“त्याचे मला नीट ज्ञान झाले आहे, असे मला वाटत नाही. मी त्याला जाणले की जाणले नाही, हेही मला कळत नाही.” केवळ पांडित्याने तो अनन्त परमात्मा समजून घेता येणार नाही. परंतु तो दुष्प्राप्यच असेल तर त्याचा व आपला संबंध तरी काय? खरी गोष्ट अशी आहे की, त्याचे ज्ञान जरी आपणास झाले नाही तरीही आपण त्याला ओळखतो. दुसर्‍याच एका औपनिषदिक वाक्यात हेच तत्त्व सांगितलेले आहे -

“यतो वाचो निवर्तन्ते
अप्राप्य मनसा सह ।
आनन्दं ब्रह्मणो विद्वान्
न विभेति कदाचन ॥”

“शब्द, वाणी, मन सारी त्याच्यापासून मागे मुरडतात. त्याचा आनन्द जो जाणतो तो निर्भय होतो.” बौध्दिक ज्ञान मर्यादित आहे. बुध्दी त्याच वस्तूंचे ज्ञान करून देईल-ज्याचे पृथ्थकरण करता येते. परंतु ब्रह्म पूर्ण आहे. अपूर्ण ज्ञानाने त्या पूर्णाचे ज्ञान होणार नाही मर्यादित ज्ञानाने अमर्याद वस्तूचे स्वरूप कसे कळणार? परंतु त्या अमर्याद तत्त्वाला, त्या अनन्ताला प्रेमाने नि आनंदाने जाणता येईल. आनन्द हेही एक ज्ञानाचे रूप आहे. परंतु या ज्ञानात पूर्णता असते. आनन्द सर्व जीवनाने अनुभवायचा असतो. ज्ञानगम्य वस्तूपासून बुध्दी आपणास अलग राखते. परंतु प्रेम ज्ञेय वस्तूशी एकरूप होऊन ज्ञान करून घेते. जे ज्ञान आनन्द नि प्रेम यांच्यामुळे होते, ते निःसंशय असते, व तत्क्षणी मिळते. ते जणू स्वतःसच अधिक समजून घेणे असते. अलगपणा उरतच नाही. म्हणून उपनिषद म्हणते, “मनाने, वाणीने, बुध्दीने ब्रह्माला जाणता येणार नाही. त्याला प्रेमाने नि भक्तीनेच आकळता येतील. त्याच्याशी येणारा आपला संबंध ऐक्यरूपच असू शकेल. पित्याशी समरस होणे, मिळून जाणे - त्याच्याप्रमाणे अव्यंग नि पूर्ण होणे.”

परंतु हे कसे व्हायचे? ती जी अनन्त परिपूर्णता, तेथे पायर्‍या नाहीत. ब्रह्मात अधिक अधिक वाढत जाणे ही गोष्ट येथे नाही. ब्रह्म परिपूर्ण आहे. परमात्म्याचा आपल्या अंतरात्म्यात साक्षात्कार होणे म्हणजे संपूर्ण पूर्णतेची स्थिती. आपल्या मर्यादित शक्तीने हळूहळू ती स्थिती येईल असे म्हणता येणार नाही. ईश्वराजवळचा आपला संबंध जर स्वतःच्या श्रमाने साध्य करून घ्यावयाचा असेल, तर तो संबंध सत्यमय असेल याची तर काय कसोटी? आपणच निर्माण केलेल्या आधारावर आपणच कसे विसंबायचे?

खरी गोष्ट अशी की, ते दिक्कालातीत तत्त्व आपणात आहे याची आपणास जाणीव हवी. उत्क्रान्तीचे सारे दुवे जेथे मिळतात असे तत्त्व आपणात आहे. आत्म्याजवळ परमात्म्याचे ऐक्य आधीचेच आहे. उपनिषद सांगते -

सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म
यो वेद निहित गुहायां परमे व्योमन् ।
सोऽश्नुते सर्वान् कामान् सह
ब्रह्मणा विपश्चित ॥

“आपल्या अंतरंगात खोल गुहेत, त्या हृदयाकाशात लपून बसलेले ते ज्ञानरूप, सत्यरूप अनन्त ब्रह्म जो जाणतो, त्याचे व ब्रह्माचे ऐक्य होते. ब्रह्मासह सर्व वस्तूंचा तो उपभोग घेतो.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel