१८४८-४९ हें वर्ष युरोपभर क्रान्तीचें साल मानलें जातें. आपलें स्वप्न सत्यसृष्टींत येणार असें मॅझिनीला क्षणभर वाटतें. क्रान्तीची प्रचंड लाट युरोपभर उठली. राजे इटलींतून हद्दपार केले गेले. रोममध्यें रिपब्लिक स्थापलें गेलें. मॅझिनीस हद्दपारींतून परत बोलावण्यांत आलें. नव्या रिपब्लिकचे तीन गव्हर्नर निवडण्यांत आले, त्यांत तोहि एक होता. इटली देश आता खर्‍या अर्थानें स्वतंत्र झाला. सार्‍या जगाला आतां इटली स्वातंत्र्याचा खरा मार्ग दाखवील असें त्याला वाटलें.

पण हें इटॅलियन रिपब्लिक अल्पजीवी ठरलें. पवित्र कराराच्या फौजा इटलीवर चालून आल्या. राजेरजवाड्यांचा जुलूम पुन: सुरू झाला. राजशाही पुन: घोड्यावर स्वार झाली. मॅझिनी पुन: दु:खदायी व उदास एकान्तवासांत गेला. विचारांच्या हुतात्म्यांभोंवतीं शेवटीं उदास एकान्तता असतेच.

मॅझिनीनें आपल्या हद्दपारीचीं बरींच वर्षे इंग्लंडमध्यें काढलीं. इंग्लंडचें सरकारहि मॅझिनीचा पत्रव्यवहार तपासी. पण तेथें त्याला बरेच मित्र मिळाले. बहुजनसमाजांत त्याच्या विचारांना पाठिंबा देणारे बरेच अनुयायी त्याला लाभले. तो युरोप व इंग्लंड याच्यामध्यें सारख्या येरझारा करीत होता. युरोपांतील राजांनीं रिपब्लिकला ठार केलें होतें. पण मॅझिनी त्यांना जणूं रिपब्लिकचें भूतच वाटे. त्यांना मॅझिनीची भीति वाटे. तो आपल्या काळांतील अत्यंत विख्यात पुरुष होता. त्याची कीर्ति सर्वत्र होती व त्याची भीति सुध्दां सर्वांना वाटे. पण कीर्तीविषयीं तो अगदीं बेफिकीर होता. तो नेहमीं आपल्या ध्येयाविषयीं बोले, स्वत:विषयीं कधींहि बोलत नसे. तो आपल्या जर्नलमध्यें लिहितो, ''प्रत्येक मोठ्या युगांत, उगवत्या सूर्यप्रकाशासमोर जशी मेणबत्ती क्षुद्र, त्याप्रमाणें वैयक्तिक चरित्र य:कश्चित् दिसतें.''

लंडनमधील त्याचें निवासस्थान अत्यंत परिचित मित्रांसच माहीत असे. त्याची एक लहान खोली होती, ती पुस्तकांनीं भरलेली असे. तींत तंबाखूचा धूर सदैव भरलेला असे. या खोलींत तो मित्रांना भेटे, पाहुण्यांच्या मुलाखती घेई. खुर्चीवर शांतपणें बसून सारखी सिगर ओढीत तो विचारांत रमे. तो धुक्यांत वा मेघवलयांत आच्छादिलेल्या एकाद्या गंभीर दैवी विभूतीप्रमाणें दिसे. सभोंवतालच्या मर्त्य जनांच्या गोष्टी ऐकणारा, अति दूरच्या व वरच्या प्रदेशांतील उच्च वातावरणांतला तो अतिमानवी मानव वाटे. त्यांच्या संभाषणांत तो नेहमींच भाग घेई असें नाहीं. पण त्याच्या विचारांना पेटविणारा एकादा शब्द जेव्हां कोणी बोले, तेव्हां त्याचे काळेभोर इटॅलियन डोळे लगेच चमकून उठत व त्याची वाग्गंगा सुरू होई. पण वाग्गंगा म्हणण्यापेक्षां त्याच्या शब्दांना रसरशीत निखारे म्हणणेंच अधिक बरें. कारण, त्याचे शब्द ऐकतांच ''श्रोत्यांना व्हेसुव्हियसमधून बाहेर पडणार्‍या लाव्हाच्या तेजाळ प्रवाहांची आठवण होई.'' त्याच्याभोंवतीं नेहमीं पक्षी असत; पिंजर्‍यांत कोंडलेले नव्हेत, तर त्याच्या खोलींत मोकळेपणानें उडणारे-बागडणारे ते पक्षी म्हणजे त्याच्या संपूर्ण तत्त्वज्ञानाचीं जणूं प्रतीकेंच होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to मानवजातीची कथा


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
सापळा
गावांतल्या गजाली
झोंबडी पूल
भारताची महान'राज'रत्ने
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
अजरामर कथा
 भवानी तलवारीचे रहस्य
लोकभ्रमाच्या दंतकथा
वाड्याचे रहस्य
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय