स्वत: अविश्रांत काम करणारा असल्यामुळें आपल्या गुलामांनींहि मरेपर्यंत काम करावें अशी त्याची अपेक्षा असे. 'गुलाम झोंपलेला नसेल तेव्हां काम करीतच असला पाहिजे' असें त्याचें एक वचन होतें.
घरीं कधीं मेजवानी वगैरे असली व त्या वेळेस त्याच्या गुलामांच्या हातून बारीकशीहि चूक झाली तरी तो स्वत: गांठाळ वादीच्या चाबकानें त्यांस फटके मारी. आपल्या नोकरांना शिस्त कशी लावावी हेंच जणूं तो आलेल्या पाहुण्यांस शिकवी. आपल्या म्हातार्या झालेल्या गुलामांनाहि तो शांततेनें मरूं देत नसे ; त्यांना तो कमी किंमतीस विकून टाकी. घाण झालेला वाईट माल काढून टाकावा तसा हा सजीव माल तो विक्रीस काढी. कॅटोचें चरित्र लिहितांना प्ल्युटार्क म्हणतो, ''माझी सेवाचाकरी करून म्हातारा झालेला बैलहि माझ्यानें विकवणार नाहीं, वृध्द गुलामांची गोष्ट तर दूरच राहो !''
कॅटो उत्कृष्ट वक्ता होता. तो संताप्रमाणें बोले पण डुकराप्रमाणें कुकर्मे करी. 'वाणी संताची व करणी कसाबाची' असा तो होता. शेजार्यांच्या अनीतीवर तो कोरडे उडवी. तरी पण तो स्वत:च्या कालांतलां सर्वांत मोठा पापशिरोमणि व शीलभ्रष्ट मनुष्य होता. पिळणूक करूं नये असा उपदेश तो लोकांस करी, पण स्वत: मात्र अत्यंत पिळणूक करी. आपल्या मुलीदेखत पत्नीचें चुंबन घेतल्याबद्दल त्यानें एका सीनेटरवर नीतिउल्लंघनाचा खटला भरला व कठोर भाषण केलें. पण दुसर्यांच्या बायकांचे पती जवळ नसताना तो त्यांचे मुके खुशाल घेई ! सार्वजनिक भाषणांत तो सदैव म्हणे, ''दुबळ्या म्हातारपणाला सद्गुणाच्या काठीचा आधार सदैव हवा.'' तो एकदां म्हणाला, ''वार्धक्य आधींच विकृत व विद्रुप असतें. ती कुरूपता व विकृतता आणखी वाढवूं नका.'' पण एकदां आपल्या सुनेला भेटावयास गेल्या वेळीं त्यानें तिच्या दासीलाच भ्रष्ट केलें ! आणि त्या वेळीं तो ऐशीं वर्षांचा थेरडा होता !
जे दुर्गुण त्याच्या रोमरोमांत भिनलेले होते, ज्या दुर्गुणाचा तो मूर्तिमंत पुतळा होता, त्याच दुर्गुणांसाठीं तो दुसर्यांवर मात्र सारखे कोरडे उडवीत असे ! दुसर्यांचे दोष पाहण्यात तो अग्रेसर होता. स्वत:च्या वाईट वासना तो खुशाल तृप्त करून घेई ; परंतु दुसर्यांच्या तसल्याच वासना मात्र दाबून ठेवून तो स्वत:च्या पापाचें जणूं परिमार्जनच करी !! दुसर्यांच्या वासना दडपून टाकणें हीच जणूं त्याला स्वत:ला शिक्षा !!!
स्वत:च्या देशावर त्याचें फार प्रेम असे. पण आपलें आपल्या देशावर जितकें प्रेम आहे त्यापेक्षां अधिक प्रेम आपल्या देशानें आपणावर करावें असे त्याला वाटे. तो देशाला जणूं देवच मानी ; पण देशबांधवांनींहि आपणास देव मानावें असें त्याला वाटत असे. 'कॅटो रोमचा जितका ॠणी आहे त्यापेक्षां रोम कॅटोचें अधिक ॠणी आहे' असें तो म्हणे. आपणास इटॅलियन राष्ट्राचा भाग्यविधाता बनविण्यांत परमेश्वरानें फार उत्कृष्ट गोष्ट केली असें त्याला वाटे. 'माझ्या हातांत इटलीचें भवितव्य सोंपविण्यांत परमेश्वरानें फार चांगली गोष्ट केली' असें तो म्हणे. आपण म्हणजे परमेश्वराच्या हातची अपूर्व कृति असें त्याला वाटे.