ते काही असो. पद्मा नदीच्या विशाल व विस्तीर्ण तीरांवर रात्रीच्या रात्री भटकण्यांत मला मौज वाटत असे. काळोखांत जमीन व पाणी एकरुपच कशी दिसतात, अगदी सरळ रस्ते घोटाळ्याचे कसे वाटतात व आपण कसे चुकतो यांचा मला त्यावेळी अनुभव येत असे. आणि उजाडतांच आपण असे कसे रात्री गोंधळली याचे आश्चर्य वाटे. आपल्या राष्ट्रास हाच अनुभव येईल. सरळ साधा रस्ताहि आज अंधारात घोटाळ्याचा वाटत आहे. परन्तु आपल्या राष्ट्राची भाग्यप्रभा येताच आपणांस खरा पंथ दिसेल आणि चुकलेली पावले आपण सुधारू. या आशेने मी जगत आहे. शिवाय आपण सारेच अंधारात आहोत असे नाही. कितीतरी उत्साही व त्यागी तरूण माझ्या परिचयाचे आहेत. देशदेवाच्या सेवेत शब्दांपेक्षा काही तरी अधिक देण्यास ते तयार आहेत. परन्तु काय करावयाचे ते त्यांना समजत नाही. दिशा कोण दाखवील, कामासंबंधीचा सल्ला कोणाला विचारावा हे त्याना कळत नाही. सेवा कोणती करावयाची, कोणाची करावयाची, हे दाखवणारा मार्गदर्शक गुरु त्यांना भेटत नाही. कोणती तरी पद्धती डोळ्यासमोर असल्याशिवाय, काही संघटना असल्याशिवाय, स्वतः एकाकी कसे तरी धडपडत राहणे यांत अनाठायी श्रम होतो, अनाठायी त्याग होतो.

फुकट जाणारा त्याग काय कामाचा ? त्याग ही एक पवित्र वस्तु आहे. त्याग कसा तरी कच-याप्रमाणे फेकून द्यायचा नाही. त्यागांतून काही तरी निर्माण झाले पाहिजे. त्याग कोणत्यातरी कर्माच्याद्वारा अंकुरित झाला पाहिजे. अशावेळेस मध्यवर्ती आश्रमासारख्या संस्थेची अत्यंत आवश्यकता असते. त्या मध्यवर्ती शक्तिभोवती सर्वांचे एकीकरण झाले पाहिजे. तेथे विचारवंत विचार देतील, श्रम करमारे श्रम करतील, उदारांच्या देणग्या तेथे येतील. शिक्षण, वाङमय, कला, उद्योगधंदे- आपल्या कल्याणाची सारी कार्ये त्या मुख्य केन्द्राभोवती उभी राहतील. आणि जे रामराज्य निर्माण करण्यासाठी देशभक्त झटत आहेत, ते सर्वांचे समृद्ध असे रामराज्य निर्माण होण्यास त्या केंद्रातून मदत होईल.

परकीयांकडून परमेश्वर आपणांस तडाके देववीत आहे. त्यांत परमेश्वराचा हेतु आहे. कोठेतरी शक्तिस्थान निर्माण व्हावे असा त्यांत निःसंशय हेतु आहे. त्या शक्तिकेंद्राकडे आपली तोंडे वळावी, त्या तेजाकडे आपले पाय वळावे, यासाठी आपले सारे अर्ज फेटाळण्यांत येत आहेत. अशा प्रकारचे शक्तिकेंद्र उत्पन्न व्हावे अशी उत्कंठा सर्वांना वाटत आहे. आपण निराशेने सरकारवर टीका करून राहिलो आहोत. परन्तु या निराशेतूनच आपले शक्तिकेंद्र निर्माण होणार आहे. अंधार उषेला जन्म देतो. त्याप्रमाणे ही निराशा आशेच्या उषेला, स्वावलंबनाच्या सूर्याला जन्म देईल, अशी मला श्रद्धा आहे. निराशेचा मी तरी हाच अर्थ करितो.

आपणांला जर असे केन्द्र स्थापता आले तर मग आपण आपले सारे विचार, सा-या योजना त्या केन्द्रांतील मंडळीसमोर मांडू. आपल्या विचारांना तेथे काही तरी स्थिर अर्थ प्राप्त होईल. वा-याप्रमाणे भटकणा-या विचारांस स्थिरता आली म्हणजे कार्यास सुरुवात होईल. या शक्तिकेन्द्रासाठी आपण आपले सर्वस्व देऊ. आपला उत्साह तेथे ओतू, आपले आयुष्य तेथे वेचू. आपल्या बुद्धीला तेथे पूर्ण वाव मिळेल. घोटाळे दूर होऊन मार्गदर्शन घडेल. त्यागाची शक्ति जागृत होईल. आपल्यांतील सर्व थोर व उदात्त भावना उचंबळून येतील. ज्याच्यासाठी जगावे व ज्याच्यासाठी मरावे असे काही तरी डोळ्यांसमोर असले पाहिजे. असे ध्येय डोळ्यांसमोर दिसले की तरूण लोक जीवने द्यावयास पुढे येतील. कार्याची दिशा दाखवणारे असे केन्द्र निर्माण होऊ द्या.

असे केन्द्र निर्माण झाले म्हणजे त्याचेद्वारा शिक्षण, कला, व्यापार, उद्योगधंदे, सर्वांची प्रभा फाकू लागेल. संसारातील विविध अंगांना झपाट्याने चालना मिळेल. आपण उठल्याबसल्या मग वक्त्याच्या पाठोपाठ धावणार नाही. सरकारने जरा कोठे अन्याय केला की निषेधाची सभा घ्यायची, तेथे कोणा वक्त्याला आणून उभे करायचे, ठराव करायचे, दुःखाला वाचा फोडायची, अशा गोष्टींची मग जरूर राहणार नाही. ही क्षणिक जागृतीची चिन्हे असतात. मधून मधून आरडा ओरड करायचा व फिरुन मेल्याप्रमाणे पडायचे या गोष्टी आता हास्यास्पद होऊ लागल्या आहेत. असले फार्स बंद करायचे असतील तर आपल्या राष्ट्राच्या सा-या प्रगतीचा कार्यभार आपण आपल्या शिरावर घेतला पाहिजे. जगावर रुसून आपणांस एकटे बाजूला बसावयाचे आहे असा याचा अर्थ नाही. प्रेमाच्या भांडणात रुसणे फुगणे आहे. राष्ट्राच्या कार्यात त्यला स्थान नाही. रुसून बसण्याच्या उलट माझे सांगणे आहे. सरकारजवळ नीट सभ्यतेचे, सरकारचे रूप ओळखून, संबंध ठेवावे, मोकळेपणाने संबंध ठेवण्यांत स्वातंत्र्य आहे. जो संबंध आपणांवर लादला जातो, तो गुलामगिरीचा भाग असतो. कृत्रिम माराकुटीचे संबंध टिकत नाहीत. परन्तु एकमेकांचे स्वरुप ओळखून मोकळेपणाने ठेवलेले संबंध पुढे मैत्रीचे व प्रेमाचे होऊ शकतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel