जमीनदार खेड्यांत न रहाता दूर शहरांत रहातात. खेड्यांवर श्रीमंत होणारे हे लोक शहरांत राहून थोडीफार दया कदाचित् तेथून दाखवतील. परन्तु त्याने खरा कार्यभाग होणार नाही. त्या त्या गावच्या जमीनदारांनी त्या त्या गावातच राहिले पाहिजे. एका खेड्यांतील माझा अनुभव सांगतो. एका खेड्यांतील कोळ्यांना पोलिसांनी फार त्रास दिला. मी कोळ्यांना सांगितले “कलकत्याचा चांगलासा वकील तुमच्यासाठी देतो. तुम्ही हक्कासाठी भांडा.” परन्तु त्या कोळ्यांचा पुढारी म्हणाला “महाराज, आम्ही हा खटला समजा जिंकला तरी काय ? पोलिसांची व आमची रोजची गाठ आहे. ते दुसरी कुरापत काढतील व आणखी अधिकच सतावतील, उट्टे काढतील.” मी मनांत विचार केला व म्हटले “खरे आहे. दुबळ्या लोकांना हक्क मिळणे-प्रबळांहून त्यांना अधिक हक्क मिळणे- म्हणजे तर फारच मोठी आपत्ति आहे !” रोगी फारच दुबळा असेल तर शस्त्रक्रिया नीट पार पडूनहि रोगी शेवटी दगावायचाच !

एकदा एक कोंकरू ब्रह्मदेवाकडे गेले व म्हणाले “प्रभो, मी काय करू ? सारे मला खातात. असे का बरे ?” ब्रह्मा म्हणाला “मी काय करू ? तुला पाहून खाऊन टाकावे असा मलाहि मोह होत आहे.” दुबळ्या व नालायक लोकांस न्याय मिळवून देणे देवांनाहि दुष्कर होते. मग सरकार व पार्लमेंट आपणांस न्याय देतील अशी आशा करण्यांत काय अर्थ ? आपण जसे दीन दुबळे आहोत, तसेच जगाच्या अंतापर्यंत आपण रहावे, असेच सरकारचे धोरण दिसून येत नाही का ? पोलिस अपराधी आहेत, अशा साक्षी जे पोलिसकमिशनपुढे देतात तेच “पोलिसांच्या हातांतील सत्ता कमी करावी, विषारी दात पाडावे” असे बिल आले तर त्या विरुद्ध आरडाओरडा करतात ! कोकरू जर जरा बलवान झाले तर पुढे त्याला मटकावतांना ते तितके सुसलुशित लागणार नाही, जरा टणक लागेल अशी त्यांना भीति वाटते. “देवा दुर्बलघातकः” हे चिरंतन, सनातन सत्य आहे.

आणि शेवटी हे देशभक्तीने उचंबळणा-या तरुणांनो ! सर्व हालअपेष्टांस मिठी मारून देशासाठी भरावयास सिद्ध असणा-या नव जवानांनो ! आपल्या मातेचे मंगल आशिर्वाद तुम्ही माझ्या हातून स्वीकारा. आपल्या समोर जे प्रचण्ड कार्य आहे, ते सर्व संकटानिशी आपल्या शिरावर घेण्याकरिता तुम्ही पुढे येत आहात. खरोखर केवढी ही आनंदाची व सौभाग्याची गोष्ट. जीवनाची जळती उगवती प्रभा म्हणजे तुम्ही. तुम्ही अरुणोदय करित आहांत, प्रकाशकिरणांचे दूत आहांत. तुमच्यातील पौरूष जागृत होत आहे. या पौरुषाचे आगमन दणदणाटानेच गडगडाटानेच घोषित केले जात आहे असे नाही. तर या तृषीत व तप्त भूमीवर जे प्रेमामृताचे मेघ तुम्ही भरभरून आणीत आहात, जी सेवेची स्नेहमयी वृष्टी करीत आहांत, तद्द्वाराहि पौरुषच प्रकट होत आहे. तुमचे पौरुष पराक्रमी आहे व प्रेमळ आहे. ते अन्यायाशी झुंजेल व सेवेत रंगेल. वज्राहून कठोर व फुलाहून कोमल असे तुमचे शौर्यधैर्य आहे. लोक पायाखाली तुडवले जात होते. जनतेचा सर्वत्र धिक्कार केला जात होता. कितीहि अपमान झाले तरी ते मुकाट्याने गिळण्याची त्यांना सवयच जडली होती. मानवजातीच्या हक्कांची त्यांना विस्मृती पडली होती. अशा सर्वांकडून उपहासालेल्या, आपल्या परित्यक्त दुबळ्या भोळ्या भाबड्या लोकांना, आजच्या या प्रेममय सेवामय व संरक्षण देणा-या वातावरणांत “बंधु” या शब्दाचा खरा अर्थ कळू लागला आहे आजपर्यंत ते बिचारे हा शब्द ऐकत होते. त्या शब्दांतील भावनेचा ऊबदार अनुभव त्यांना कोणी दिला नव्हता.

हिंदुस्थानातील दुःखी लेकराचे दुःख का एकाच प्रांतांत आहे ? नाही नाही. दुःखाता वणवा आमतौर सर्वत्र पेटला आहे. सारे दुःखाच्या नरकांत पिचत आहेत. सारे आकाशच फाटले आहे. या आकाशात कोठवर ठिगळे जोडणार ? दुःख-हे विराट् अनन्त दुःख दूर करावयास तुमचे प्रयत्न पुरे प़डणार नाहीत. सर्व दुःखी बंधूंचा सांभाळ तुमच्याकडून होणार नाही. म्हणून तुम्ही सर्व बांधवांना स्वतः समर्थ व्हावयास शिकवा, स्वसंरक्षण करून घेण्यास लायक बनवा. त्यांचे दुःख दूर व्हावयास हाच मार्ग आहे.

तरुण मित्रांनो, कोणत्या तरी एखाद्या खेडेगावांत जा. ते खेडे स्वतःचे माना. तेथे घरदार करा. तेथेच रहा. संघटना करा, सेवा करा. स्वावलंबन व सहकार्य यांचे तेथील जनतेस धडे द्या. सहकार्याच्या जोरावर दुःस्थिति कशी दूर करता येईल ते त्यांना दाखवा, समजवून द्या. ह्या तुमच्या कामामुळे तुम्हांस मान सन्मान कीर्ति मिळेल अशी अपेक्षा राखू नका. ज्यांच्यासाठी तुम्ही झटणार, खटपट करणार, त्यांच्यापासूनहि कृतज्ञतेची अपेक्षा करु नका, सहानुभूतीची आशा राखू नका. तेहि आपणांस विरोध करतील, नावे ठेवतील, शिव्याशाप देतील. परन्तु हे सारे लक्षात ठेवूनच कामाला लागा. ह्या परिस्थितीस तोंड देण्यास तयार असले पाहिजे. मरणोन्मुख मनुष्य वातांत असतो व स्वतःच्या मित्रास ढकलतो. त्या अपमानाने चिडून तो मित्र का त्या आजा-याला सोडून जातो ? नाही. उलट जास्तच कळकळीने व प्रेमाने त्याच्याजवळ बसतो व म्हणतो “त्याच्याजवळून उठता कामा नये. या वेळेसच याच्याजवळ बसण्याची अधिक जरूरी आहे.” आपण हीच गोष्ट हृदयांत धरून काम केले पाहिजे. आजुबाजुला अपरंपार दुःख पसरलेले आहे म्हणून भांबावून जाऊ नका. ह्या अपार दुःखातील अत्यन्त अल्प दुःख दूर करण्याचे स्वतःच्या शिरावर घ्या. तुम्हाला मग परमेश्वर मार्ग दाखवल्याशिवाय राहणार नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel