‘माझ्याच हाताने मी देईन.’ तो म्हणाला.
त्याने मधुरीला तीन खारका दिल्या, मंगाला दोन दिल्या स्वत:ला तीन घेतल्या.
‘मंगाला दोनचशा?’ तिने विचारिले.
‘आठच होत्या. कोणाला तरी एक कमी येणार.’ बुधा म्हणाला.

‘येताना नऊ का आणल्या नाहीस?’ मंगाने विचारले.
‘माझ्या नाही आले ध्यानात.’ बुधाने उत्तर दिले.
‘मी वाटल्या असत्या तर तुम्हाला तीन तीन देऊन मी दोनच घेतल्या असत्या. वाटणाराने स्वत: कमी घ्यावे.’ मधुरी म्हणाली.
‘वाटण्याचा आनंद वाटणा-याला असतोच.’ मंगा म्हणाला.
‘तुम्ही दोघे नेहमी माझ्याविरुध्द असता.’ बुधा म्हणाला.

‘असे नाही हो बुधा, त्या दिवशी मंगाने तुला पाडले तर मी नव्हती का तुझी बाजू घेतली? मी तुम्हा दोघांना सारखे देईन.’ मधुरी म्हणाली.
‘मला खारीक नकोच मुळी. मी गरीब म्हणून मला बुधाने एक खारीक कमी दिली.’ मंगा म्हणाला.
‘आणि मी वाटतं श्रीमंत आहे?’ मधुरीने विचारले.
‘परंतु तू मुलगी आहेस.’ मंगा म्हणाला.
‘मंगा, श्रीमंत नि गरीब रे काय? माझ्या नाही असे कधी मनात येत.’ बुधा म्हणाला.

‘नाही कसे येत? त्या दिवशी तू रस्त्यातून चालला होतास. मी हाका मारल्या. तू मागे वळून पाहिले नाहीस. एकदा तुझ्या घरी मी आलो होतो. परंतु तुझ्या नोकरांनी मला घालवून दिले.’ मंगा म्हणाला.

‘तुझ्या हाका मला ऐकू आल्या नाहीत. नोकरांनी तुला घालविलेले मला काय माहीत?’ बुधा म्हणाला.
‘श्रीमंतांना ऐकायला कमी येते.’ मंगा म्हणाला.
‘असे भांडू नका रे. मंगा, घे या खारका. मधुरी म्हणाली.
‘आणि तुम्ही नाही वाटते हट्ट?’ त्याने विचारले.

‘आमचा हट्ट थोडा वेळ असतो. मंगा, माझी खारीक घे. नाही तर उद्यापासून मी खेळायला येणार नाही तुझ्याजवळ बोलणार नाही.’ मधुरी म्हणाली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel