एके दिवशी एक कंजूस माणूस आपल्या तिजोरीत असलेले रुपये मोजत असता पिंजर्यातून बाहेर पडलेल्या त्याच्या पोपटाने त्यातला एक रुपया चोचीत धरून नेला व खोलीतल्या कोनाड्यात लपवून ठेवला. काही वेळाने त्या माणसाने पुन्हा रुपये मोजून पाहिले, तर त्यात एक रुपया कमी होता. त्यामुळे त्याला फार दुःख झाले व त्यातच तो उभा राहीला असता वर पाहतो तो पोपट कोनाड्यात काहीतरी लपवत आहे असे त्याला दिसले. मग तो पोपटाला म्हणाला, 'अरे चोरांच्या राजा, माझा रुपया चोरून तूच नेलास ना ? बोल, तुझ्यासारख्या पक्ष्याला त्याचा काय उपयोग ? उलट ह्या भयंकर अपराधामुळे मी तुझा जीव घेईन.' पोपट त्यावर म्हणाला, ' मालक, असे रागवू नका. तुम्ही लोकांना ज्याप्रमाणे लुबाडता त्याप्रमाणे मी तुम्हाला लुबाडण्यापलीकडे काय केलं आहे बरं ? तुम्ही तुमच्या पैशाचा ज्याप्रमाणे उपयोग करता त्याचप्रमाणे मीही तो करतो आहे. फक्त एक रुपया लपवून ठेवल्याबद्दल तुम्ही माझा जीव घेणार असाल तर हे लाखो रुपये लपवून ठेवल्याबद्दल तुम्हाला कोणती भयंकर शिक्षा द्यावी, सांगा बरं ?'
तात्पर्य
- आपण वाटेल तसे वागावे व इतर तसे वागू लागल्यास त्यांना नावे ठेवावीत हा माणसाचा स्वभावच आहे.