पोलीस : येथे सोन्यामारुति नाही. तो पुण्याला आहे. तेथें भांडा.
पुजारी : गांवोगांव सोन्यामारुतीप्रकरणें आहेत. जेथे जेथे हिंदु-मुसलमान आहेत तेथे तेथे सोन्यामारुति उभा असणारच !
वेदपुरुष : दुसर्या अर्थाने हे किती खरे आहे! हिंदु-मुसलमान, बुध्द-ख्रिस्त सर्व समाजांत पददलित-सोन्यामारुती आहेत. त्याच्यासमोर अन्यायाची घंटा कोण वाजवणार ? सोन्यासारखीं जीवनें कुसकरलीं जात आहे म्हणून कोण नगारे वाजविणार !
वसंता : हे निष्पाप बालक घ्यावयास कोणीही तयार नाही का होत ? हिंदु धर्म मेला, बुडाला !
वेदपुरुष : ते पहा प्रभु रामचंद्राने सारे धर्म जवळ घेऊन त्यांचे वजनमाप चालविलें आह .
पोलीस : आहे कोणी तयार ?
पुजारी : येथे कोणी नाही. ही घाण येथून घेऊन जा. मंदिर भ्रष्ट झालें मंत्र म्हणून पवित्र केले पाहिजे. आज रात्री सारखा वेदघोष येथे झाला पाहिजे.
एकजण : आतांच सुरू करा .
पोलीस : घेऊन जाऊं हें मूल ? उचलूं देवाच्या पायावरचें हे फूल ?
वसंता : गर्दीतून कोण येत आहे तें ?
वेदपुरुष : तो मिशनरी आहे. हे निर्माल्य तो जवळ घेईल.
वसंता : हिंदुमध्ये कोणी नाहीं का !
मिशनरी : मी हें मूल घ्यायला तयार आहे. जर कोणी हिंदु घ्यावयास तयार नसेल तर माझे मिशन तयार आहे. येशू सर्वाना जवळ घेतो.
मौलवी : रामांच्या पायांजवळचें हे मूल घ्यावयास मशिदींतील रहीम तयार आहे. पैगंबर सर्वाना पोटाशीं घेतील.
पोलीस : कोणी हिंदु आहे तयार ?