‘मी दोघांची लहानशी बायको. म्हणजे हे भांडणार नाहीत.’ मधुरी म्हणाली.
‘लटापटीच्या खेळात सारे चालते. मुले आहात अजून.’ म्हातारी म्हणाली.
‘मधुरी पाया पड आजीबाईच्या.’ मंगा म्हणाला.

मधुरी म्हातारीच्या पाया पडली. म्हातारीने तिला कुरवाळले, पोटाशी धरले.
‘आजी, तू दोघांची छोटी राणी हो असा मधुरीला आशीर्वाद दे ना.’ बुधा म्हणाला.
‘असे कसे म्हणू?’ म्हातारी म्हणाली.

‘लटोपटीच्या खेळात सारे चालते. तू नाही का आमच्या खेळात सामील?’ तू सुध्दा आमच्या खेळातीलच जणू. म्हण ना ग आजी, नाही तर आम्ही तुझ्याकडे येणार नाही.’ मंगा म्हणाला.
‘मधुरी, दोघांची छोटी राणी हो, छोटी नवरी हो.’ म्हातारी हसून म्हणाली.

‘आजी, आता नवरावरीचे तोंड गोड कर ना.’ मंगा म्हणाला.
‘अरे लबाडा!’ म्हातारी म्हणाली.
म्हातारीने त्यांना केळी व गूळ दिला. मुलांना आनंद झाला. लग्नाची मेजवानी झाली.

‘आजी, मेजवानी झाली लग्नाची.’ बुधा म्हणाला.
‘परंतु वाजंत्री कोठे आहेत?’ मंगा म्हणाला.
‘समुद्राच्या लाटांची वाजंत्री.’ म्हातारी म्हणाली.
‘खरेच की.’ मधुरी हसून म्हणाली.

तिघे घरी जायला निघाली. हसत खेळत जात होती. आधी बुधाच्या घराजवळ ती आज सारी आली. ‘मधुरी, तू माझीही आहेस हो.’ बुधा हळूच म्हणाला.
‘मी दोघांची, जा आता.’ मधुरी म्हणाली.
आता मंगाचे घर आले.

‘मधुरी, तू माझी आहेस. आधी माझा हक्क. होय ना!’ मंगाने विचारले.
‘होय, पण मी दोघांची छोटी राणी. भांडू नका.’ मधुरी म्हणाली.

मधुरी घरी आली. जेवून ती झोपी गेली. त्या माळा तिच्याजवळ होत्या. ती माळा पहात होती. ती स्वप्नात दोघांना सांगत होती, भांडू नका. मंगा, बुधा, मी तुमची दोघांची चिमुकली नवरी, दोघांची छोटी राणी.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel