‘हे काय मधुरी, तिन्हीसांजा का रडवायचे! उगी हो मनू उगी. ये तू माझ्याजवळ. मधुरी, मी गेल्यावर मुलांना कधी रागे भरू नकोस. पाच बोटांची थप्पड लावू नकोस. रडवू नकोस, समजलीस ना! त्यांना मारलेले मला लागते.’

‘हो, तुला लागते. काय बोलतोस! बरे जाऊ दे. चला आता घरी. ये मने.’
‘मी नाही येत जा.’ ती चिमुरडी म्हणाली.

आणि मंगाने तिला उराशी अधिकच घट्ट धरिले. सर्व मंडळी घरी आली. दिवे लागले. झोपाळयावर मुलांसह मंगा बसला होता. गाणे म्हणत होता. तो आनंदी होता, का गाण्यामुळे मनातील भावना लपवीत होता? त्याचे गाणे भरलेल्या मनाचे निदर्शन होते ही गोष्ट खरी, आणि आतून मधुरी गाणे म्हणू लागली. मंगा गप्प राहिला.

डोळ्यांमध्ये फिरून येते राधा जळ
युगापरी एकेक मला वाटेल गड्या, पळ।।
मला वाटे हुरहुर
नको गड्या, जाऊ दूर
हृदयाला माझ्या लागे वेदनांची कळ।।
करपून जातो माझा जीव
कर सख्या माझी कीव
कोमेजती सारी गात्रे लागे त्यांना झळ।।
नको करू बघ हट्ट
धरून ठेविन तुला घट्ट
प्रेमाचे रे माझ्या आहे अपरंपार बळ।।

मधुरीचे गाणे थांबले. कापणा-या आवाजात तिने ते म्हटले होते. मंगा व मधुरी बाहेर झोपाळ्यावर बसली होती. आता गाणे नव्हते, काही नव्हते.
‘मंगा!’
‘काय मधुरी! बोल सारे.’

नजाणार एकंदरीत तू उद्या. तू उद्या गेलास म्हणजे कसे रे होणार माझे? मी रडेन, रडेन. सारखी तुझी आठवण येईल. माझ्या रोमरोमांत तू गुलामा भरला आहेस.’

‘मधुरी, मी लवकर परत येईन हो. जप सा-या पिलांना. बाळंतपणात काळजी घे. आजीबाईला मी सांगितलेच आहे.’
‘तू नको काळजी करूस.’

‘तू जीवाला लावून नको घेऊस.’
पुन्हा दोघे थांबली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel