प्रत्येक क्षणाला आपण नवजन्म घेतला पाहिजे. आपणास वुध्द करणारी सारी बंधने आपण तोडली पाहिजेत. जीवन म्हणजे अमर यौवन. जीवनाला वार्धक्याचा तिटकारा आहे. वार्धक्य जीवनाचे नाहीच मुळी, ते छायामय आहे.

नदी दुथडी आपटते, परंतु त्या तीरांनी तिची गती कुंठित न होता ती जोराने पुढे जाते. प्रत्येक क्षणी मोठी होत ती समुद्राला जाऊन मिळते. कविता छंदाच्या बंधनांनी बध्द न होता पुढेच जात असते. एका बाजूने आपल्या व्यक्तित्वाच्या भिंती आपणास मर्यादा घालतात, तर दुसर्‍या बाजूने त्या अनंताकडे नेतात. ज्या वेळेस ही बंधनेच आपण केवळ सत्य म्हणून मानतो तेव्हा घोटाळतो; दुःख, निराशा पदरी बांधतो.

जेव्हा आपण स्वतःचा सवता सुभा करू इच्छितो, पूर्णाला झुगारून आपल्या लहानशा जीवनालाच पूर्ण मानून स्वार्थी बनतो, तेव्हा जगात अशान्ती, बंडे, कत्तली दिसतात. परंतु अहंकारी व्यक्ती स्वतःसाठी म्हणून जगाचा प्रवाह अडवायला जरी उभी राहिली तरी अनंत शक्ती प्रसवणार्‍या ऐक्याविरुध्द त्याला बंड करता येणार नाही. जर तो मूर्खपणाने सर्वांच्या एकजुटीविरुध्द वागेल तर जमीनदोस्त होईल. म्हणून म्हटले आहे -

“अधमेंर्णैधते तावत् ततो भद्राणि पश्यति ।
ततः सपत्नान्जयति, समूलस्तु विनश्यति ॥”

“अधर्माने भरभराट होते, हवे ते मिळते, शक्तीवर विजय मिळतो परंतु अखेर सर्वनाश होतो.” जर आपणास आपले व्यक्तित्व महान् करायचे असेल, तर विश्वात्मतेत व्यक्तिमत्त्वाची मूळे खोल जायला हवीत.

विश्वात्म्याशी एक होणे हेच जीवाचे ध्येय. प्रेमाने व नम्रतेने शिर नमवून जेथे मोठे आणि छोटे मिळते तेथे आपण आपले स्थान घेतले पाहिजे. त्यागाने मिळवयाचे आहे. लवून उभे राहायचे आहे. मूल आईकडे न जाईल तर त्याचे खेळ त्याला भयप्रद वाटतील. जर आपण आपले व्यक्तित्व प्रेमाने त्याला अर्पण न करू तर या व्यक्तित्वाचा अभिमान म्हणजे शापरूप होईल. सदैव सुंदर व सदैन नवीन असे जे अनंत तत्त्व ते आपणामधून प्रकट होण्यातच आपल्या जीवनदाची पूर्णता; यातच आपल्या जीवनाला अर्थ.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel