वेट्झलर येथें जरी तो थोडेच दिवस होता, तरी तो तेवढ्या अल्प मुदतींतहि फारच वादळी व उत्कट प्रेमांत सांपडला. पण त्याची प्रेमदेवता लॉट्चेन हिचें आधींच एकाशीं लग्न ठरलेलें होतें. त्यामुळें प्रश्न जरा गुंतागुंतीचा होऊन आत्महत्या करावी असें त्याच्या मनांत येऊं लागलें. पुष्कळ दिवस तो उशाशीं खंजीर घेऊनच झोंपे. तो रोज रात्रीं खंजीर छातींत खुपसण्याचें धैर्य यावें म्हणून खटपट करी; अखेर या दुर्दैवी प्रेमप्रकारावर एक कादंबरी लिहून, स्वत:ला ठार मारून घेण्याऐवजीं—आत्महत्या करण्यांऐवजी—कादंबरींतील नायकालाच आत्महत्या करावयास लावण्याचें त्यानें ठरविलें. 'तरुण वर्थरचीं दु:खें' ही ती भावनोत्कट कादंबरी. हींत अद्भुत मूर्खपणा आहे, उदात्त सौंदर्यहि आहे. जीवनांत कोठेंच नीट न बसणार्‍या दुर्दैवी माणसाची ही आत्मकथा आहे. वर्थर हो आजूबाजूच्या जगांत मुळींच गोडी न वाटणारा, हळुवार हृदयाचा व भावनोत्कट वृत्तीचा कलावंत आहे. वनांत, निसर्गांत व शेतांत त्याला आनंद होतो. तेथील एकांतांत त्याला जणूं सोबती मिळतो ! एकान्त हाच त्याचा मित्र. ही कादंबरी म्हणजे जीवनांतील दु:खाचें शोकगीत आहे. मरणांतील सुखाचें व आनंदाचें हें उपनिषद् अगर स्त्रोत्र आहे. जर्मन बहुजनसमाजावर या पुस्तकाचा अपार परिणाम झाला. वर्थरचा निळा कोट व त्याचें पिवळें जाकीट यांचें अनुकरण सारे जर्मन तरुण करूं लागले आणि लॉट्चेनचा पांढरा पोषाख व पिंक बो यांचें अनुकरण मुली करूं लागल्या. हें पुस्तक जर्मनींत वर्तमानपत्राप्रमाणें रस्त्यारस्त्याच्या कोंपर्‍यावर विकलें जात होतें. तिकडे चीनमध्यें चिनी मातीच्या भांड्यांवर वर्थर व लॉट्चेन हें प्रेमी जोडपें चितारलें गेलें. कांही कांहीं अत्युत्सुक व भावनोत्कट तरुणांनीं तर आत्महत्या-क्लबच स्थाप्न केले ! जीवन समाप्त करण्यासाठीं वर्थर-सोसायट्या सुरू करण्यांत आल्या. युरोपभर आत्महत्येची साथच पसरली ! गटेच्या आलौकिक प्रतिभेचें हें केवढें पूजन ! हा त्याचा केवढा सत्कार !

पण गटेला मात्र आपलें स्वत:चें जीवन समाप्त करण्याची इच्छा आता राहिली नाहीं. आपलें प्रेम, हें पुस्तक व आपली स्तुति करणारे या सार्‍यांना मागें सोडून तो पुढें चालला—नवीन क्षेत्रांत व नवीन साहसकर्मांत तो शिरला.

- ४ -

तो जरी रूढींचा व्देष्टा होता तरी त्याला अधिकार्‍यांविषयीं आदर वाटे. त्याच्या जीवनांत ही वृक्ति खोल मुळें धरून बसलेली होती. तो आपल्या एका मित्रास लिहितो, ''ज्यांच्या हातीं सत्ता आहे, ज्यांचें वर्चस्व आहे, ज्यांचें प्रभुत्व आहे, अशांशीं परिचय करून घेण्याबद्दल मी तुला दोष देणार नाहीं. या जगांत राहणार्‍याला असें करावेंच लागतें. त्यांचा उपयोग कसा करून घ्यावा हें नीट माहीत असणार्‍यानें मोठ्या लोकांशीं, बड्या अधिकार्‍यांशीं खुशाल संबंध ठेवावे.'' जेव्हां राजा कार्ल ऑगस्ट यानें गटेला वायमार येथें आपल्या दरबारीं बोलावलें, तेव्हां तो तें राजशाही आमंत्रण आनंदानें स्वीकारून लगेच तिकडे गेला.

१७७५ सालीं तो वायमार येथें गेला तेव्हां तो फक्त सव्वीस वर्षांचा होता. त्यानें आपलें उर्वरित आयुष्य तेथेंच घालविलें. राजवाड्याजवळच्या उपवनांतील एका भवनांत तो राहूं लागला. काव्य व राजकारण या दोहोंत त्याचा वेळ जाई. तो 'अपॉलो'-काव्यदेवतेचाच नव्हे, तर कार्ल ऑगस्ट याचाहि एकनिष्ठ भक्त व सेवक बनला. राज्य कसें करावें हें जर्मन राजाला शिकविणारा तो कन्फ्यूशियस होता. पण असें केल्यामुळें त्याला आपलें स्वातंत्र्य गमावावलें लागलें. स्वत:ची बंडखोर वृत्ति त्यानें आपल्या पुस्तकांपुरती ठेवली; पण खासगी जीवनांत तो अत्यंत आज्ञाधारक असा दरबारी बनला. राजाविरुध्द तो ब्रहि काढीत नसे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel