''सार्या शाळेत वार्ता पसरली आहे.'' मुले एकदम म्हणाली.
''होय, मी जाणार आहे. आजचा शेवटचा दिवस.''
''तुम्ही गेल्यावर आम्हाला...?''
''देवाची आज्ञा होताच हजारो धावत येतील. कोणासही अहंकार नको. कोणासही निराशा नको.''
''आमचे देव तुम्ही होतात. दुसरा देव आम्हाला माहीत नाही. तुम्ही शाळेतून जाणार असलात तरी या गावी राहा. रामपूर सोडून जाऊ नका. नाही तर सोनखेडीस राहा. सुटीच्या दिवशी आम्ही येत जाऊ.''
''आता कधी भेटाल तर खादी घालून भेटा. तुम्ही सारे खादीधारी असता तर मला आज जावे लागले नसते !'' मुकुंदराव म्हणाले.
''आम्हाला शेवटचे दोन शब्द सांगा.'' शांता म्हणाली.
''इतके दिवस थोडं का सांगितलं?'' ते म्हणाले.
''परंतु विवक्षित वेळचे शब्द माणूस विसरत नाही. आईबापांचे शेकडो उपदेश आपण विसरतो. परंतु मरणकाळचे शब्द जीवनात अमर असतात.'' गंभीर म्हणाला.
''मी काही मरत नाही.'' मुकुंदराव हसून म्हणाले.
''एक प्रकारे या शाळेच्या बाबतीत तुम्ही आता नसल्यासारखेच. शाळेतील तुमचा आज अंत. अंतकाळी उपदेश करा.'' शांता म्हणाली.
''विचारानं वागा, विचाराप्रमाणे वागण्याचं धैर्य दाखवा. नेभळेपणा नको. त्याप्रमाणेच जाती व धर्म यांच्या नावे द्वेष फैलावू नका. जो जो गरीब असेल, जो जो छळला जाणारा असेल, तो आपला माना. छळणारा जो जो असेल तो परका माना. हिंदू , मुसलमान, गोरे, काळे असे भेद खरे नाहीत. खरे भेद प्राचीन काळापासून दोनच सांगितलेले आहेत. दुसर्याच्या संसाराची धूळधाण करणारे व ही धूळधाण बंद करण्यासाठी खटपट करणारे. असा हा अनंतकाळापासून झगडा आहे. तुम्ही न्यायाच्या बाजूनं उद्या उभे राहा. जे काही शिकाल ते घेऊन या झगडयात मनःपूर्व सामील व्हा. तुम्ही डॉक्टर झालात तर तुम्हाला दिसेल की, जनतेला औषधाची तितकीशी जरूर नसून नीट हवापाण्याची, नीट खाण्यापिण्याची, नीट आंथरापांघरायची, थोडया विश्रांतीची, थोडया आनंदाची जरूरी आहे. ते कसे साधेल? समाजात क्रांती होईल तेव्हा. श्रमणार्यांचा हक्क स्थापन होईल तेव्हा. श्रमानं घट्टे पडलेल्या हाताला खाण्याचा पहिला हक्क, यासाठी मग तुम्ही भांडाल. तुम्ही इंजिनिअर झालात तर तुम्हाला काय दिसेल? खेडयांतून नीट संडास नाहीत, गटारं नाहीत, रस्ते नाहीत, विहिरी नाहीत. या सोई कशा देता येतील? त्यासाठी तुम्हांला क्रांती करावी लागेल. समजा, तुम्ही शेतकीचं ज्ञान घेऊन आलात. ते शेतकर्यांत तुम्हाला पसरायचं आहे. परंतु शेतकरी आज कर्जबाजारी आहे. त्याच्या जमिनी सावकारांनी गिळल्या आहेत. जबर खंड द्यावा लागतो. उत्पन्न झालं तरी हाती राहात नाही. त्यामुळे शेती करण्यात त्याचं लक्ष कसं लागणार? त्याची सदैव उपासमारच. हे बंद करायचं असेल तर क्रांती करावी लागेल. समजा, तुम्ही साहित्यिक बनलात. सुंदर गोष्टी लिहिल्यात, तुमच्या गोष्टी कोण वाचणार? शेकडा ९० टक्के लोक निरक्षर. पुन्हा लोकांना वाचायला ना फुरसत, ना वेळ. साहित्यिकांचे साहित्य घरोघरी जावे असे त्यांना वाटत असेल, तर त्यांनी क्रांती केली पाहिजे. क्रांतीची गाणी गात किसान-कामगारांत त्यांनी मिसळलं पाहिजे. तुम्ही कोणीही व्हा. शेवटी तुम्हाला एकच दिसेल. तुमचे डोळे उघडे असतील; व कान नीट उघडले असतील तर प्रचंड क्रांती करायला तुम्ही उद्या उभे राहाल.