तो त्याच्याहि पुढें जाऊन म्हणतो, ''परमेश्वराची आपल्या भक्तांवर फार कृपा असते. नरकांत खितपत पडलेल्या प्राण्यांच्या होणार्‍या छळांचा विचार करून स्वत:चें सुख वृध्दिंगत करण्यास प्रभु त्यांना परवानगी देतो.'' दुसर्‍यांचें दु:ख पाहून आपण तसे दु:खी नाहीं असें मनांत येऊन अधिक सुखी होणें किंवा ''दुसर्‍यांचा कसा छळ होत आहे ?'' असें मिटक्या मारीत म्हणून आपला आनंद द्विगुणित करणें रानटीपणाचें तर खरेंच, पण मध्ययुग जणूं रानटीपणाचेंच प्रतीक आहे. (२) दुसरा उतारा पर्गेटोरियाच्या सातव्या सर्गांतला आहे. पर्गेटरींतल्या सॉर्डेलो नामक एका जिवाला व्हर्जिल नरकांतील एका भागाचें वर्णन ऐकवीत आहे. तो म्हणतो, ''मी त्या निराशेच्या नरकात खालीं खोल खितपत पडलेला असतो. मर्त्य जन्मीच्या पापांपासून सुटका होण्यापूर्वी लहान मुलांना तेथें मृत्यूचे दांत सारखे चावीत असतात.'' डान्टेच्या मतें केवळ विधर्मी, नास्तिक व पाखंडीच तेवढे नरकांत पडतात असें नव्हे तर निष्पाप मुलेंहि नरकाग्नींत हाल भोगतात ! बाप्तिस्मा मिळण्यापूर्वीच जर लहान मुलें मेलीं तर तीं नरकांत आलींच पाहिजेत व त्यांनीं तेथील यातना भोगल्याच पाहिजेत. ज्या जगांत डान्टे राहत होता, तें मूर्खपणाचें जग होतें; तें अंधळें, संकुचित, दुष्ट, नष्ट, बेशरम आणि असहिष्णुतेनें भरलेलें असें होतें. डान्टेचें मन आपण जाणूं शकलों तरच क्रूसेड्स्-इन्क्विझिशनसारखीं छळण्याची मध्ययुगीन साधनें व संस्था आपण समजूं शकूं. मध्ययुगें सुंदर होतीं हें खरेंच; तें नाकारतां येणार नाहीं. पण केवळ सौंदर्य पुरेसें नसतें. भूकंपांतहि नसतें का एक प्रकारचें सौंदर्य ? एकादा हिमप्रपात, समुद्रावरील एकादें भीषण वादळ, ज्वालामुखीचा एकादा स्फोट, विजेचा एकादा लखलखाट, व्यवस्थित रीतीनें योजनापूर्वक पार पाडलेला एकादा खून, दोन रानटी सैन्यांतील एकादें युध्द, या सर्वांतहि एक प्रकारचें सौंदर्यं असतेंच ! पण ही सुंदरता, ही भव्यता विसंवादी असते. हें विनाशाचें, विध्वंसाचें, मूर्खतेचें सौंदर्य होय. हें सौंदर्य भेदांनीं विदीर्ण झालेल्या रोगट व फिक्कट जगाचें आहे. डान्टेच्या महाकाव्यांतील व तेराव्या शतकांतील जगाचें सौंदर्य असें भेसूर आहे. जवळजवळ हजार वर्षे युरोप या दुष्ट भ्रमांत होतें कीं, सर्वांनीं ख्रिश्चन तरी व्हावें नाहीं तर कायमचें नरकांत तरी पडावें अशी ईश्वराचीच इच्छा आहे. डान्टेनें या भ्रमाचा वारसा घेतलेला होता. इन्क्विझिटरहि याच भ्रमांत होते. या दुष्ट भ्रमाभोंवटीं डान्टेनें महाकाव्य निर्मिलें व छळ कसा करावा याची माहिती इन्क्विझिटरांनीं डान्टेच्या या छळाच्या ज्ञानकोशांतून घेतली. डान्टेनें चर्चच्या शत्रूंना काव्यांत केवळ अलंकारिकरीत्या जाळून टाकलें; पण इन्क्विझिटर्स कवी नसून प्रत्यक्षवादी व्यवहारी असल्यामुळें त्यांनीं चर्चच्या शत्रूंना प्रत्यक्षच जाळलें ! व्हॉल्टेअरच्या हिशेबाप्रमाणें चर्चच्या आज्ञेनुसार जवळजवळ एक कोटि माणसें जिवंत जाळलीं गेलीं असतील व तीं कां ? तर तीं केवळ परधर्मीय होतीं म्हणून, कॅथॉलिक ख्रिश्चन नव्हतीं म्हणून !

डान्टेचें 'डिव्हाइन कॉमेडी' हें जगांतील अत्यंत थोर अशा प्रतिभासंपन्न कवीचें, अतिशय उदात्त अशा स्वप्नवीराचें महाकाव्य. त्याच्यासारख्या अत्यंत थोर व प्रतिभासंपन्न कवीला असा विषय मिळावा, असें ध्येय मिळावें, पण असे दुष्ट भ्रम त्यानें धर्म म्हणून कवटाळावे ही एक दुर्दैवी घटना आहे. डान्टेची ही फार मोठी कींव येण्याजोगी चूक झाली. मानवी इतिहासांतील हा भयंकर दैवदुर्विलास होय !

- ३ -

डान्टे इ.स. १३१७ मध्यें मरण पावला व त्याच्याबरोबरच मध्ययुग संपलें असें सांगण्यांत येतें; पण असें वाटेल तें ठोकून देणें ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचें असतें. दुर्दैवानें अद्यापिहि कोट्यवधि स्त्री-पुरुष मध्ययुगीन असहिष्णु व संकुचित जगांतच वावरत आहेत ! आणि त्यामुळें शांति व प्रगति स्थगित झाल्या आहेत. मध्ययुग अजूनहि गेलेलें नाहीं. तोच रानटीपणा, तोच अंधळेपणा, तीच संकुचितता, सारें तेंच अद्यापिहि कायमच आहे !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to मानवजातीची कथा


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
सापळा
गावांतल्या गजाली
झोंबडी पूल
भारताची महान'राज'रत्ने
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
अजरामर कथा
 भवानी तलवारीचे रहस्य
लोकभ्रमाच्या दंतकथा
वाड्याचे रहस्य
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय