एकदा एक गरुडाने एका सशाच्या बिळावर झडप घालून तेथली सर्व पिले उचलून नेऊन आपल्या पिलांना खायला दिली. त्या पिलांची आई गरुडाकडे जाऊन म्हणाली. 'गरुडमहाराज, माझ्या गरीब पिलांना सोडून द्या. मोठे आणि बलवान असलेल्यांनी गरीबावर दया करून त्याचं रक्षण करावं.' पण गरुडाने तिचे न ऐकता ती सर्व पिले खाऊन टाकली. पिलांची ती म्हातारी आई बिळात परत आली व आपल्या सर्व मित्रांना बोलावून म्हणाली, 'असल्या निर्दय कृत्याबद्दल आपण सर्वांनी त्या गरुडाला शिक्षा केली पाहिजे. तेव्हा सर्वांनी मिळून विचार केला की, ज्या झाडावर त्या गरुडाचे घरटे आहे त्या झाडाची सर्व मुळे पोखरून खाऊन टाकावी, म्हणजे झाड आपोआपच पडेल.' त्याप्रमाणे करताच काही दिवसांतच ते झाड निर्जीव झाले व थोडा वारा सुटताच कोसळून पडले. त्याबरोबर त्या गरुडाचे घरटे पडले व त्यातील काही पोरे मेली व बाकीची क्रूर प्राण्यांनी खाऊन टाकली.
तात्पर्य
- आपल्याला थोडासुद्धा त्रास देऊ शकणार नाही इतका दुबळा जगात कोणीही नाही