व्यक्तिंचा मूर्खपणा सहन करावयाला तो सिध्द होता. पण मानवजातीचा मूर्खपणा पाहून मात्र त्याला तिरस्कार वाटे. तो एके ठिकाणीं लिहितो, 'मानवा, तुझ्या जातीविषयीं तुला काय वाटतें ? मानवजातीची मूर्खता व तिचा टोणपेपणा पाहून तुला लाज नाहीं वाटत ?'

पोकळ मानसन्मानांसाठीं सदैव आपापसांत झगडणारे राजे व सरदार पाहून त्याला गंमत वाटे. त्याचे आश्रयदाते राजवैभवाच्या कलेंत तज्ज्ञ होऊं पाहत होते; पण लिओनार्डो कलेच्या राजवैभवांत—भक्तिप्रेमांत-रंगला होता. त्याला जीवनाचा खरा आनंद सौंदर्यांतच सांपडला. इतर सारे खटाटोप 'मृगजळापाठीमागें लागण्याप्रमाणें फोल' असें तो म्हणे. (Koheleth-प्रमाणें) महत्त्वाकांक्षेंत अर्थ नाहीं. आशा शेवटीं निराशाच निर्मिते. तो लिहितो, ''इच्छापूर्तीपेक्षां इच्छाच अधिक गोड असते.'' कीर्तीसाठीं धडपडत असतां स्वत:ची मान व दुसर्‍याच्या माना मोडून घेणें हें हास्यास्पद होय. ''झाडावर असतांना गोड वाटणारें फळ तोंडांत गेलें म्हणजे कडू लागतें.'' आपल्या शक्तिच्या मर्यादा ओळखण्यास आपण शिकलें पाहिजे. फार मोठ्या ध्येयाची आशा धरणें मूर्खपणाचेंच नव्हे तर धोक्याचेंहि आहे. आपल्या बुध्दीच्या शक्यतेनुसार आपण आपल्या महत्त्वाकांक्षेचें मोजमाप ठेवावें; आपल्या आशा-आकांक्षा त्या पूर्ण करण्याच्या आपल्या शक्तिच्या पलीकडच्या असूं नयेत. ''ज्यांची इच्छा आपण करतों तें प्राप्त होतेंच असें नसल्यामुळें मिळूं शकेल त्याचीच इच्छा आपण करूं या.''

इच्छा गोड असते; पण पूर्ति कडू असते, दु:खदायी असते. ''अशी कोणतीहि निर्दोष देणगी नाहीं कीं जिच्यासाठीं खूप कष्ट पडत नाहींत.'' हालाशिवाय, दु:खाशिवाय देणगीच नाही. लिओनार्डोसारख्या कलावन्ताच्या बाबतींत तर हें अधिकच सत्यार्थानें खरें आहे. कलावन्ताला अधिक निर्मितां येतें, अधिक प्राप्त करून घेतां येतें; कारण, तो दु:खहि खूप सोसतो. ग्रीक कवींची अशी एक मीमांसा होती कीं, ज्ञान दु:खांतून व वेदनांतूनच संभवतें. जीवनाचा गंभीर अर्थ त्यांना समजला होता. म्हणूनच त्यांनीं असा प्रचार मांडला. Pathei Mathos. आपण सोसण्यास तयार असतों म्हणूनच आपण शिकूं शकतों. आपणांस असलेल्या मृत्यूच्या जाणिवेमुळेंच आपण जीवनाचा अर्थ समजूं शकतों.

लिओनार्डोला जीवनाचा खोल अर्थ नीट समजला होता; कारण, तो मृत्यूशीं नीट परिचित होता,  मृत्यूचा अर्थ त्यानें पूर्णपणें ओळखला होता. त्याला वाटे कीं, मृत्यु मोठा फसव्या आहे. कधींहि पूर्ण न होणार्‍या आशांची आमिषें दाखवून फसविणें हेंच मृत्यूचें काम ! जो भविष्यकाळ कधींहि येणार नाहीं त्याची आशा दाखवून मृत्यु फसवीत असतो. तो म्हणतो, ''आपण नेहमीं भविष्याची आशा करीत असतों; पण भविष्य आपल्यासाठीं एकच निश्चित अशी गोष्ट ठेवीत असतें व ती म्हणजे सर्व आशांचें मरण ! आपलें सारें जीवन म्हणजे मरणाची तयारी. मी जगण्यासाठीं शिकत आहें असें मला वाटे; पण तें शिकणें वस्तुत: मरण्यासाठींच होतें.''

पण लिओनार्डो जे जें भोगावें लागे तें तें एकाद्या स्टोइकप्रमाणें शांतीनें व हंसतमुखानें सहन करी. मृत्यूचें शेवटचें बोलावणें आलें तेव्हां तो दमल्याभागलेल्या मुलाप्रमाणें झोंपीं जाण्यास तयार होता. विश्रांतीवर त्याचा हक्क होता. मरणापूर्वी थोडाच वेळ त्यानें आपल्या मित्रास लिहिलें, ''एकादा दिवस चांगल्या कामांत गेला, सार्थकीं लागला, म्हणजे जशी झोंप सुरेख लागते, तद्वत् ज्यानें आपलें जीवन नीट व्यतीत केलें आहे त्याला मरतांना आनंद होता.'' तो वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी वारला. त्याचा मित्र मेल्सी लिहितो, ''त्याचा वियोग प्रत्येकाला दु:सह आहे. त्याच्या मारणामुळे सर्वांना दु:ख होत आहे. असा आणखी एकादा पुरुष निर्माण करणें निसर्गाच्या शक्तिच्या बाहेरचें आहे.'' लिओनार्डोच्याच शब्दांत सांगावयाचें झालें तर, विभूतिमान् पुरुषांविषयीं त्यानें काढलेलेच शब्द आपणास त्यालाहि लावतां येतील : ''तो मानवांत जन्मलेला देवदूत होता.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel