प्रकरण ३ रें
समाजवादाचा जनक कार्ल मार्क्स
- १ -

अठरावें शतक हें बुध्दीच्या महिम्याचें म्हणजे बुध्दिवादाचें शतक होतें, तर एकोणिसावें शतक हें क्रान्तीचें शतक होतें. अगदींच शास्त्रीय दृष्ट्या पाहिल्यास वरील विधानें अक्षरश: खरीं आहेत असें म्हणतां येणार नाहीं. इतिहासाचे असे अगदीं अलग अलग कालखंड पाडून विशिष्ट कालखंडांत विशिष्ट स्थिति होती असें म्हणतां येणार नाहीं. बुध्दियुग व्हॉल्टेअरबरोबर अठराव्या शतकांतच अगर क्रान्तियुग मार्क्सबरोबर एकोणिसाव्या शतकांतच सुरू झालें असें नव्हे. शिवाय, अठरावें शतक केवळ बौध्दिक विचारसरणीचें होतें अगर एकोणिसावें केवळ क्रांतिकारक अशा आकांक्षांचें होतें असेंहि नव्हे. व्हॉल्टेअरच्या काळींहि रूढीचे सनातनी उपासक थोडेथोडके नव्हते. कार्ल मार्क्सच्या काळींहि प्रतिगामी वृत्तीचे लोक भरपूर होते ! इतिहासाचा प्रवाह अखंड चालला आहे. प्रत्येक युग म्हणजे परस्परविरोधी प्रवाहांची संमिश्र धारा होय.

पण हा इतिहासाचा संमिश्र प्रवार आपण सोयीसाठीं मधून मधून मोजून जरा अलग करून पाहतों व त्याचे सारख्या लांबीचे तुकडे करून प्रत्येक शतकाच्या अखेरीस एकेक पूल बांधतों. यामुळें शंभर शंभर वर्षांच्या विस्तारावर आपण नीट नजर टाकूंच् शकतों; एक कटाक्षांत आपणांस सारें शतक पाहून टाकतां येतें--त्याचें स्वरूप समजून घेतां येतें व या विशिष्ट शतकाला--कालखंडाला--बाकीच्या काळापासून अलग करणार्‍या विशिष्ट गोष्टी आपल्या लक्षांत भरतात. अशा दृष्टीनें पाहिल्यास अठराव्या व एकोणिसाव्या शतकांचीं डोळ्यांत भरण्यासारखीं वैशिष्टयें अनुक्रमें बुध्दिवाद व क्रांतिकारकत्व हीं होत. एकोणिसाव्या शतकांतील क्रांति-प्रवाहाचे दोन पोटभाग दिसतात :  मॅझिनीसारख्या भावनाप्रधान क्रांतिकारकाचा एक व कार्ल मार्क्स यांच्यासारख्या शास्त्रीय क्रांति-वाद्यांचा दुसरा. मॅझिनी व कार्ल मार्क्स दोघेहि जगाला (मानवाना) मुक्त करूं पाहत होते. पण दोघांना यासाठीं प्रवृत्त करणारीं कारणें मात्र भिन्नभिन्न होतीं. मॅझिनीला मानवजात मुक्त झालीच पाहिजे असें वाटे, तर कार्ल मार्क्स याला मानवजात मुक्त होणारच अशी ज्ञानजन्य खात्री वाटत असे. मानवजातीचें अन्तिम सुख ही मॅझिनीची उदार भावना होती, सर्वांनीं सुखी झालेंच पाहिजे असें त्याला वाटे; पण कार्ल मार्क्सला ती शास्त्रीय सत्यता वाटे. कारण, कार्ल मार्क्स हा आधीं शास्त्रज्ञ व मग क्रांतिकारक होता. त्यानें सर्व इतिहासाची प्रयोगशाळा करून काळजीपूर्वक संशोधन केलें. त्याचें मन पृथक्करणशील होतें. सार्‍या मानवजातीला त्यानें जणूं आपल्या टेस्ट-ट्यूबमध्यें घातलें ! सरंजामशाहींतून भांडवलशाही कशी उदयास आली व भांडवलशाहींतून समाजवाद उदयास येणें कसें अपरिहार्य आहे हें त्यानें एकाद्या शास्त्रज्ञाप्रमाणें पध्दतशीरपणें दाखविलें आहे. एकादा भौतिक शास्त्रज्ञ प्रकाश, विद्युत् वा उष्णता यांवर प्रयोग करून त्यांतील सर्व गोष्टी क्रमश: मांडतो, त्याप्रमाणें मार्क्स यानें केलें. अर्थशास्त्रहि सृष्टिशास्त्र व रसायनशास्त्र यांच्याइतकेंच बिनचूक शास्त्र- Exact Science  आहे असें त्यानें दाखविलें. भांडवलशाहींतून सहकारी समाजवाद निघणें हें बीजांतून फुलें फुलण्याइतकेंच स्वाभाविक व नैसर्गिक आहे असें त्यानें प्रतिपादिलें. आणि आश्चर्य हें कीं, समाजसत्तावाद शास्त्रीय आहे असें त्यानें दाखविलें मात्र, लगेच त्याचा धर्म झाला. जगांतील कामगारांना कार्ल मार्क्स याचा 'कॅपिटल' हा भौतिक ग्रंथ बायबलइतकाच पवित्र वाटूं लागला. या ग्रंथामुळें एक नवीनच युग निर्माण झालें असें कामगारांना वाटलें. मार्क्सचें तत्त्वज्ञान मानणारे सर्व जण ऐतिहासिक काळाचे मार्क्सपूर्व व मार्क्सोत्तर असे दोन विभाग करतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel