसह तिथल्या कलाकृतींचं निरीक्षण सुरू केलं. आदिनाथच्या कलाकृतींनी तिचं लक्ष वेधलं. त्या कलाकृतींच्या बाजूने जाताच तिला आदिनाथ भेटला. त्याच्या कलेबद्दल प्रत्येक प्रेक्षकाच्या प्रतिक्रिया तो तन्मयतेने ऐकून घेत होता. 

कोरड्या खोल विहिरीमध्ये आक्रोश करणारा शेतकरी आणि त्याची "वाचवा" अशी हाक विहिरीच्या काठापर्यंत गोल गोल उभे असलेले अधिकारी, मंत्री, प्रशासन यातील मंडळी यांच्यापर्यंत पोहोचत असूनही ते त्याला हसत होते, असे एक चित्र प्रदर्शनात मांडले होते. 

ते चित्र सर्वांना आवडले. सोनालीला सुद्धा आवडले. त्या खास चित्रावर फोकस करून तिने टीव्हीवर दहा मिनिटांचा स्पेशल प्रोग्राम बनवला. त्या चित्राला खूप प्रसिद्धी मिळाली. आदिनाथचं  एकूणच व्यक्तिमत्व, त्याच्या डोळ्यांतील चमक आणि त्याच्या बोलण्यातलं आदर हे तिला खूप आवडलं. आपले कलेद्वारे समाजात जागृती आणण्याचे, तसेच समाजात असलेल्या विसंगतीवर बोट ठेवणे हा हेतू सोनालीला खूपच आवडला. एक चित्र किंवा शिल्प हे हजार शब्दांचे काम करते हे काही खोटे नाही! 

सोनालीने आदिनाथशी संवाद साधला आणि त्याच्या कलाकृतींबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आदिनाथने अत्यंत नम्रतेने त्याच्या शिल्पकलेच्या आणि एकूणच त्याच्या कलेच्या प्रवासाची कहाणी सांगितली.  त्याचा संभाषणातला प्रामाणिकपणा आणि तिची कलेविषयीची आवड याद्वारे दोघांच्या मनात एकमेकांविषयी आदर निर्माण झाला.तिच्या क्षेत्राबद्दलसुद्धा आदिनाथ याला कुतूहल आणि आकर्षण होतेच आणि आता तर तिच्याबद्दलही आकर्षण निर्माण व्हायला लागले.

प्रदर्शनानंतर आदिनाथने सोनालीला त्याच्या स्टुडियोला येण्याचं आमंत्रण दिलं, जेणेकरून ती त्याच्या इतर कलाकृती आणि त्याच्या कामाची पद्धत बघू शकेल. सोनालीने ते आमंत्रण आनंदाने स्वीकारलं. स्टुडियोतल्या भेटीत त्यांच्या संभाषणात गहिरेपणा आला. दोघांनाही एकमेकांच्या आवडी-निवडी, विचारधारा, आणि जीवनातील उद्दिष्टांविषयी जाणून घेण्याची उत्सुकता वाढली.

पौराणिक प्रसंगांवर आधारित त्याची शिल्पे फक्त बघता सोनाली हरवून गेली. तसेच विविध प्रसंगावरील त्याची चित्रे बघून सोनाली खूप प्रभावीत झाली. 

दरम्यान, काळानुसार बदलले पाहिजे म्हणून आदिनाथने आपल्या कलेमध्ये आधुनिकता आणण्याचा प्रयत्न केला.टॅब वापरुन स्टाइलस् पेनद्वारे पण त्याने चित्रे काढण्याचे कौशल्य हस्तगत केले. त्याची सर्व चित्रे त्याने इलेक्ट्रॉनिक माध्यमातून डिजिटली जतन करून ठेवली. त्यांचे कॉपीराईट्स मिळवले. याबद्दल सोनालीची त्याला बरीचशी मदत झाली. 

आधी मैत्री म्हणून सुरू झालेलं त्यांचं नातं हळूहळू प्रेमात बदललं. आदिनाथच्या सोबतीने सोनालीला तिच्या व्यस्त आयुष्यात एक शांततेचा किनारा मिळाला. तसेच, सोनालीच्या धाडसी वृत्तीने आदिनाथला जीवनात एक नवी प्रेरणा मिळाली. तिने स्वतःच्या चॅनेलच्या मुख्य संपादकाविरुद्ध केलेले स्टिंग ऑपरेशनबद्दल तो ऐकून होता. त्याबद्दल पुन्हा सोनालीकडून त्याने ऐकले आणि तिच्या धाडसी वृत्तीची त्याने भरभरून प्रशंसा केली. तिच्या स्वभावाच्या तो अगदी विरुद्ध होता आणि हेच त्यांचे एकमेकांवर प्रेम बसण्याचे मुख्य कारण बनले.

जुलै महिन्यात आदिनाथला सहज भेटायला सोनाली स्टुडिओमध्ये आली होती. बाहेर खूप जोरदार पाऊस सुरू झाला. सगळीकडे वाहतूक ठप्प झाली. सोनालीला आदिनाथच्या स्टुडिओमध्ये मुक्काम करावा लागला. स्टुडिओमध्येसुद्धा एका बाजूला बेड होते. त्या मुक्कामा दरम्यान एक शिल्प बनवता बनवता आदिनाथ आणि सोनालीच्या मनामध्ये जोरदार आकर्षण निर्माण झाले. स्टुडिओमध्ये सगळीकडे ठेवलेल्या विविध शिल्पांच्या मधून दोघांचा लपंडाव सुरू झाला. शेवटी त्याने तिला मागून घट्ट मिठी मारली आणि लवकरच दोघेजण एक झाले. प्रेमधारा बरसू लागल्या आणि दोघांना प्रेमाचा उत्कट अनुभव देऊनच थांबल्या. असा प्रेमाचा अनुभव दोघांनी आयुष्यात कधी घेतला नव्हता. सकाळी काहीही न बोलता रात्रीच्या प्रेमाची सुखद आठवण मनात जागवत ती निघून गेली. दिवसभर तोही त्याच आठवणीत गुंतला.  

एकदा, एका सुंदर सायंकाळी, आदिनाथने सोनालीला मुंबईच्या मरीन ड्राइव्हवर फिरायला नेलं आणि तिथेच तिला विवाहासाठी प्रपोज केलं. सोनालीने आनंदाने ते प्रपोज स्वीकारलं. 

काही महिन्यांनी त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल त्यांच्या कुटुंबीयांना सांगितलं. दोन्ही कुटुंबांनी त्यांचं प्रेम स्वीकारलं आणि त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. त्यांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. आदिनाथने त्यांच्या लग्नासाठी एक खास शिल्प तयार केलं, जे त्यांच्या प्रेमाची निशाणी होती. सोनालीने त्यांच्या कथा सांगणारे काही खास लेख तयार केले. त्यांच्या लग्नाचा सोहळा एक सुंदर कलाकृतीसारखा झाला, ज्यात दोघांच्या जीवनातील विविध पैलूंचं संगम होता!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel